जगातील नागरी कायदे आणि भारताचा ‘समान नागरी कायद्यां’चा अपूर्ण प्रवास!

    28-Nov-2026

Uniform Civil Code (UCC) 
 
‘समान नागरी कायदा’ या महत्त्वपूर्ण विषयाचा सर्वांगीण वेध घेणारी विशेष लेखमाला... इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि घटनात्मक भूमिकेपासून महाराष्ट्राच्या भवितव्यापर्यंत विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह या लेखमालेतून करण्यात येत आहे.
 
दि. १७ फेब्रुवारी १९२६ रोजी मुस्तफा केमाल अतातुर्क यांच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानने स्वित्झर्लंडच्या नागरी संहितेच्या धर्तीवर सर्व नागरिकांसाठी ‘समान नागरी कायदा’ स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यावेळी इस्लाम हा तुर्कस्तानचा राजधर्म होता. राजधर्माची तरतूद १९२८ मध्ये संविधानातून वगळण्यात आली, तर १९३७ मध्ये धर्मनिरपेक्षतेला घटनात्मक स्थान मिळाले. म्हणजेच, इस्लाम राजधर्म असतानाच तुर्कस्तानने धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची मुहूर्तमेढ रोवली होती. बहुपत्नित्वावर बंदी, नागरी विवाह, न्यायालयीन घटस्फोट आणि मुलगा-मुलगी यांना समान वारसाहक्क ही त्या कायद्याची वैशिष्ट्ये होती. पुढे २००२ पासून लागू झालेल्या नव्या संहितेने कुटुंबप्रमुख म्हणून पतीला असलेले विशेष स्थान रद्द करून पती-पत्नीला समान अधिकार दिले.
 
नागरी कायदे बदलण्याचे मुस्लीमजगतातील तुर्कस्तान हे एकमेव उदाहरण नाही. ट्युनिशियाने १९५६ मध्येच बहुपत्नित्वावर बंदी घातली आणि घटस्फोटासाठी न्यायालयाचा आदेश अनिवार्य केला. उझबेकिस्तान, किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही बहुपत्नित्वास कायदेशीर प्रतिबंध आहे. ‘इस्लामी सहकार्य संघटने’चे जगभरात ५७ सदस्यदेश असले, तरी त्यांच्या कौटुंबिक कायद्यांत बरेच वैविध्य आहे. युक्सेल सेझगिन यांनी २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनात मुस्लीम वैयक्तिक कायदे लागू असलेल्या ३५ मुस्लीमबहुल आणि १८ मुस्लीम अल्पसंख्याक देशांचा अभ्यास केला. १९४६ ते २०१६ या काळात मुस्लीमबहुल देशांनी आपल्या वैयक्तिक कायद्यांच्या मूळ तरतुदींमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर दिल्याचे त्यातून दिसते.
 
पाकिस्तानात दुसर्‍या विवाहासाठी लवादाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते, तर सौदी अरेबियाने २०२२ मध्ये कौटुंबिक कायद्यांची स्वतंत्र संहिता केली. दोन्ही देशांत बहुपत्नित्वाला आजही मान्यता आहे. बहुपत्नित्वावर निर्बंध घालणे आणि स्त्री-पुरुषांना समान वैवाहिक अधिकार देणे, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे; मात्र इस्लामी राष्ट्रांमध्येही धार्मिक वैयक्तिक कायदे विधिमंडळाच्या अधिकारापलीकडे नाहीत, हे या उदाहरणांवरून स्पष्ट होते.
 
अमेरिकेत विवाह, घटस्फोट आणि वारसाहक्काचे कायदे प्रामुख्याने राज्यांच्या अधिकारात असल्याने ते राज्यानुसार बदलतात; धर्मानुसार नव्हे. ऑस्ट्रेलियात १९६१च्या विवाह कायद्याने देशभर विवाहासाठी समान नियम निश्चित केले असून बहुविवाह दंडनीय आहे. धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचे स्वातंत्र्य असले, तरी विवाहाची कायदेशीर वैधता ठरवण्याचे निकष सर्वांसाठी समान आहेत. फ्रान्स आणि जर्मनीतही धर्मनिरपेक्ष कौटुंबिक कायदे आहेत, तर ब्राझीलच्या संविधानातील ‘अनुच्छेद २२६’ धार्मिक विवाहांना कायद्यानुसार मान्यता देतानाच पती-पत्नींच्या समान अधिकारांची हमी देतो. संस्कारांचे वैविध्य जपण्यासाठी नागरी कायद्यांची विभागणी करण्याची आवश्यकता नाही, हे या देशांच्या अनुभवातून दिसते.
 
जगातील ही परिस्थिती पाहता, भारतात १९३७ मध्ये ‘शरियत’चा कायदा कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आला, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. तत्कालीन मुंबई प्रांतातील खोजा, कच्छी मेमन यांच्यासह अनेक मुस्लीम समुदायांत वारसाहक्काच्या बाबतीत हिंदू कायद्याचा आणि स्थानिक रूढींचा प्रभाव होता. या परंपरांऐवजी ‘शरियत’ लागू करण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने सातत्याने मोहीम चालवली. अखेरीस १९३७च्या अधिनियमाने विवाह, तलाक, मेहर, निर्वाहभत्ता आणि वारसाहक्क यांसारख्या विषयांत परस्परभिन्न स्थानिक प्रथांऐवजी मुस्लीम समाजाला ‘शरियत’च्या एका व्यापक कायदेशीर चौकटीखाली आणले.
 
हिंदू समाजाशी साधर्म्य असलेल्या स्थानिक कायदेपरंपरांपासून फारकत घेऊन मुस्लीम समाजाचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व अधोरेखित करण्याचा मोहम्मद अली जिना आणि मुस्लीम लीगचा प्रयत्न होता. पुढे १९३८च्या ‘कच्छी मेमन अधिनियमा’नेही त्या समुदायासाठी मुस्लीम वारसाकायदा बंधनकारक केला. मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मुस्लीम राजकीय अस्मिता घडवण्याच्या प्रयत्नांना या कायद्यांनी हातभार लावला आणि १९४० मध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला औपचारिक स्वरूप मिळाले.
 
स्वातंत्र्यानंतर हिंदू कायद्यांची व्यापक पुनर्रचना झाली, त्याचप्रमाणे मुस्लीम वैयक्तिक कायद्यांतही व्यापक सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, हिंदू कायद्यात बदल होत असताना १९३७च्या कायद्याची मूलभूत चौकट कायम राहिली. त्याची कारणमीमांसा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. वस्तुतः भारताला ‘समान नागरी कायद्या’साठी परदेशी दाखल्यांची कुबडी घेण्याची गरज नाही; मात्र, नागरी कायद्यांच्या संदर्भातील जागतिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, म्हणून हा लेखनप्रपंच. संविधानाच्या ‘अनुच्छेद ४४’ने ‘समान नागरी संवेदे’चे(संविधे’चे) उद्दिष्ट निश्चित केले आहे, तर ‘अनुच्छेद ३७’ने त्यासाठी प्रयत्न करणे हे राज्याचे कर्तव्य ठरवले आहे. त्या दिशेने आता महाराष्ट्राने पाऊल टाकले आहे. उशीर झाला, हे खरे; पण ‘देर आये, दुरुस्त आये’!
 




संबंधित मजकूर