मुंबई (Thiruparankundram Karthigai Deepam) : मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम टेकडीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपथून स्तंभावर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्यात आला. दीप प्रज्वलित होताच भाविकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. अनेक भाविक यावेळी भावूक झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. या पवित्र दीपाच्या प्रज्वलनासाठी ३० किलो तूप, ५० मीटर लांबीची सुती वात आणि पाच किलो कापूर वापरण्यात आला.
दीप प्रज्वलित करण्यावरून मंदिर आणि दर्गा यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही पारंपरिक धार्मिक विधी पार पडली. कार्तिगई दीपम सोहळ्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि न्यायमूर्ती व्ही. पार्थिबन यांची मंदिराचे रिसीव्हर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मंदिराचा प्रशासकीय कारभार आपल्या हाती घेण्याची जबाबदारी या दोघांवर सोपविण्यात आली होती. अखेर हा कार्यक्रम शनिवारी यशस्वीरीत्या पार पडला. दीप प्रज्वलनाच्या वेळी हजारो भाविक उपस्थित होते. (Thiruparankundram Karthigai Deepam)
मदुराईच्या तिरुपरंकुंद्रम टेकडीवर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्यावरून सुरू असलेल्या वादाचे मुख्य कारण म्हणजे दीप प्रज्वलित करण्याचे ठिकाण आणि त्या जागेवरील मालकी हक्क. या टेकडीवर अरुलमिगु सुब्रमणियस्वामी मंदिरासोबतच सिकंदर बदुशा दर्गाही आहे. टेकडीवरील काही भागांच्या मालकी हक्कावरून आणि वापरावरून मंदिर व दर्गा यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. १९२० मध्ये या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. (Thiruparankundram Karthigai Deepam)
सन १९२३ मध्ये न्यायालयाने टेकडीचा बहुतांश भाग मंदिराची मालमत्ता असल्याचे मान्य केले, तर दर्ग्याच्या आसपासचा काही भाग मुस्लिम पक्षाच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले.
सध्याचा वाद टेकडीच्या शिखराजवळ असलेल्या एका दगडी स्तंभासंदर्भात आहे. हिंदू भाविकांच्या मते, हा दीपथून म्हणजेच पारंपरिकरीत्या दीप प्रज्वलित करण्यासाठी वापरला जाणारा स्तंभ आहे. त्यामुळे येथे कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. हा स्तंभ दर्ग्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर आहे. दुसरीकडे, दर्ग्याशी संबंधित पक्षांनी या जागेवरील अधिकार आणि तेथे जाण्याच्या मार्गाबाबत आक्षेप घेतले आहेत. (Thiruparankundram Karthigai Deepam)
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय?
हा वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने दीपथून स्तंभावर दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली होती. मात्र, तामिळनाडू सरकार आणि अन्य पक्षांनी या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी एकदाच दीपथून स्तंभावर दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली होती. तसेच २४ नोव्हेंबर रोजी हा सोहळा आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्या दिवशी वादग्रस्त स्तंभावर दीप प्रज्वलित करण्यात आला नाही. त्याऐवजी यापूर्वीपासून वापरात असलेल्या दुसऱ्या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यात आला. या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने २८ नोव्हेंबरला दीपथून स्तंभावर दीप प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मंदिराचे विश्वस्त मंडळ निलंबित करून प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायमूर्तींची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली. तसेच सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) सोपविण्यात आली.
विजयी भाला धारण करणाऱ्या भगवान मुरुगनांचा जयजयकार असो! भगवान मुरुगन आपल्या सदैव विजयी असलेल्या भाल्याने दुष्ट शक्तींचा संहार करतात, तर कार्तिगई दीपमचा दिव्य प्रकाश अंधकार दूर करतो. भगवान मुरुगन सर्वांना आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करोत, अधर्माचा विनाश करोत आणि सर्वांना सद्बुद्धी व विवेकाचा आशीर्वाद देवोत. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री (Thiruparankundram Karthigai Deepam)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक