गोवा ते उत्तराखंड : समान नागरी कायद्याच्या वाटेवरील गुणदोष!

    29-Nov-2026
 
Uniform Civil Code Goa and Uttarakhand
 
 
‘समान नागरी कायदा’ या महत्त्वपूर्ण विषयाचा सर्वांगीण वेध घेणारी विशेष लेखमाला... इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि घटनात्मक भूमिकेपासून महाराष्ट्राच्या भवितव्यापर्यंत विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह या लेखमालेतून करण्यात येत आहे.
 
कायद्याच्या पुस्तकात समानता लिहिणे आणि ती सामान्य माणसाच्या आयुष्यात उतरवणे यात अंतर असते. हे अंतर किती कमी करता येते, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला परदेशात जाण्याचीही गरज नाही. गोव्यातील नागरी कायद्याला दीडशे वर्षांची परंपरा आहे, तर उत्तराखंडने स्वतंत्र भारतात नव्याने समान नागरी संहिता केली. एकीकडे अनेक पिढ्यांचा अनुभव, तर दुसरीकडे नव्या कायद्याची अंमलबजावणी; या दोन्हींच्या जमेच्या बाजू आणि उणिवा समजून घेतल्या पाहिजेत.
 
गोवा १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला, तरी तेथे १८७० पासून लागू असलेली पोर्तुगीज नागरी संहिता भारतीय संसदेने १९६२च्या अधिनियमाद्वारे कायम ठेवली. गोव्याच्या नागरी कायद्याच्या अधीन असलेल्या मुस्लीम नागरिकांनाही एकपत्नीत्व बंधनकारक असून, तोंडी तलाकला कायदेशीर मान्यता नाही. विवाहापूर्वी वेगळा करार केला नसेल, तर पती-पत्नींच्या विवाहापूर्वीच्या आणि विवाहानंतर मिळवलेल्या संपत्तीची सामान्यतः सामायिक मालकी निर्माण होते. घटस्फोटाच्या वेळी या संपत्तीत दोघांना समान वाटा मिळतो. २०१९ मधील ‘जोसे पाउलो कुतिन्हो’ निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या व्यवस्थेची प्रशंसा केली होती.
 
सामायिक संपत्तीची मालकी समान असली, तरी जुन्या संहितेच्या ‘अनुच्छेद १११७’मध्ये तिच्या व्यवस्थापनाचे अधिकार पतीला दिले आहेत. १८८०च्या हिंदू रूढीविषयक कायद्यात अपत्य किंवा पुत्र नसल्यास काही अटींवर दुसर्‍या विवाहाला मान्यता देणारा अपवाद होता. ‘कॅथलिक’ विवाह रद्द करण्याच्या चर्चच्या न्यायाधिकरणाच्या आदेशांना नागरी परिणाम देणारी तरतूद मुंबई उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये घटनाबाह्य ठरवली. वारसांसाठी संपत्तीचा ठरावीक भाग राखून ठेवण्याच्या बंधनामुळे स्वकष्टार्जित संपत्तीचे मृत्युपत्र करण्याच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा येतात. शिवाय, पूर्वी वारसांच्या क्रमात हयात जोडीदाराचे स्थान चौथे होते; २०२२२३ मधील सुधारणांनी त्याला अपत्यांनंतर दुसरे स्थान दिले. या सुधारणांची वैधता मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२६ मध्ये कायम ठेवली. हे काही विशेष गोव्याच्या बाबतीत आहेत.
 
उत्तराखंडमध्ये दि. २७ जानेवारी २०२५ पासून लागू झालेल्या संहितेच्या ‘कलम ४’ने एकपत्नीत्व बंधनकारक केले, तर ‘कलम ५’ने सप्तपदी, निकाह आणि आनंद कारज यांसारख्या धार्मिक विवाहविधींना मान्यता कायम ठेवली. विवाहाचे किमान वय पुरुषांसाठी २१ आणि स्त्रियांसाठी १८ वर्षे निश्चित केले असून, घटस्फोटासाठी न्यायालयाचा आदेश आवश्यक आहे. विशेष म्हणजे ‘कलम ३०’नुसार घटस्फोटित पती-पत्नींना पुन्हा एकमेकांशी विवाह करण्यासाठी तिसर्‍या व्यक्तीशी विवाह करण्याची अट घालता येत नाही; ‘निकाह हलाला’ची अशी सक्ती करणे दंडनीय आहे. धार्मिक संस्कारांना धक्का न लावता, अन्यायकारक व्यवहारांना प्रतिबंध कसा करता येतो, याचे हे उदाहरण आहे.
 
वारसाहक्काच्या बाबतीत उत्तराखंडने धर्म व लिंगानुसार असलेली विषमता दूर केली. मृत्युपत्र नसल्यास ‘कलम ५१’नुसार मुलगा आणि मुलगी यांना समान हिस्सा मिळतो; हयात जोडीदार आणि आई-वडिलांनाही पहिल्या श्रेणीतील वारस म्हणून स्थान आहे. गोव्याप्रमाणे विवाहामुळे मालमत्तेची आपोआप सामायिक मालकी निर्माण होण्याची व्यवस्था मात्र उत्तराखंडमध्ये नाही. अनुसूचित जमाती आणि घटनात्मक संरक्षण लाभलेल्या काही रूढींचे पालन करणारे घटक संहितेच्या कक्षेबाहेर आहेत; दत्तकविधान आणि पालकत्वासाठीही स्वतंत्र सर्वसमावेशक तरतुदी नाहीत.
 
उत्तराखंडच्या अंमलबजावणीचे चित्र आकडेवारीतून अधिक स्पष्ट होते. दि. १९ जानेवारी २०२६ पर्यंत ४ लाख ७४ हजार ४४७ विवाहांची नोंदणी, पूर्वी नोंदवलेल्या ८२ हजार ५४५ विवाहांची पुष्टी, ३ हजार २९३ मृत्युपत्रांची नोंदणी आणि घटस्फोटाची ३१६ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. पूर्वी दररोज सरासरी ६७ विवाहांची नोंदणी होत असे; नव्या व्यवस्थेत ती सुमारे १ हजार ४०० पर्यंत पोहोचली. विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र सरासरी पाच दिवसांत मिळत होते. या आकड्यांत जुन्या विवाहांचाही समावेश असला, तरी नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज कमी झाली, हे प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे यश आहे.
 
उत्तराखंडने ‘लिव्ह-इन’ संबंधांची सक्तीची नोंदणीही संहितेत समाविष्ट केली आहे. यातून विवाहसंस्थेला समांतर व्यवस्था निर्माण होईल का, नोंदणीमुळे फसवणुकीला कितपत आळा बसेल आणि अशा संबंधांतून जन्मलेल्या अपत्यांच्या हक्कांचे काय, या प्रश्नांचा स्वतंत्र विचार करावा लागेल. समान नागरी कायद्याच्या व्याप्तीशीही त्यांचा संबंध तपासावा लागेल. त्याचा ऊहापोह पुढील लेखात करू.
 
दरम्यान गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेशच्या समान नागरी कायद्यांना २०२६ मध्ये राष्ट्रपतींची संमती मिळाली असून, राजस्थाननेही विधेयक सादर केले आहे. महाराष्ट्राला आता कोर्‍या पाटीवर सुरुवात करावी लागणार नाही. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे गोवा आणि उत्तराखंडच्या अनुभवांतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. कायद्याची समानता, तरतुदींची न्याय्यता आणि अंमलबजावणीची सुलभता या तिन्हींची योग्य सांगड घालण्यातच समान नागरी संहितेचे खरे यश सामावलेले आहे.
 




संबंधित मजकूर