आधी स्वतःच्या शरीरात जगा, मग जगात : डॉ. विशाल चतुर्वेदी

    29-Nov-2026

Hanuman Ansh director Vishal Chaturvedi 
 
सुप्रसिद्ध नीम करोली बाबा यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा वेध घेणार्‍या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले. यंदाच्या वर्षी अधिराज्य गाजवले. ५७व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’(इफ्फी)देखील या चित्रपटाचे प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी ‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी यांना ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (भारतीय चित्रपट)’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने चित्रपटाची संकल्पना, निर्मितीप्रक्रिया, संगीत आणि त्यामागील आध्यात्मिक विचार, याविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने डॉ. विशाल चतुर्वेदी यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
 
‘हनुमान अंश’ हा चित्रपट साकारण्यामागची प्रेरणा काय होती?
 
या चित्रपटामागे आत्मशोधाची भावना आहे. नीम करोली बाबा यांचे जीवन आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास मला नेहमीच आकर्षित करत होता. त्यांच्या जीवनातील विचार, साधेपणा आणि शिकवण यांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी मलाही अगदी नव्याने समजल्या. माझ्या आईनेही मला या विषयाचा अधिक शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच या चित्रपटाची कल्पना आकाराला आली.
 
‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे तत्त्वज्ञान ‘आधी स्वतःच्या शरीरात जगा, मग जगात’ असे आहे. या विचाराचा नेमका अर्थ काय?
 
माणूस सतत बाहेरच्या जगाचा विचार करत असतो. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, स्वतःला समजून घेण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. स्वतःच्या अस्तित्वाची, शरीराची आणि मनाची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. स्वतःला ओळखल्यानंतरच आपण जगाकडे अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. ‘आत्मशोध’ हा आध्यात्मिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे.
 
नीम करोली बाबा यांच्या जीवनातील कोणत्या पैलूने तुम्हाला सर्वाधिक प्रभावित केले?
 
नीम करोली बाबा यांचा साधेपणा आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला विशेष भावला. अध्यात्म म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा एखादी विशिष्ट जीवनशैली नव्हे; तर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे आणि माणुसकी जपणे, हा विचार त्यांच्या जीवनातून जाणवतो. हाच अनुभव चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
आध्यात्मिक विषयावर चित्रपट करताना संशोधन आणि प्रत्यक्ष ठिकाणांचे महत्त्व किती होते?
 
अशा विषयावर चित्रपट करताना केवळ कथा सांगणे पुरेसे नसते. त्या व्यक्तिमत्त्वाचा विचार आणि त्याच्याशी जोडलेल्या ठिकाणांचा अनुभव समजून घेणे आवश्यक असते. चित्रकूट येथील ज्या खोलीत नीम करोली बाबा भक्तांसोबत भोजन करत असत, तीच प्रत्यक्ष खोली चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अशा जागांमुळे चित्रपटाला एक वेगळी अनुभूती मिळते.
 
चित्रपटाचे बजेट मर्यादित असूनही, त्याची मांडणी प्रभावीपणे करण्याचे आव्हान आपण कसे पेलले?
 
चित्रपटाच्या विषयाला साजेशी साधी निर्मिती ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. एका मध्यम बजेटच्या हिंदी चित्रपटाच्या तुलनेत जवळपास दहाव्या भागाइतया बजेटमध्ये आम्ही हा चित्रपट तयार केला. प्रत्येक गोष्ट भव्य असली पाहिजे, असे नाही. कधीकधी साधेपणातूनही प्रभावी आशय मांडता येतो. चित्रपटाच्या निर्मितीमध्येही हाच दृष्टिकोन ठेवला.
 
दिग्दर्शक म्हणून चित्रपटातील कलाकार आणि संगीतकारांना काम करताना किती स्वातंत्र्य दिले?
 
माझ्या मते, दिग्दर्शकाने कलाकारांना केवळ सूचना देत राहण्यापेक्षा त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. कलाकारांना स्वतःच्या पद्धतीने भूमिका साकारण्याची संधी दिली, तर त्यातून अधिक चांगले काम घडते. संगीताच्या बाबतीतही हाच दृष्टिकोन ठेवला. पार्वती गीताचे मूळ स्वरूप जपण्याचा प्रयत्न केला. त्यात कमीत कमी बदल केले. तसेच ११व्या शतकातील नाथपंथीय योगी गोरक्षनाथ यांच्या दोह्यांपासून एका गीताची प्रेरणा घेतली आहे.
 
‘भगवद्गीते’तील कोणता विचार तुमच्या वैयक्तिक जीवनावर प्रभाव टाकतो?
 
‘भगवद्गीते’तील कर्म करत राहण्याचा आणि फळाची अपेक्षा न ठेवण्याचा विचार मला नेहमीच प्रेरणा देतो. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. त्याचे फळ काय मिळेल, याचा अतिविचार करू नये. हा विचार केवळ चित्रपटनिर्मितीसाठीच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचा आहे.
 
‘हनुमान अंश’ हा तीन चित्रपटांच्या मालिकेतील पहिला भाग आहे. तेव्हा प्रेक्षकांना पुढील चित्रपटांमधून नेमके काय पाहायला मिळणार आहे?
 
होय, ‘हनुमान अंश’ हा तीन चित्रपटांच्या मालिकेतील पहिला चित्रपट आहे. लक्ष्मीनारायण यांच्या जीवनप्रवासातून ही कथा पुढे जाते. उत्तर भारतातील त्यांचा प्रवास, या प्रवासात भेटणारे संत आणि सामान्य माणसे, त्यातून त्यांना मिळणारे अनुभव आणि उलगडत जाणारे जीवनाचे तत्त्वज्ञान, हे या मालिकेचे महत्त्वाचे पैलू आहेत. या प्रवासातून नीम करोली बाबा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
आजच्या तरुणपिढीने या चित्रपटातून नेमकी काय प्रेरणा घ्यावी, असे तुम्हाला वाटते?
 
आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत आहे. मात्र, या प्रवासात आपण स्वतःपासून दूर जात आहोत का, याचा विचार करणे गरजेचे आहे. स्वतःला जाणून घेणे, साधेपणाने जगणे आणि माणुसकी जपणे हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःच्या आयुष्याकडे आणि विचारांकडे अंतर्मुख होऊन पाहावे, हीच अपेक्षा आहे.
 
लेखक- कपिल देशपांडे
 




संबंधित मजकूर