करुणेचे वैश्विकीकरण होणे अत्यंत आवश्यक! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते ‘करुणानायक राम’ पुस्तकाचे प्रकाशन

    29-Nov-2026
 
Karunanayak Ram book launch
 
मुंबई (Karunanayak Ram book launch) : आज देश आणि जगासमोरील अनेक समस्यांच्या मुळाशी ‘मी’ आणि ‘माझे’ हा आग्रह तसेच करुणेचा अभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत करुणेचे वैश्विकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादित स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीशी आपलेपणाची भावना निर्माण करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवता आणि विश्वकल्याणाच्या दिशेने वाटचाल करू शकू, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
सरसंघचालकांच्या हस्ते नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातील भीम सभागृहात नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक कैलाश सत्यार्थी यांच्या ‘करुणानायक राम’ या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात भगवान राम यांचे व्यक्तिमत्त्व, जीवनदृष्टी आणि आदर्श यांचे करुणा, मानवी संवेदना, सामाजिक न्याय आणि नैतिक उत्तरदायित्व या व्यापक दृष्टिकोनातून विवेचन करण्यात आले आहे.(Karunanayak Ram book launch)
 
या समारंभाला भूतानच्या राजकुमारी सोनम देचन वांगचुक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुस्तकाचे लेखक आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी, पुस्तकाचे प्रकाशक प्रभात कुमार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
उपस्थिताना संबोधित करताना सरसंघचालक यांनी भगवान राम यांची करुणा आणि वर्तमान काळातील तिची प्रासंगिकता यावर विचार मांडले. ते म्हणाले, "आपल्या सर्वांच्या हृदयात स्वाभाविकपणे अशी एक भावना असते, जी प्रेरित होऊन आपण एखाद्याचे दुःख दूर करण्यासाठी काहीतरी करतो. यालाच करुणा म्हणतात." भगवान राम यांच्या चरित्रात करुणा, मर्यादा आणि लोककल्याणाची भावना अंतर्भूत आहे. राम आणि रावण यांच्यातील मूलभूत फरक हाच होता की, रावण ‘मी’ आणि ‘माझे’ या अहंकारापुरता मर्यादित होता, तर राम यांचे जीवन करुणा आणि धर्माचरणाचा आदर्श प्रस्तुत करते. अहंकार म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’ या पलीकडे जाऊ न शकणे. जोपर्यंत आपण या आग्रहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण सर्वजण अंतर्मनातून एकमेकांशी जोडलेले आहोत, या शाश्वत सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही.(Karunanayak Ram book launch)
 
पुढे ते म्हणाले, करुणा हा काही विशेष गुण नसून तो मानवतेचा स्वाभाविक भाव आहे. जेव्हा दुसऱ्याचे दुःख आपल्याला स्वतःचे दुःख वाटू लागते आणि ते कमी करण्यासाठी आपण आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करतो, तेव्हा करुणा प्रकट होते. केवळ संवेदना व्यक्त करणे म्हणजे करुणा नव्हे, तर करुणा आपल्याला सेवा आणि लोककल्याणासाठी प्रेरित करते. आपण कधीही एकटे सुखी होऊ शकत नाही. आपले सुख संपूर्ण समाज, निसर्ग आणि विश्वाच्या सुखाशी जोडलेले आहे. त्यामुळे केवळ रामाला मानणे पुरेसे नाही, तर रामाचे विचार आणि आचरणही आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांच्या चरित्रातून मर्यादा, कर्तव्यनिष्ठा आणि करुणेची प्रेरणा घेऊन ती आपल्या जीवनात आचरणात आणणे, हीच खरी श्रद्धा आहे.
 
कैलाश सत्यार्थी यांनी आपल्या ‘करुणानायक राम’ या पुस्तकाची वैचारिक पार्श्वभूमी आणि त्यामागील मूलभूत विचार स्पष्ट केला. भगवान राम यांचे जीवन करुणेच्या व्यापक दृष्टिकोनातून समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार असा आहे की, करुणा म्हणजे केवळ दया किंवा भावनिकता नव्हे, तर व्यक्ती, समाज आणि शासनव्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी सक्रिय नैतिक शक्ती आहे.(Karunanayak Ram book launch)
 
या पुस्तकात रामांच्या जीवनातील करुणेचे हे स्वरूप चार स्तरांवर स्पष्ट करण्यात आले आहे. ते म्हणजे कुटुंब, समाज, व्यवस्था आणि स्वतःचे अंतर्मन.
 




संबंधित मजकूर