कार्तिक स्वामींचा दिवा, प्रतापगडावरचा अफजल खान, नाशिकच्या कुंभाला विरोध किंवा गोव्याचा ‘कार्निव्हल’ यामागे एकच उद्देश आहे; श्रद्धा-पराक्रमाचा इतिहास आणि परंपरेच्या कण्यातले मणके ढिले करणे व एक कणाहीन व्होटबँक तयार करणे, हा कारस्थानांचा खेळ खोल आहे.
राज्यकर्ते कोणीही असो, त्यांच्या सेक्युलर असण्याची किंवा दिसण्याची किंमत केवळ आणि केवळ हिंदूंनाच कशी मोजावी लागते, याचा प्रत्यय तामिळनाडूच्या मदुराईजवळील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील ‘दीपातून’ नावाच्या या दगडी स्तंभावर ‘कार्तिगई दीपम’ या हिंदू रिवाजाला खंडित करण्याच्या कारस्थानातून दिसून आला.
तिरुपरंकुंद्रम टेकडीवर भगवान मुरगन किंवा कार्तिक स्वामींचे प्राचीन मंदिर आहे. पांड्य राजवंशाने उभारलेले हे मंदिर एकाच महाकाय पाषाणात कोरलेले असून, ते किमान सहाव्या शतकात उभारले असल्याचे दाखले आहेत. नेहमीप्रमाणे आपल्याकडे छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर मजार उगवतात आणि मग त्याचे उरूस भरवले जातात, तसेच या टेकडीवरही ‘हजरत सुलतान सिकंदर बादशाह औलिया’ हा दर्गा निर्माण करण्यात आला. अय्यप्पा स्वामी हे दक्षिण भारतातील कडवट हिंदू प्रस्थ. केरळम्, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या सर्वच राज्यांत अय्यप्पा स्वामींचा प्रभाव जबरदस्त आहे. हा प्रभाव कुरतडायला पद्धतशीरपणे १६व्या शतकात सुरुवात झाली. अफजल खानाची कबर उरुसात रूपांतरित करून छत्रपतींचा पराक्रम झाकोळण्याचे कारस्थान महाराष्ट्रात झाले, तसेच हे कारस्थान! मदुराई हे धर्मांतरणाचे एक मोठे केंद्र राहिले आहे. धर्मांतरणाचे अनेक प्रयोग इथे झाले. ८०च्या दशकात गाजलेले ‘मीनाक्षीपुरम’चे धर्मांतरण हे या प्रकारे इथेच झाले. कार्तिगई दीपप्रज्वलन का करायचे नाही, तर मुस्लिमांचा त्याला विरोध आहे म्हणून!
विजयनगर या समृद्ध हिंदू साम्राज्याच्या पराक्रमी सेनापतीने मदुराई सुलतानाचा निःपात केला. विजयनगरचा सेनापती कुमार कंपण्णा याने हे धर्मकार्य सिद्ध केले होते. तिरुपरंकुंद्रम येथे झालेल्या भीषण लढाईत कंपण्णाने सुलतान सिकंदर शाह याचा वध केला. कंपण्णा विजयनगरचा सेनापती तर होताच; पण पराक्रमी राजपुत्रही होता. या लढाईचे सर्व लिखित दस्तऐवज ‘मधुरा विजय’ या संस्कृत महाकाव्यात नोंदवले गेले आहेत. अत्यंत पराक्रमी अशी ही लढाई आहे. या पराक्रमाचा मानभंग करण्याचे कारस्थान तिथूनच सुरू झाले. युद्धानंतर सिकंदर शाहचा मुडदा स्थानिक मुसलमानांनी तिरुपरंकुंद्रम टेकडीवर नेऊन पुरला आणि अफजल खानाप्रमाणेच हा धर्मवेडा आक्रमक रातोरात सुफी संत बनला. हळूहळू त्याच्या कबरीचे रूपांतर दर्ग्यात झाले आणि तिरुपरंकुंद्रमच्या प्राचीन अखंड शिलेला ‘सिकंदर मलाई’ असे संबोधले जाऊ लागले. हा अतिरेक आता इतका वाढला आहे की, कार्तिक पौर्णिमेला या टेकडीवर असलेला पाषाणी दिवा, दिवा नसून अन्य काही असल्याचा दावा तामिळनाडू सरकार वारंवार करीत आहे. या टेकडीवरील दिवा लावण्याची पद्धत इतकी प्राचीन आहे की, कुठल्याही न्यायालयाने सरकारचा हा दावा मान्य केला नाही. करुणानिधी कन्या आणि ‘टूजी’ घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या कनिमोळीने स्पष्ट निर्णय देणार्या न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनाच हटवण्याची व त्यांच्यावर ‘महाभियोग’ चालवण्याची मागणी केली होती. या कारस्थानात प्रियांका गांधी, अखिलेश यादव हे सेक्युलर टोळके सामील झाले होतेच. पण, अप्रत्यक्षपणे उबाठाच्या उद्धव ठाकरे यांनीही या न्यायाधीशांना विरोध केला होता. ‘स्वामीनाथन यांच्या कारकिर्दीला आमचा विरोध आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जाहीर भूमिका घेतली होती. सरड्याला लाजवेल अशी ही पल्टू भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.
स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवीत, पाद्य्रांचे झगे आणि धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळणारा नट विजय इथे मुख्यमंत्री आहे. दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ नोव्हेंबरच्या ‘कार्तिगई दीपम’ उत्सवासाठी दिवा लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, राज्य सरकारने हा न्यायालयीन आदेश धुडकावत अन्य कुठेही दिवा लावला. यात सरकारनेच नेमलेल्या मंदिराचे विश्वस्त व स्थानिक जिल्हा प्रशासन गुंतले होते. हिंदू संघटनांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली व केंद्राने ‘सीआरपीएफ’ जवान व मोठा फौजफाटा पाठवून टेकडीवरच दीपप्रज्वलन केले आणि हिंदूंच्या भावनेचा सन्मान राखला.
आता मुद्दा येतो कार्तिक स्वामींचा. दक्षिणेत काळे कपडे घालून कार्तिक स्वामींची उपासना करणार्या सश्रद्धांचा मोठा गोतावळा आहे. मात्र, ‘कार्तिगई दीपम’ विझवण्याचे कारस्थान सुरू झाले, तरीही ही मंडळी भोळसटपणेच का वागत राहतात? याचे कारण, या भागात श्रद्धा, पराक्रम, शौर्याचा धर्माधिष्ठित इतिहास याचे खच्चीकरण करण्याचा पद्धतशीर कार्यक्रम करण्यात आला आहे. विषमतेच्या विरोधात सुरू झालेली ‘पेरियार चळवळ’ अलगदपणे ब्राह्मणविरोधी व परंपराविरोधी करण्यात आली. ‘ब्राह्मण्यवाद’ नावाचे किचकट विश्लेषण वापरून परंपरा खंडित करण्याचे अव्याहत कारस्थान आजही सुरू आहे. हे विषमतावादी विरोधक मोठे सोंगाडे असतात. ते बुरखे पुरोगाम्यांचे पांघरतात; मात्र त्यांची कृती समाज विभागण्याचीच असते. आपल्याकडे प्रतापगडावर अफजल खान बोकाळला; तरीही हिंदू जागृत झाला नाही. कारण, पश्चिम महाराष्ट्रात श्रद्धा, परंपरा, धर्माचे अधिष्ठान यांचा मणका असाच खिळखिळा करण्यात आलेला आहे. यात अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेलाच विरोध करणार्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा मोठा हात आहे. पेरियारांच्या पश्चात त्यांची चळवळ ज्यांच्या हातात गेली, त्यांनी विभाजनवादी राजकारणाची जोड अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोडली. त्यातून जे आकाराला आले, त्याचे मतपेढीत रूपांतर झाले. तामिळनाडू असो किंवा महाराष्ट्र, इथेही कारस्थाने उत्तम रचली जातात. उत्तरेतल्या राजकारणाने स्वतःची हिंदू अस्मिता चोख ओळखली आहे. दक्षिणेतल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना या धूर्त राजकीय चाली समजून घेणे अगत्याचे आहे. पुरोगामी चळवळीतल्या बेगडी सुधारणावादी नौटंकीचा अजून एक फायदा म्हणजे, त्यांचा पुढारी कितीही भ्रष्ट असला, कनिमोळीसारखा तुरुंगात जाऊन आलेला असला, तरी माध्यमातले त्यांचे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मित्र प्रतिमा जपण्याचे उत्तम काम करतात. ही एक मोठी सांस्कृतिक लढाई आहे. हिंदूंना त्यांच्या या ‘नॉन टँजिबल असेट’ ओळखता येणे आवश्यक आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्यालाही स्थानिक विरोध करत नाहीत. पण, पुरोगामी कारस्थानी कधी पर्यावरणाच्या नावाखाली, कधी विकासकामातील भ्रष्टाचाराच्या नावाखाली कुंभाला विरोध करतात. नाशिकची वस्तुस्थिती अशी आहे की, ‘वाईन सिटी’चा कितीही गजर झाला, तरी ती ‘वाईन’ काही केल्या नाशिकच्या विकासात चढली नाही. आता तर तो ‘वाईन’ उद्योगही गंडला आहे. मात्र, ‘डिवाईन सिटी’ नाशिक समृद्ध झाले आहे. जेमतेम २५ ते ३० लाख लोकवस्तीच्या या शहरात कुंभामुळे हरप्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या राहतात. देशोदेशीचे सश्रद्ध इथे कुंभामुळे येऊन पोहोचतात. स्थानिक रोजगाराला महाकाय चालना मिळते. कुठलेही कौशल्य नसलेल्या व्यक्तीलाही गोदाकाठ कसला न कसला रोजगार देऊन जातो. त्याची जातपात न तपासता, त्याला रोजीरोटी मिळते. अट एवढीच की, गोदाकाठी वसलेल्या काळ्यारामावर जी आमची सचेतन श्रद्धा आहे, ती त्याने मान्य करावी. मात्र, इथेच खरा सांस्कृतिक संघर्ष आहे. साधा माणूस हे सगळे करतो; पण नतद्रष्ट पाखंडी सावरकरविरोधापासून ते कुंभातल्या वृक्षतोडीपर्यंत बरोबर नकारात्मक अभिमत तयार करतात. हा संघर्ष मुळातून समजून घेऊनच करावा लागेल. या संघर्षापेक्षा बुद्धिभेदाची कारस्थाने समजून घेण्याची गरज आहे. गोव्यातील शिमगोत्सव खरेतर सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव. उत्सवी स्वरूपात त्याला तोड नाही. व्यसने-व्यभिचार याचा लवलेशही त्यात नाही. मात्र, ‘कार्निव्हल’च गोव्याचा अधिकृत उत्सव होऊन बसला होता. या सगळ्या मागचे राजकीय षड्यंत्र कळले, तर ‘कार्तिगई दीपम’समोरचा दीपही अखंड पेटत राहील!