देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी कायमच महाराष्ट्रावर आघात केले. नुकतीच १८ वर्षे पूर्ण झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला अजूनही मुंबईकरांच्या स्मरणात आहे. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादाच्या धर्मांध विचारांचा प्रचार-प्रसार, सायबर गुन्हेगारीचा धोकाही अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर ‘फोर्स वन’ पथकाचे प्रशासकीय व कार्यकारी नियंत्रण ‘दहशतवादविरोधी पथका’कडे देण्याचा निर्णयही तितकाच महत्त्वाचा म्हणावा लागेल.
१९९३ पासून महाराष्ट्र सतत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे आणलेल्या स्फोटकांनी मुंबई परिसरात भीषण स्फोट करून शेकडो निरपराध लोकांचे आजवर बळी घेतले. परंतु, त्यातील आरोपींना शिक्षा देण्याच्या प्रयत्नात पुन्हा हल्ला होऊ शकेल, याकडे दुर्लक्ष झाले. दि. २६ नोव्हेंबर २००८ साली दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी असाच भ्याड हल्ला केला व त्यातही शेकडो निष्पाप भारतीय व परदेशी नागरिक जीवाला मुकले. त्यानंतरही झवेरी बाजारसारख्या ठिकाणी स्फोट करून दहशतवादी हल्ले चालूच राहिले. २००८ सालच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन पथके जाहीर केली. एक म्हणजे ‘दहशतवादविरोधी पथक’ व दुसरे प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी शस्त्रसज्ज व विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो दल म्हणून ‘फोर्स वन’.
‘दहशतवादविरोधी पथका’कडे गुप्त माहिती संकलन व विश्लेषण, दहशतवादाच्या अनुषंगाने ‘रॅडिकलायझेशन’ व ‘डिरॅडिकलायझेशन’संदर्भातील उपाययोजना, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांची नोंद व तपास ही जबाबदारी दिलेली होती. सद्यस्थितीत ‘दहशतवादविरोधी पथक’ व ‘फोर्स वन’ या दोन्ही विशेष पथकांचे प्रशासकीय नियंत्रण स्वतंत्र वरिष्ठ अधिकार्यांकडे असल्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात एकात्मिक नेतृत्व व समन्वय साधण्यात अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान, समन्वित व परिणामकारक करण्यासाठी राज्य सुरक्षा दलातील ‘फोर्स वन’ पथकाचे प्रशासकीय व कार्यकारी नियंत्रण यापुढे दहशतवादविरोधी पथक, महाराष्ट्र राज्य याच्या अधिपत्याखाली राहील, असा शासननिर्णय दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रसृत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र हा भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचे इंजिन आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. त्यामुळे मुंबई व आजूबाजूच्या परिसरात सतत देशविरोधी दहशतवादी कारवाया करणे, पाकिस्तानप्रणीत दहशतवादी संस्थांचे व विविध धार्मिक कडव्या संघटनांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुंबईजवळील भिवंडी भागात दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी ‘एनआयए’ने पडघा, जि. ठाणे व पुणे, मुंबई वगैरे ४४ ठिकाणी धाडी घालून १५ आरोपींना अटक केली होती. पडघा गावाला ‘अल् शाम’ नाव ठेवून त्याला सीरियाचा भाग म्हणून जाहीर करण्यात आले होते. यात दहशतवादी साकिब नाचन, मुलगा शामिल नाचन, भाऊ अकिब नाचन यांचा सामावेश आहे. या आरोपींनी मुंबईसह अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होती. त्यांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची तयारी होती. ड्रोनने हल्ला करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात होते. साकिब नाचन संघटनेत सहभागी होणार्यांना ‘बायथ’ म्हणजे ‘आयएसआयएस’साठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार हे त्याचे ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल. काश्मीरचे निमित्त करून या दहशतवादी संघटना सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असतात. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील सुशिक्षित मुस्लिमांमध्ये धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रसार करून त्यांची माथी भडकावण्याचे काम या संघटनांच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारच्या मूलतत्त्ववादाने, कट्टरतावादाने प्रभावित झालेले तालिबानी वृत्तीचे तरुण आपल्याला देशभरात अनेक ठिकाणी सापडत आहेत. नुकतीच कुर्ला येथील बागेत घडलेली घटना हेच अधोरेखित करते. दि. १५ ऑगस्ट २०२६च्या सुमारास पाकिस्तानी ‘आयएसआय’ या संस्थेचा सदस्या असलेल्या शहजाद भट्टीने भारतातील ३०० तरुणांना ‘रॅडिकलाईज’ करून त्यांना अमली पदार्थ, शस्त्रे, स्फोटके यांचे प्रशिक्षण दिल्याचे उघडकीस आाले आहे. त्यानंतर भारत सरकारने विविध राज्यातील पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत एकाच वेळी कारवाई करून ३००हून अधिक दहशतवाद्यांनी कोणतीही दुर्घटना करण्यापूर्वीच अटक केली व मोठा अनर्थ टळला. भारत सरकारने दहशतवादाशी लढताना ‘झिरो टॉलरन्स’ हे धोरण जाहीर केले आहे. तसेच कोणतेही दहशतवादी कृत्य म्हणजे, पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध समजले जाईल, असेही घोषित केले आहे. त्यामुळे येणार्या काळात दहशतवादविरोधी लढाई अनेक स्तरांवर प्रखरपणे लढणे गरजेचे होणार आहे.
त्यातील काही प्रमुख म्हणजे, सायबर गुन्हे व सायबर हल्ले. दुसरे अस्त्र अमली पदार्थांचा सर्रास व्यापार, तिसरे खोट्या नोटांचा चलनात उपयोग, चौथे आहे परकीय लोकांना अवैध मार्गाने देशात घुसवणे, पाचवे आहे ‘ओटीटी’चा वापर व सोशल मीडिया. हे सर्व आणि याच्यासारखे अनेक हल्ले हे पाकिस्तानने भारताविरुद्ध चालवलेले अघोषित युद्धच आहे. त्यामुळे या सर्व गुन्ह्यांचा एकत्रित विचार करून दहशतवादाविरुद्धचे धोरण व कायदे करण्याची आवश्यकता आहे.
आज जवळजवळ प्रत्येक सायबर गुन्ह्यातील रक्कम काही सेकंदात पाकिस्तान अथवा चीनमध्ये पोहोचते, असे अनेक तपासांत आढळून आले आहे. अनेक गरीब लोक आपले बँक खाते दहा हजार रुपयांसाठी सायबर ठगांना वापरायला होकार देतात. अशा प्रकारची हजारो ‘म्यूल’ खाती तपासात निष्पन्न झाली आहेत. मलेशियात ‘व्हिसा’शिवाय जाता येत होते, त्याचा गैरवापर करून अनेक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून मलेशियामार्गे लाओस, म्यानमार येथे नेऊन तिथे ‘सायबर गुलाम’ म्हणून त्यांना डांबले जात होते. दि. १ जानेवारीपासून आता मलेशियात जायला ‘व्हिसा’ आवश्यक करण्यात आला आहे. तसेच अनेक गुन्ह्यांत बँकेचे अधिकारी, तसेच काही वकीलही सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. विमाने, शाळा, न्यायालये यांना बॉम्ब ठेवल्याचे खोटे संदेश पाठवून सर्व व्यवहार मोडकळीस आणणे, हाही सायबर गुन्ह्यांचाच प्रकार आहे. त्यावरून येणार्या काळात या गुन्ह्यांविरुद्ध सर्व समाजाला विश्वासात घेऊन ही लढाई जिंकावी लागणार आहे.
२०१६च्या नोटाबंदीनंतर काही वर्षे खोट्या चलनी नोटांवर आळा बसला होता. परंतु, पुन्हा हे गुन्हे वाढू लागले आहेत. रोख पैसे म्हणजे काळा पैसा व दहशतवादाला सक्रिय मदत करणे. त्यामुळे प्रत्येकाने फक्त ‘यूपीआय’नेच पैसे द्यायचे किंवा घ्यायचे, असा निश्चय करून त्याप्रमाणे जाणीवपूर्वक वागणे आवश्यक आहे. २०२१ पासून ‘आयएसआय’च्या 'Inter Services Public Relations (ISPR)' या संस्थेला ‘ओटीटी’चा वापर करून भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. पाकिस्तानात बनवलेल्या कोणत्याही मालिका, सिनेमे, पॉडकास्ट, सिनेमातील गाणी ‘नेटफ्लिस’वर दाखवली जाणार नाहीत, असे आश्वासन जून २०२५ मध्ये कंपनीने दिले होते. ‘नेटफ्लिस’ त्याप्रमाणे वागतेय का, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गृहमंत्रालयाने नुकतेच सर्व सैन्यदले, तसेच शासकीय कर्मचार्यांना सूचना केली आहे की, समाजमाध्यमे विशेषतः ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप्स वापरून अनेक पाकिस्तानी खोट्या नावाने वावरत आहेत. त्यातून खोटी माहिती पसरवणे व देशाविरुद्ध वातावरण बिघडवणे, हे प्रकार चालू आहेत. त्यामुळे सामान्य लोकांनीसुद्धा माहितीची देवाणघेवाण करताना आपण देशविरोधी माहिती-व्हिडिओ पसरवत नाही ना, याची खात्री करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात दि. १४ नोव्हेंबर रोजी जर्मन सरकारने घटनादुरुस्ती करून गुप्तचर यंत्रणांना केवळ राष्ट्रविरोधी माहिती गोळा करण्याच्या पलीकडे जाऊन, दहशतवादी ताकदींच्या दुष्ट कारवायांची साखळी तोडण्याचे एकत्रित अधिकार दिले आहेत, याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वर उल्लेखिलेल्या निर्णयानंतर ‘दहशतवादविरोधी पथक’ या सर्व बाबींवर अधिक प्रभावीपणे कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे. केवळ शासन, पोलीस, सुरक्षा दले या गोष्टींविरुद्ध लढू शकणार नाहीत, त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘पोलीसमित्र’, ‘सायबर योद्धे’ निर्माण करून त्यांना वारंवार प्रशिक्षण देऊन दहशतवादाविरुद्धचा लढा जिंकण्याची गरज आहे.
लेखक- प्रवीण दीक्षित (लेखक महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत.)