माणसे जोडणारा, नाती जपणारा आणि कर्तव्याला प्राधान्य देणारा प्रवास करत व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आणि माणुसकीचा सुंदर संगम असणार्या विलास यशोदा मुरलीधर बोडके यांच्याविषयी...
काही माणसांची ओळख त्यांच्या पदामुळे, काहींची कामामुळे; पण काही माणसे अशी असतात की, त्यांची खरी ओळख त्यांच्या स्वभावातून, माणसांशी जोडलेल्या नात्यांतून आणि त्यांनी आयुष्यभर जपलेल्या माणुसकीतूनच होते. विलास यशोदा मुरलीधर बोडके हे असेच एक व्यक्तिमत्त्व! प्रशासकीय कामकाजातील शिस्त, जबाबदारीचे भान, सामाजिक जाणिवांची ओढ आणि माणसांशी आपुलकीने जोडण्याचा स्वभाव, याचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात आशेवाडी हे त्यांचे मूळ गाव. ऐतिहासिक रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाच्या मातीशी त्यांची नाळ, आजही घट्ट जोडलेली आहे. ज्या भूमीने इतिहासाच्या शौर्यगाथा पाहिल्या, त्याच भूमीत त्यांच्या जीवनप्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षणासाठी मामांचे घर गाठावे लागले. मामांच्या घरी मोरवाडी (सिडको) येथे राहून, पाचवीपासून ते वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या मामांनी घेतली होती.
ग्रामीण वातावरणातून शहरात येऊन शिक्षण घेताना आलेले अनुभव, कष्ट आणि संघर्षाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच ओळख दिली. शिक्षण पूर्ण झाल्यावर १९९६ मध्ये धुळ्यातील जिल्हा माहिती कार्यालयात साहाय्यक म्हणून, त्यांनी शासकीय सेवेचा श्रीगणेशा केला. छोट्या पदावरून सुरू झालेला हा प्रवास, पुढे अनेक महत्त्वाच्या जबाबदार्यांपर्यंत पोहोचला. २००३ मध्ये माहिती साहाय्यक म्हणून मालेगाव येथे त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पुणे येथेही त्यांनी काम केले.
२०१० मध्ये साहाय्यक संचालक या ‘गट ब’च्या पदावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मंत्रालय, मुंबई येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. याच सेवाकाळात अनेक मंत्र्यांचे विभागीय संपर्क अधिकारी म्हणूनही कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती. राज्यशासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचे वितरण अधिकारी ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. २०१७ मध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जळगाव येथे त्यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. जून २०१८ मध्ये धुळे जिल्हा माहिती अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर २०२१ मध्ये धुळ्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाल्यावर, नंदुरबार जिल्ह्याचाही अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक कार्यालय आणि प्रत्येक जबाबदारीने त्यांच्या अनुभवविश्वात नवी भर घातली.
जिल्हा माहिती अधिकारी म्हणून शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि उपक्रम माध्यमांच्या सहकार्याने जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कार्यालयात एखादा सहकारी अडचणीत असेल, कुणाला मदतीची गरज असेल किंवा कुणाच्या कामात काही अडथळा निर्माण झाला, तर शक्य तेवढी मदत करण्यासाठी पुढाकार घेणे हा त्यांचा स्थायीभाव! पदाचा बडेजाव न मिरवता सहकार्यांशी आपुलकीने वागणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी मदतीला धावून जाणे, या गुणांमुळे त्यांनी कार्यालयातील नात्यांचे रूपांतर जिव्हाळ्याच्या मैत्रीत केले. त्यांच्या मित्रपरिवाराचा विस्तार हा त्यांच्या संपर्कांचा परिणाम नसून, त्यांनी माणसांशी जपलेल्या आत्मीयतेचाच प्रत्यय ठरावा.
त्यांच्या जीवनात सामाजिक कार्याचा स्थान महत्त्वाचे. शालेय जीवनात खो-खो, कुस्ती, कबड्डी या खेळांत त्यांनी सहभाग घेतला. खेळामुळे विकसित होणारी संघभावना, शिस्त आणि जिद्द हे गुण त्यांच्या स्वभावात रुजले. ‘केटीएचएम’ महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या ‘नेव्हल शाखे’चे ‘कॅडेट’ म्हणूनही त्यांनी काम केले. सन १९९१ मधील कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना, सार्वजनिक सेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष घेतला. या अनुभवांनी समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिकच व्यापक केली.
‘ड्रायव्हिंग’ आणि पर्यटन ही त्यांची आवड. नवनवीन ठिकाणे पाहणे, निसर्गाचा आनंद घेणे, प्रवासातून नवे अनुभव मिळवणे आणि त्यातून माणसांशी संवाद साधण्यातून त्यांना आनंद मिळतो. प्रवास त्यांच्या दृष्टीने केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे नसून, नव्या माणसांना भेटण्याची, नवी नाती जोडण्याची आणि आयुष्य अधिक समृद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात कार्यालयीन सहकारी, मित्र, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा मोठाच गोतावळा निर्माण झाला आहे.
खरेतर एखाद्याचे यश मोजताना त्याने किती पदे भूषविली, किती जबाबदार्या सांभाळल्या किंवा किती ठिकाणी काम केले, यापेक्षा त्याने किती माणसे जोडली, किती जणांना आधार दिला आणि किती जणांच्या चेहर्यावर समाधान उमटले, हे अधिक महत्त्वाचे. विलास यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना याच गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. यापुढेही त्यांना निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!