गावकुसाबाहेरचे वंचित, उपेक्षित जिणे वाट्याला आले, तरीही आपल्या मनात कोणताही विखार न बाळगता, ‘दलित चळवळीतला कार्यकर्ता’ म्हणून सातत्याने स्वत:ला सिद्ध करत राहणार्या आणि याच वेळी दलित साहित्याला आपल्या लेखणीने एक पाऊल पुढे नेणार्या डॉ. शरणकुमार हणमंता लिंबाळे यांचा जन्म दि. १ जून १९५६ रोजी (अंदाजे) सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या हन्नूर या गावी झाला.
भूमिहीन आईच्या पोटी जन्मलेल्या, ‘अनौरस’ म्हणून हिणवले गेलेल्या शरण यांचे प्राथमिक शिक्षण हन्नूरच्या जिल्हा परिषद शाळेत आणि पुढे चपळगावच्या ग्रामीण विद्यालयात पूर्ण झाले. हलाखीची परिस्थिती असूनही, अन्नान्न दशा वाट्याला येऊनही त्यांनी शिक्षण सोडले नाही. कधी उपाशी राहून, मिळेल ते शिळेपाके, बुरसे जेवण जेवूनही ते १९७४ साली दहावीची परीक्षा नेटाने उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरच्या ‘दयानंद’ महाविद्यालयात दाखल झाले. तिथून त्यांनी १९७८ साली ‘बीए’ची पदवी मिळवली. शिकत असतानाच त्यांचा कुसुम कांबळे या तरुणीशी विवाह झाला. ‘एमए’ करत असतानाच त्यांना पोस्ट खात्यात नोकरी लागली. तिथे ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. याच काळात त्यांनी ‘आकाशवाणी’वर निवेदक म्हणूनही काम करायला सुरुवात केली आणि आपले शिक्षणही सुरू ठेवले. यथावकाश त्यांनी ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य’ या विषयावर ‘पीएचडी’ची पदवीही मिळवली.
खरेतर त्यांच्या मनात दाटलेला विद्रोह, त्यात दलित चळवळीशी आलेला संपर्क या सगळ्याच्या प्रेरणेतून त्यांनी वयाच्या अवघ्या पंचविशीत आपले आत्मकथन लिहिले आणि ‘अक्करमाशी’ या नावाने आलेल्या या आत्मकथनाने दलित साहित्य आणि एकूणच मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिली. आपल्या आत्मकथनात ते म्हणतात, "मला माझा इतिहास माझ्या आईपुरता सांगता येईल. जास्तच झाले, तर आईच्या आईपुरता. माझी आई महार, तर वडील लिंगायत. आई झोपडीत, तर बाप माडीत. वडील जमीनदार, तर आई भूमिहीन. गाव, भाषा, जात, धर्म या सगळ्यांत दुभंगलेला माझा जन्मच अनैतिक ठरवला गेला.”
जगण्याला मुळापासून आव्हान देणार्या अनैतिकतेने, अनौरसपणाने हलून न जाता, त्यांनी या व्यवस्थेतच स्वत:ची मुळे घट्ट रोवली आणि म्हणून दलित साहित्य प्रवाहात त्यांचे नाव महत्त्वाचे मानले गेले. ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन येण्याआधी ते कवी म्हणून प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नात होते. पण, ‘अक्करमाशी’च्या यशाने आणि आंबेडकरी चळवळीशी आलेला संपर्क, यांमुळे प्रभावित होऊन त्यांनी चळवळीला पूरक असणारे साहित्य लिहिले. त्यात ‘श्वेतपत्रिका’ हा कवितासंग्रह, ‘हरिजन’, ‘रथयात्रा’, ‘दलित ब्राह्मण’ हे कथासंग्रह; तर ‘भिन्नलिंगी’, ‘उपल्या’ यांसारख्या कादंबर्या लिहिल्या. ‘सनातन’ या कादंबरीतून त्यांनी दलित समाजाच्या अवहेलनेची केलेली सैद्धान्तिक मांडणी वाचकांना एकूणच त्यांच्या साहित्यिक मोठेपणाची साक्ष पटवून देते. यामुळेच ‘सरस्वती सन्मान’सारखा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार ‘सनातन’ कादंबरीला मिळाला.
‘अक्करमाशी’नंतर त्यांचे ‘बारामाशी’ आणि त्यानंतर ‘पुन्हा अक्करमाशी’ही आले. त्यांनी केवळ दलित साहित्यलेखन केले नाही; तर दलित साहित्याची सैद्धान्तिक मांडणीही केली. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या नावाने ते वाचकांसाठी उपलब्धही आहे.
साहित्यातून स्वत:ला प्रश्न विचारत राहणे, स्वत:च्या एकूणच परिस्थितीकडे अलिप्तपणे पाहणे आणि ते पाहत असतानाच सतत स्वत:ला पारखत राहणे, ही गोष्ट त्यांच्या संवेदनशील मनाची पावती आपल्याला देतात. त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘प्रामाणिकपणा’. त्यांच्या लेखनाला दांभिकतेने स्पर्शही केला नाही. जगण्याची हतबलता त्यांच्या एकूणच लेखनात डोकावत राहते. ‘विद्रोह’ हा दलित साहित्याचा आत्मा आहे. नाकारले गेल्याच्या भावनेचा विस्फोट आणि उपेक्षित भावनोद्रेक हे दलित साहित्याचे वैशिष्ट्य. पण, त्या अर्थाने ‘अक्करमाशी’ विद्रोह मांडत नाही, तर हतबलता दाखवत राहते. ‘सनातन’मध्येही लिंबाळे यांनी मांडलेले जात-वास्तव ते धर्मांतराची कारणमीमांसा ही तर्काच्या दृष्टीने मांडलेली आहे. त्या मांडणीतून समाज-वास्तवाची चिकित्सा ते करू पाहतात.
‘दलित पँथर’च्या चळवळीने त्यांना घडवले. त्या घडण्यातून त्यांचा एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला; पण तरीही स्वत:कडे, परिवर्तनवादी चळवळीकडे पाहण्याची त्यांची एक भूमिकाही सातत्याने दिसते. परिवर्तनवादी चळवळीत ‘संवाद’ अतिशय महत्त्वाचा असतो, ही त्यांची भूमिका त्यांच्या चळवळीतून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, असे वाटते.
लाचारीचे जिणे मागे सोडून पुढे आल्यावरही त्यांना जातीमुळे अनेकदा हतबल व्हावे लागले. पण, तरी हार न मानता ते जगण्याला सातत्याने सामोरे गेले. ते तसे सामोरे जाणे त्यांनी आपल्या साहित्यातून सातत्याने मांडले. लेखन हे त्यांच्या जगण्याची निष्ठा आहे. त्या निष्ठेतून लिहिले गेलेले त्यांचे सर्व साहित्य, अनेक भारतीय आणि परकीय भाषांमधून अनुवादित झालेले आहे. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात त्यांनी वापरलेली ग्रामीण/परिसर भाषा नंतरच्या लेखनात दिसत नाही. त्यांच्या भाषाविषयक दृष्टिकोन-बदलाने मराठी दलित साहित्य जागतिकस्तरावर पोहोचण्याची एक प्रक्रिया सुलभ झालेली दिसते.
स्वत:च्या मताशी प्रामाणिक राहात, ते प्रामाणिक म्हणणे प्रांजळपणे आपल्या साहित्यातून उलगडून दाखवणार्या लिंबाळे यांनी ४० पेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यासाठी त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
‘वंचित’ म्हणून सातत्याने हिणवल्या गेलेल्या लिंबाळे यांनी आपल्या कामातून, चळवळीतल्या आपल्या भूमिका मांडणीतून आणि साहित्यातून सतत स्वत:चे महत्त्व सिद्ध केलेले आहे. त्यांच्या चळवळीतील कामाला आणि त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला सगळ्यात मोठे यश मिळाले, ते १००व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यावर!
डॉ. अर्चना कुरतडकर
(लेखिका ‘शिक्षणविवेक’च्या संपादक आहेत.)
९५९४९९३०३४