धार्मिक विटंबनेचा बाजार

    28-Nov-2026   

Religious Mockery in Political Protests
 
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहेच. मात्र, या अधिकाराचा वापर करताना विवेक, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता यांचे भानही तितकेच महत्त्वाचे. दुर्दैवाने आंदोलनाच्या नावाखाली काहीजणांकडून या मर्यादाच जाणीवपूर्वक धूसर केल्या जात असल्याचे चित्र दिसते. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याभोवती निर्माण झालेला अलीकडचा वाद त्याचेच उदाहरण. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभिजीत दीपकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी ‘हनुमान चालीसे’च्या चालीवर आधारित कथित ‘मोदी चालीसा’ वाजवली. त्यांच्या या कृतीनंतर ‘हनुमान चालीसे’सारख्या श्रद्धेच्या प्रतीकाचा वापर एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची खिल्ली उडवण्यासाठी करणे कितपत योग्य, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला. ‘सीजेपी’च्या या अशा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलनाचा मूळ विषयच मागे पडतो. आंदोलनाच्या नावाखाली वाटेल ते उद्योग करण्याचा परवाना मिळत नाही, हे दीपकेंनी आधी समजून घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची असेल, त्यांच्या धोरणांना विरोध करायचा असेल, सरकारला जाब विचारायचा असेल, तर जरूर विचारा. लोकशाहीने त्यासाठीच अधिकार दिले आहेत. पण, त्यासाठी ‘हनुमान चालीसे’सारख्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानाचे विडंबन करण्याची मुळी गरजच काय?
 
हिंदू देव-देवतांची टिंगल केली की, आपण फार मोठे क्रांतिकारक ठरतो, असा काहींचा समज झालेला दिसतो. धार्मिक प्रतीकांचा उपहास करून सोशल मीडियावर काही क्षणांत प्रसिद्धी मिळू शकते. मात्र, आपल्या विरोधाची वैचारिक पातळी किती आहे, हेच यातून उघड होते. ‘हनुमान चालीसा’ ही केवळ काव्यरचना नाही. ती भक्ती, श्रद्धा आणि भावविश्वाचा भाग आहे. तिच्या चालीचा वापर राजकीय विडंबनासाठी केल्याने निर्माण होणारा आक्षेप समजून घेण्याची संवेदनशीलता नसेल, तर सामाजिक नेतृत्वाच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार तरी कसा मिळणार? दीपकेंभोवती निर्माण झालेला हा वाद पहिलाच नाही. दि. १८ जुलै रोजी जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्या बरखा त्रेहान यांनी त्यांच्यावर राम-सीतामातेच्या अपमानामुळे शाईफेक केली होती. आता पुन्हा कथित ‘मोदी चालीसा’च्या निमित्ताने तोच प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणजेच, हा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित वाद राहिलेला नाही; सार्वजनिक आंदोलनात धार्मिक संवेदनशीलतेचे भान किती राखले जाते, हाच खरा प्रश्न.
प्रसिद्धीचा आजार
 
आज देशातील तरुणाईसमोर बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, शिक्षणाचा वाढता खर्च, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी असे असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे, तरुणांना संघटित करणारे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व देशाला हवे आहे. मात्र, तरुणांच्या प्रश्नांपेक्षा वादग्रस्त कृतींनाच अधिक प्रसिद्धी मिळत असेल, तर आंदोलनाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवतो आहे का, याचा विचार ‘सीजेपी’ने केला पाहिजे. पण, झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनातून थोडा बोध त्यांनी घेतलेला दिसत नाही.
 
सोशल मीडियाच्या युगात काही सेकंदांचा व्हिडिओ हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. एखादे वादग्रस्त विधान, धार्मिक प्रतीकांची विटंबना किंवा एखाद्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची खिल्ली, यामुळे तात्पुरती प्रसिद्धी मिळू शकते. पण, व्हायरल होणे आणि विश्वासार्ह नेतृत्व निर्माण होणे, यात जमीन-अस्मानाचा फरक. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तिच्या भावनांना चिथावणी देण्यापेक्षा तिच्या प्रश्नांना भिडण्याचे धाडस दाखवावे लागते. स्वतःची स्वतंत्र ‘व्होटबँक’ किंवा राजकीय ओळख निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा असेल, तर ती विधायक कामातून सिद्ध करावी लागते; वादांच्या धुरात नव्हे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या निर्णयांवर टीका होणारच. परंतु, मोदींना विरोध करण्याच्या नादात हिंदूंच्या श्रद्धांना लक्ष्य करणे, हा कोणता राजकीय कार्यक्रम? मोदींच्या विरोधात बोलल्यानेच कोणी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ ठरत नाही. दीपकेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा अधिकार आहे; तो दुसर्‍यांच्या श्रद्धांचा अपमान करण्याचा परवाना नाही. देशातील तरुणाईला तुमच्याकडून राजकीय नौटंकी नको, तर प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. पंतप्रधानांचा अपमान करून स्वतःची उंची वाढत नाही आणि ‘हनुमान चालीसे’चे विडंबन करून विचारांची क्रांतीही घडत नाही. आंदोलन करा; पण श्रद्धेचा बाजार मांडू नका! तरुणाईचे नेतृत्व करायचे असेल, तर आधी तरुणांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहा. कारण, प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन क्षणभर चर्चेत येता येईल. मात्र, समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी विचारांची उंची आणि कृतीची प्रामाणिकता दाखवावीच लागते.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर