इंग्रज जेव्हा भारतातून निघून गेले, तेव्हापर्यंत भारत गुलाम राष्ट्र असल्याने देशाची आर्थिक स्थिती विशेष चांगली नव्हती. इंग्रजांनी आपले खूप शोषण केले. आपल्या सगळ्या व्यवस्था छिन्नविच्छिन्न केल्या. आपला विकास करण्यात इंग्रजांना रुची असण्याचे, आवड असण्याचे काही कारण नव्हते. आपले तत्कालीन नेते ज्याला ‘भारताचा विकास’ मानत होते, उदाहरणार्थ रेल्वे, टेलिफोन, टेलिग्राफ, काही रस्ते इत्यादी, हे सर्व त्यांनी आपले शासन व्यवस्थित चालावे म्हणून केलेल्या सोयीसुविधा होत्या, भारताच्या विकासासाठी नाही! तेव्हाच्या इंग्रज अधिकार्यांनीच हे लिहून ठेवलेय. कधीतरी जागतिक बाजारपेठेत शिखरावर असणारे आपण, आता जागतिक व्यापारात फक्त २.८ टक्के हिस्सेदारीपुरते मर्यादित राहिलो. त्यातून विभाजनाचे मोठे ओझे देशावर होते. जवळजवळ एक कोटी विस्थापित हिंदू, शीख आपल्याच देशात, भारतात, शरणार्थी म्हणून आले होते. त्यांची व्यवस्था लावायची होती.
थोडक्यात, अनेक प्रश्न होते, अनेक समस्या होत्या आणि अनेक आव्हाने होती; परंतु याच आव्हानांमध्ये अनेक संधीही लपल्या होत्या. त्या संधींचा फायदा घेऊन आपण पुढे जाऊ शकत होतो. उन्नत, समृद्ध आणि मजबूत राष्ट्र बनविण्याच्या दिशेने प्रवास करू शकत होतो. आपल्या आसपास ज्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले होते किंवा जे देश महायुद्धाच्या आगीत होरपळून निघाले होते, त्यांच्या समोरसुद्धा याच समस्या होत्या, हीच आव्हाने होती.
भारतातसुद्धा इंग्रजांनी बरबाद केलेल्या आणि नष्ट केलेल्या व्यवस्था, पुन्हा निर्माण करायला हव्या होत्या. त्यांनी दीडशे वर्षांपेक्षा जास्त भारतीय मानसिकतेवर वसाहतवादाचे जे आवरण चढवले होते, ते खरडून काढून फेकून देणे आवश्यक होते. भारतासमोर ही एक मौलिक संधी होती, नवीन भारत निर्माण करण्याची! बलशाली, वैभवसंपन्न आणि तेजस्वी भारताच्या पुनर्निर्माणाची! परंतु, आम्ही ही संधी गमावली.
कुठल्याही राष्ट्राच्या पुनर्निर्माणात मुख्य भूमिका असते ती शिक्षणाची, शिक्षणतज्ज्ञांची, शिक्षण मंत्रालयाची आणि त्यासाठी आवश्यक असते ते या देशाच्या मातीशी ‘कनेट’ होणारे शिक्षणखाते; त्या खात्याचे नेतृत्व करणारे, त्या देशाचा सांस्कृतिक वारसा चालवणारे शिक्षणमंत्री. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले शिक्षणमंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद! स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री. हे मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते? ‘मुस्लीम लीग’च्या जिनांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने उभा केलेला ‘पोस्टर बॉय’. पूर्णतः मुस्लीम मानसिकता आणि मुस्लीम संस्कारात विकसित झालेले नेतृत्व! यांचे खरे नाव होते, अब्दुल कलाम गुलाम मोहिउद्दिन. यांचे पूर्वज बाबरसोबत आक्रमणकर्त्यांच्या रूपात भारतात आले होते. हे मूळचे अफगाणिस्तानच्या हेरात प्रांताचे रहिवासी. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी यांचे वडील पळून मक्केला पोहोचले. नंतर तिथल्या स्थानिक महिलेशी त्यांनी विवाह केला. मौलानांचा जन्मसुद्धा मक्केचा. त्यांच्या आईला हिंदी तर सोडाच, उर्दू भाषासुद्धा येत नव्हती. तिला फक्त अरबी भाषा समजत होती.
मुस्लीम पद्धतीने मदरशांमध्ये मौलानांचे शिक्षण झाले. भारतात आल्यानंतर त्यांनी ‘अल् हिलाल’ आणि ‘अल् बलाघ’ अशा दोन कट्टर इस्लामी साप्ताहिकांचे प्रकाशन सुरू केले. या दोन्हींचे मौलाना संस्थापक-संपादक होते. ते ‘खिलाफत चळवळी’चे प्रमुख समर्थक होते. ‘दारुल उलूम देवबंद’शी जोडलेले होते. अलीगढच्या ‘जामिया मिलिया इस्लामिया’चे संस्थापक सदस्य होते. पुढे १९३४ मध्ये या ‘जामिया मिलिया इस्लामिया’ला दिल्लीमध्ये स्थलांतरित केले गेले. काँग्रेसने ‘मुस्लीम लीग’ला टक्कर देण्यासाठी मौलाना अबुल कलामांच्या रूपात आपले ‘मुस्लीम कार्ड’ वापरले. म्हणून, त्यांना १९४० ते १९४५ या महत्त्वपूर्ण कालखंडात काँग्रेसचे अध्यक्ष बनवून ठेवले.
स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या मंत्रिमंडळात त्यांना भारताचे प्रथम शिक्षणमंत्री बनवले, ते त्यांच्या मृत्यूपर्यंत; म्हणजेच १९५८ पर्यंत. अर्थात, ११ वर्षे शिक्षणमंत्री होते; ज्यांचा भारतीय संस्कृतीशी, आचार-विचारांशी आणि या जमिनीशी काही संबंधच नाही आणि असलाच, तर तोही केवळ वरवरचा संपर्क. अशा व्यक्तीच्या हातात आपण स्वातंत्र्यानंतरची अत्यंत महत्त्वाची ११ वर्षे शिक्षणखाते सोपवले. मात्र, फक्त शिक्षण खातेच नव्हे, तर काही अपवाद वगळता जवळपास सगळ्या मंत्रालयांमध्ये हीच स्थिती होती. एक छोटेसे उदाहरण उद्योग मंत्रालयाचे देतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात जे पहिले सर्वदलीय मंत्रिमंडळ बनले, त्यात पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींना उद्योग मंत्रालय सोपवले गेले. श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेच्या कोट्यातून मंत्री झाले होते.
श्यामाप्रसादजी स्वदेशीचे प्रखर समर्थक होते. त्यांचे स्पष्ट मत होते की, भारताचे नवनिर्माण करायचे असेल; तर सरकारी, गैरसरकारी, सगळ्या संसाधनांचा/माध्यमांचा उपयोग करायला हवा; परंतु नेहरूंच्या मनात सोव्हिएत रशियाचे मॉडेल पक्के बसले होते. त्यामुळे डॉटर मुखर्जींचे नेहरूंसोबत मतभेद होऊ लागले.
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी तत्कालीन बिहार (सध्याचे झारखंड)च्या धनबाद जिल्ह्यातील सिंदरीमध्ये एक खतांचा (उर्वरक) कारखाना काढण्याची योजना तयार केली. बिहार आणि आताच्या झारखंडमध्ये कोळशाचे अमाप भांडार बघून त्यांनी हा कारखाना कोळशावर आधारित सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय, स्थानिक कच्च्या मालाची उपलब्धता, पर्यावरण, आर्थिक गणित या सर्व निकषांवर अत्यंत उपयोगी होता; परंतु ‘पेट्रोकेमिकल’ आयात करणारी एक लॉबी नेहरूंच्या मदतीने या प्रस्तावाला विरोध करत होती. नेहरू पेट्रोलियम पदार्थांपासून उर्वरक निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे समर्थक होते. ते स्वतःच पंतप्रधान असल्याने ती लॉबी जिंकली. शेवटी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दि. ६ एप्रिल १९५० रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
हा कारखाना सुरुवातीला काही दिवस चालला; परंतु नंतर आयातीत पेट्रोल, केमिकल्सने तयार होणार्या खतासाठी हा तोट्याचा सौदा ठरला. १९९२ मध्ये याला ‘सिक युनिट’ घोषित करण्यात आले आणि शेवटी सप्टेंबर २००२ मध्ये हा कारखाना बंद करण्यात आला. (नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दि. १ मार्च २०२४ रोजी हा कारखाना नव्या स्वरूपात देशाला लोकार्पित केला. आता तो चांगला चालतोय.)
सिंदरी उर्वरक कारखान्यासारखी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात देशातील संसाधनांना बाजूला सारून, आयातीत संसाधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. देशाला स्वावलंबी बनवण्याच्या प्रक्रियेत हा सगळ्यात मोठा अडथळा होता.
अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा
कोणताही देश जेव्हा स्वतंत्र होतो किंवा नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा फार महत्त्वाची असते. विशेषतः मागील १०० वर्षांचा इतिहास हा महायुद्धाचा, आक्रमणांचा आणि छद्म युद्धांचा इतिहास आहे. हे बघता, स्वातंत्र्यानंतर आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर सजग राहण्याची आवश्यकता होती.
परंतु, देशाचे दुर्भाग्य! आपण दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरलो. आपण प्रथम अंतर्गत सुरक्षेचा विचार करू. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती अशी आहे की, आपली पूर्वोत्तर राज्ये अत्यंत दुर्गम भागात आहेत. अर्थात, भौगोलिक रचनेमुळे त्यांच्याशी सडक मार्गाने संपर्क करणे अत्यंत कठीण आहे. परंतु, भारत अपवाद नाही. याहीपेक्षा दुर्गम स्थानांवर युरोपात वस्ती आहे. जपान आणि चीनमध्येसुद्धा अशा जागी मोठ्या संख्येने लोक राहतात. त्या सर्व देशांनी पुरुषार्थ दाखवून, तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या दुर्गम जागी जाणे सुलभ केले.
पण, आपण तसे केले नाही. सुरुवातीच्या ६०-६५ वर्षांत तर काहीच केले नाही. आपण त्यांना सुलभ मार्गाने जोडण्याची इच्छाशक्तीच दाखवली नाही. याचा परिणाम तर होणारच होता. तो तसा झालाही... या राज्यात फुटीरतावाद वाढू लागला. तो वाढण्यात या पूर्वोत्तर राज्यांमध्ये मतांतरण/धर्मांतरणाची मोठी भूमिका होती.
आपण हे शिकलो की, इंग्रज भारतात व्यापार करण्यासाठी आले होते; परंतु त्यांचा मूळ उद्देश फक्त व्यापार नव्हता, तर ख्रिश्चनीकरण वाढवणे हा होता. असे इंग्रजांनीच स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. स्पेन आणि पोर्तुगालने दक्षिण अमेरिकेच्या देशांसोबत जे केले, तेच भारतासोबत करण्याचा इंग्रजांचा हेतू होता.
बाह्य संकटांची मालिका
बाहेरची संकटे तर आपल्याला दिसलीच नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठलाही देश आपली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतो. इस्रायलनेही हेच केले. म्हणून सुरुवातीलाच अत्यंत भयंकर आक्रमण झेलूनही इस्रायल टिकून राहिला. फक्त टिकलाच नाही, तर दर युद्धागणिक आपले क्षेत्रफळ वाढवत सर्वच क्षेत्रांत प्रगती करत राहिला.
परंतु, आपल्या भारतात स्थिती वेगळी होती. शासन करणारे तत्कालीन शासक, नेते अहिंसेला आपला आदर्श मानत होते. अहिंसेचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन शासनकर्त्यांना असे वाटत होते की, आपल्याला सैन्याची फारशी आवश्यकता नाही. जगात आपण कुणावर आक्रमण केले नाही आणि करणार नाही, तर आपल्यावर कोण आणि कशाला आक्रमण करेल?
परंतु, जागतिक राजकारणात असे होत नाही. तसे झालेही नाही. स्वातंत्र्यानंतर काहीच महिन्यांमध्ये, म्हणजे दि. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने कबिल्यांच्या टोळीच्या वेशात आपले सैनिक काश्मिरात पाठवले. त्यांनी अर्ध्याहून अधिक काश्मीर आपल्या ताब्यात घेतले. सैन्याने पुरेसा प्रतिकार करेपर्यंत आणि पाकिस्तानी फौजेला परतवून लावेपर्यंत पंतप्रधान नेहरू हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात घेऊन गेले. दुर्दैवाने आपण मनाविरुद्ध, अत्यंत दुःखी अंतःकरणाने आपला हिस्सा पाकिस्तानात जाताना फक्त बघत राहिलो. गिलगिट-बाल्टिस्तानसारखा जगाचा स्वर्ग मानला जाणारा सुंदर भूभाग आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भू-राजनीतिक आणि सामरिक दृष्टीनेपण हा भूभाग महत्त्वाचा आहे.
यातील काही भागांवर चीनने आपला हक्क दाखवला आहे. १९६२च्या युद्धात भारताचा पराभव केल्यानंतर चीनने पाकिस्तानशी पीकिंग (आजचे बीजिंग)मध्ये दि. २ मार्च १९६३ रोजी एक करार केला. या करारानुसार, भारताकडून घेतलेल्या काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने चीनला देऊन टाकला. आज ‘असाई चीन’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे.
दुर्दैव बघा, १९५५च्या दरम्यान अमेरिकेने भारताला ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’तील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी विचारले होते. त्यावेळी अमेरिका, ‘भारत हा आशियाचा सर्वांत मोठा लोकशाही प्रतिनिधी आहे’ असे मानत होता. संयोगाने याच सुमारास ‘सोव्हिएत युनियन’नेही वेगळ्या संदर्भात भारतासाठी स्थायी सदस्यत्वाचा प्रस्ताव सुचवला होता. आपल्या देशाचे दुर्भाग्य, जवाहरलाल नेहरूंनी ते दोन्ही प्रस्ताव फेटाळले आणि त्या जागेसाठी चीनची जोरदार शिफारस केली.
आपला सगळ्यात मोठा शेजारी देश होता चीन. बघता-बघता त्याने तिबेट गिळंकृत केले. १९५९ मध्ये त्याने तिबेटला आपल्या ताब्यात घेतले. आपण याचा पुरेसा विरोध तर केला नाहीच. उलट, पंतप्रधान नेहरू, चिनी राष्ट्रपती चाऊ एन लायसोबत ‘हिंदी चिनी भाई भाई’चा राग आळवत राहिले.
ही घोषणा पोकळ ठरवत, चीनने दि. २० ऑक्टोबर १९६२ रोजी भारतावर जबरदस्त आक्रमण केले. दुर्दैवाने आपल्या सैन्याची अशा आक्रमणाच्या प्रतिकारासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी नव्हती. आपण पुरेसे शस्त्रसज्ज तर नव्हतोच; पण बर्फाळ प्रदेशात लढण्याच्या स्थितीतही नव्हतो. परंतु, तरीही आपल्या सैनिकांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत, या चिनी आक्रमणाचा हिमतीने सामना केला.
पुस्तकाचे मूल्य : ३००/- रु.
सवलत मूल्य : २७०/- रु.
पोस्टेज ४०/- रु.
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८/८३६९३१९०९१
लेखक- प्रशांत पोळ