‘सही रे सही’पासून ‘गणा धाव रे’पर्यंत केदार शिंदे-भरत जाधवशी दिलखुलास गप्पा!

    28-Nov-2026
 
Kedar Shinde and Bharat Jadhav
 
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे ही जोडी बर्‍याच वर्षांनंतर ‘गणा धाव रे’च्या निमित्ताने एकत्र येत आहे. ही जोडी म्हटलं म्हणजे, प्रेक्षकांसाठी १०० टक्के मनोरंजनाची हमी! याचनिमित्ताने दोघांशी रंगलेल्या या दिलखुलास गप्पा!
 
केदार शिंदे यांचा सिनेमा म्हटला की प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची हमी ठरलेली. मात्र, ‘गणा धाव रे’च्या ट्रेलरमधून एका वेगळ्या सामाजिक आणि भावनिक विषयाची झलक पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा नेमकी कशी सुचली? तसेच बर्‍याच वर्षांनंतर तुमचा हुकमी एक्का, अर्थात भरत जाधव तुमच्यासोबत दिसणार आहे. हा प्रवास कसा घडला?
 
केदार शिंदे : या चित्रपटाचं संपूर्ण श्रेय सर्वप्रथम कथालेखक चैतन्य राणे याला द्यायला हवं. कारण, ही कथा माझ्या आयुष्यात अचानक आली. खरं तर, जुलै महिन्यात मी माझ्या मुलीचा दुसरा सिनेमा दिग्दर्शित करणार होतो. त्याचदरम्यान ही कथा माझ्याकडे आली. त्यांनी मला दिग्दर्शन करण्याची विनंती केली. मी कथा ऐकली आणि तिच्या प्रेमात पडलो.
 
विशेष म्हणजे, पहिल्यांदा मी दिग्दर्शक म्हणून नाही, तर एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्या कथेशी जोडला गेलो. कथेमध्ये इतका दम होता आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या की त्या मला भावल्या. त्यामुळे सामान्य प्रेक्षकालाही त्या नक्कीच भावतील, असा विश्वास वाटला.
 
भरतचं कास्टिंग आधीच निश्चित झालं होतं. भरत माझ्यासाठी या भूमिकेसाठी योग्य होता. मात्र, भरत काम करणार असेल, तर त्याच्याकडून काहीतरी वेगळं करून घ्यायला हवं, हा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर ओंकार दत्त आणि त्यांच्या टीमने पटकथा तयार केली. पटकथा वाचल्यानंतर मला जाणवलं की भरतला मी याआधी कधीच अशा पद्धतीने पाहिलेलं नाही.
हा एका कुटुंबाचा सिनेमा आहे. त्या कुटुंबावर आलेलं संकट बाप्पा कशा पद्धतीने परतवतो, ही त्याची भावनिक गोष्ट आहे. संकट आलं की, आपण सर्वसामान्य माणसं पहिल्यांदा देवाकडे धाव घेतो. आपली त्या दैवी शक्तीवर श्रद्धा असते. हीच भावना या चित्रपटाच्या कथेतून मांडण्यात आली आहे.
 
केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी म्हटलं की अनेकांना ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ आणि ‘जत्रा’ यांसारख्या कलाकृती आठवतात. इतक्या वर्षांच्या मैत्रीनंतर आणि एकत्र काम केल्यानंतर केदार शिंदे या दिग्दर्शकात काय बदल जाणवतो?
 
भरत जाधव : केदार नेहमीच त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन विचार करतो. एकांकिका स्पर्धेपासून मी त्याला पाहतोय. त्याच्याकडे नेहमी काहीतरी वेगळं करण्याची कल्पना असते. ‘सही रे सही’सारखं नाटक रंगमंचावर आणणं किंवा ‘श्रीमंत दामोदर पंत’सारखी कल्पना प्रत्यक्षात साकारणं, हे सोपं काम नाही.
 
‘जत्रा’सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असो किंवा ‘बाईपण भारी देवा’सारखा विषय, त्याच्या प्रत्येक कलाकृतीत काहीतरी वेगळेपण असतं. आजही अनेक तरुण भेटतात आणि सांगतात की ‘जत्रा’ने आमची पिढी घडवली. मात्र, मला त्याच्यात जाणवलेला महत्त्वाचा बदल म्हणजे, तो आता अधिक संवेदनशील आणि ‘मॅच्युअर’ झाला आहे. पूर्वी तो खूप चिडायचा. एखादा सीन स्वतः करून दाखवायचा आणि कलाकारांकडूनही तसाच परफॉर्मन्स अपेक्षित असायचा. त्याची एनर्जी प्रचंड असायची. आजही त्याची एनर्जी तशीच आहे; फक्त रागावण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याचा अनुभव आणि परिपक्वता आता त्याच्या दिग्दर्शनात अधिक जाणवते.
 
केदार शिंदे आणि भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव यांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ‘विनोदी अभिनेता’ ही प्रतिमा मोडून गंभीर भूमिकांकडे वळण्याचा तुमचा प्रयत्नही गेल्या काही वर्षांत दिसतो. हा बदल कसा घडला?
 
भरत जाधव : चौकट मोडण्यासाठी मला २०१६ मध्ये माझी सगळी कामं थांबवावी लागली. सतत त्याच त्याच प्रकारच्या भूमिका येत होत्या. मीसुद्धा त्याला कंटाळलो होतो. निर्माते आणि दिग्दर्शक माझ्याकडे त्याच पद्धतीच्या भूमिकांची मागणी करत होते. त्यामुळे कुठेतरी थांबणं गरजेचं होतं.
 
२०१६ मध्ये मी काम थांबवलं. त्यानंतर हळूहळू वेगळ्या प्रकारच्या कलाकृती माझ्याकडे येऊ लागल्या. ‘कोरोना’नंतर ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका केली. त्यानंतर ‘अस्तित्व’सारखं नाटक केलं. या नाटकामुळे मला वेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळाली.
 
माझ्याकडे नवीन दिग्दर्शक आणि निर्माते येऊ लागले. त्यांनी मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्याचा विचार केला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मी अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. ‘पानसरे’सारख्या वेबसीरिजमधील भूमिकाही त्याच प्रवासाचा भाग आहे.
‘गणा धाव रे’मध्येही माझं पात्र केवळ विनोदी नाही. यात एक बाप आणि त्याची श्रद्धा हा भावनिक धागा आहे. त्यामुळे अभिनेता म्हणून मला वेगळं काहीतरी करण्याची संधी मिळाली.
 
तुमच्या दोघांच्या कामात एक वेगळी शिस्त आणि एकमेकांबद्दलचा विश्वास दिसतो. तुम्ही एकांकिकेपासून एकत्र काम करत आहात. आजही तुमचं नातं तितकंच घट्ट आहे का?
 
भरत जाधव : आम्ही एकांकिकेपासून एकत्र आहोत. आमचं नातं केवळ कामापुरतं मर्यादित नाही. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. आमच्याकडे मोकळा वेळ असला, तरी आम्ही एकांकिकेबद्दलच बोलायचो. अगदी व्यवसाय करण्याचा विचार करत असतानाही भाजीच्या स्टॉलवर बसून आमच्या चर्चा एकांकिकेभोवतीच असायच्या. आजही आमच्यात कामाविषयी तितकीच आस्था आहे. केदारने माझ्या जवळपास सगळ्या कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. एकांकिकेपासून ते आतापर्यंतचा आमचा प्रवास खूप मोठा आहे. ‘सही रे सही’सारखं नाटक आजही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतं. इतकी वर्षे झाली, तरी त्या नाटकाची मजा कमी झालेली नाही. मी स्वतःही ते नाटक आजही तितक्याच श्रद्धेने करतो.
 
भरत जाधव म्हटलं की ‘विनोदी भूमिका’ आणि ‘अफलातून टायमिंग’ हे समीकरण डोळ्यांसमोर येतं. मात्र, तुमच्या अभिनयातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समोरच्या कलाकाराच्या अभिनयाला दिलेली प्रतिक्रिया. याबद्दल काय सांगाल?
 
केदार शिंदे : भरतची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचं प्रतिक्रिया देणं. तो स्वतः किती चांगलं काम करतो, यापेक्षाही समोरचा कलाकार काय करतो आणि त्यावर तो कशी प्रतिक्रिया देतो, हे खूप महत्त्वाचं असतं. मी दिग्दर्शक म्हणूनही बोलतोय आणि त्याचा मित्र म्हणूनही. त्याच्या अनेक भूमिका मी पाहिल्या आहेत. त्या विनोदी असोत किंवा गंभीर, प्रत्येक भूमिकेत तो समोरच्या कलाकाराचं काम खूप छान ऐकतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. त्यामुळे त्याच्या अभिनयाला एक वेगळी उंची मिळते.
 
आज ‘ओटीटी’, सोशल मीडिया आणि मनोरंजनाची अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत. अशा काळात मराठी चित्रपटांसमोर कोणती आव्हानं आहेत? मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, अशीही चर्चा असते. याकडे तुम्ही कसं पाहता?
 
केदार शिंदे : आपल्याकडे नेहमीच कथेला प्राधान्य दिलं गेलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ‘हिरो’ कोण आहे, यावर चित्रपट चालतो, असं कधीच नव्हतं आणि भविष्यातही तसं होणार नाही. मराठी रसिकांना चित्रपटगृहात यायचं असेल, तर त्यांना एक सशक्त कथानक हवं असतं. त्यातील एखादी गोष्ट त्यांच्या मनाला भिडली पाहिजे.
 
आपण कितीही सोशल मीडियावर जाहिराती केल्या, कितीही मार्केटिंग केलं, तरी शेवटी प्रेक्षक ट्रेलर पाहून चित्रपट बघायचा की नाही, हे ठरवतात. प्रेक्षक सुज्ञ आहेत. त्यांना काय पाहायचं आहे, हे ते स्वतः ठरवतात.
 
आज नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत. पुढील काही वर्षांत आणखी पर्याय वाढतील. मात्र, नाटक कधीच मरणार नाही; कारण ती जिवंत कला आहे. चित्रपटगृहात मिळणारा ‘७० एमएम’चा आनंदही वेगळाच आहे.
 
‘रामायण’सारख्या चित्रपटांना थिएटरमध्ये गर्दी होते; कारण प्रेक्षकांना तो अनुभव मोठ्या पडद्यावर घ्यायचा असतो. त्यांना ती गोष्ट पाहायची असेल, तर तिकिटाचे दरही अडथळा ठरत नाहीत. आपला मराठी प्रेक्षक जेवायला मिळालं नाही तरी चालेल, पण नाटक बघूया, चित्रपट बघूया, अशा वृत्तीचा आहे. भरतच्या नाटकाचे ३००-४०० प्रयोग पाहणारे प्रेक्षक आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा विश्वास संपादन करणं, ही आमची जबाबदारी आहे.
 
तुमच्या मते, एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट कोणती?
 
केदार शिंदे : माझ्या मते, यासाठी कल्पकता महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपल्याकडे नवनवीन कल्पना आहेत आणि त्या कल्पना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात, तोपर्यंत कोणत्याही माध्यमाला मरण नाही. मी नेहमी म्हणतो, आमचं काही दुकान नाही की माल ठेवला आहे आणि तो विकायचा आहे. हे दुकान बाप्पा चालवतात. जोपर्यंत बाप्पा आमच्या डोयात बुद्धी आणि शक्ती देत आहेत, तोपर्यंत आमच्याकडून कलाकृती सादर होत राहतील.
 
प्रत्येकाला आपली कलाकृती चांगलीच वाटत असते. आम्ही इथे बसलो आहोत, कारण आम्हाला आमचा चित्रपट चांगला वाटतो. इतर चित्रपटांच्या टीमलाही त्यांचा चित्रपट चांगलाच वाटत असतो. मात्र, शेवटी प्रेक्षक ठरवतात की कोणता चित्रपट पाहायचा. आम्ही आमचा प्रयत्न करायचा आणि तो रसिकांच्या चरणी अर्पण करायचा. अंतिम निर्णय प्रेक्षकांचाच असतो.
 
जवळपास १५ हजार प्रयोगांचा प्रवास तुम्ही केला आहे. इतकी वर्षे रंगभूमीवर काम करताना आजही तीच ऊर्जा आणि उत्साह कसा टिकवून ठेवता?
 
भरत जाधव : केदार हा माझ्या बहुतांश कलाकृतींचा दिग्दर्शक आहे. एकांकिकेपासून ते आतापर्यंत त्याने माझं काम जवळून पाहिलं आहे. आजही ‘सही रे सही’ पाहताना मी त्याला आश्चर्यचकित करतो, असं तो म्हणतो. एखाद्या दिग्दर्शकाला आपण इतया वर्षांनंतरही आश्चर्यचकित करू शकतो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला नेहमी वाटतं की, ‘सही रे सही’ हे नाटक माझ्या ‘डीएनए’मध्येच आहे. इतकी वर्षे झाली, तरी त्याची चव कमी झालेली नाही. मी आजही प्रत्येक प्रयोग तितक्याच श्रद्धेने करतो.
 
नाटक म्हणजे एक पंचपक्वान्नाचं ताट आहे. त्यातील प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आपण घेत असतो. मीही आजपर्यंत ‘सही रे सही’चा प्रत्येक प्रयोग त्याच आनंदाने करत आलो आहे. इतकी वर्षे कधी झाली, हे मलाच कळलं नाही.
 
(मुलाखत : कपिल देशपांडे)
 




संबंधित मजकूर