चित्रपट ही केवळ मनोरंजनाची कला नाही, तर ती एका देशाची संस्कृती, परंपरा, सामाजिक परिस्थिती, इतिहास आणि माणसांच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. भावनांना पडद्यावर आणणारा आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधील अंतर कमी करणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव! गोव्यात दरवर्षी आयोजित होणारा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘इफ्फी’ हे याचे उत्तम उदाहरण. जगभरातील विविध देशांतील चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, तंत्रज्ञ आणि चित्रपटप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणणारा असा हा ‘इफ्फी’ महोत्सव. त्यामुळे ‘इफ्फी’ हा केवळ चित्रपटांचा उत्सव न राहता, विविध संस्कृतींच्या संवादाचे आणि विचारांच्या देवाणघेवाणीचे केंद्र बनतो.
पडद्यावरून उलगडते जगाचे वास्तव!
प्रत्येक देशाचा चित्रपट त्या देशातील समाजजीवनाचे प्रतिबिंब असतो. एखाद्या देशातील राजकीय परिस्थिती, सामाजिक संघर्ष, आर्थिक विषमता, सांस्कृतिक परंपरा किंवा सामान्य माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील, तर त्या देशातील चित्रपट हे एक प्रभावी माध्यम ठरू शकतात. उदाहरणार्थ, किर्गिझस्तानच्या ‘स्कायलार्क’सारख्या चित्रपटातून सीमावाद, विस्थापन, पूर्वजांच्या आठवणी आणि माणसांच्या जगण्याचा संघर्ष समोर येतो. ही कथा एका विशिष्ट देशाची असली, तरी त्यातील भावना जगभरातील प्रेक्षकांना समजू शकतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांतील चित्रपटांतून तेथील लोककथा, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, स्त्रियांचे प्रश्न, युद्धाचे परिणाम आणि बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे चित्र पाहायला मिळते. अशा चित्रपटांमुळे प्रेक्षकांना स्वतःच्या देशाबाहेरील जग समजून घेण्याची संधी मिळते. जे वास्तव आपण कधी अनुभवलेले नसते, ते चित्रपटांच्या माध्यमातून जवळून अनुभवता येते.
भाषेच्या पलीकडे जाणार्या भावना!
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, भाषेची मर्यादा ओलांडण्याची क्षमता. एखादा चित्रपट स्पॅनिश, फ्रेंच, जपानी, किर्गिझ, कोरियन किंवा अन्य भाषेत असला, तरी त्यातील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. ‘सबटायटल्स’च्या माध्यमातून भाषेचा अडथळा दूर होतो; मात्र चित्रपटातील दृश्यभाषा, संगीत, अभिनय आणि कथानक प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडून ठेवतात. यातून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे संस्कृती वेगळ्या असल्या, तरी माणसांच्या भावना सार्वत्रिक असतात. एखाद्या परदेशी चित्रपटातील आई-मुलाचे नाते, कुटुंबासाठी केलेला संघर्ष किंवा न्यायासाठी उभा राहिलेला सामान्य माणूस भारतीय प्रेक्षकांनाही तितकाच जवळचा वाटू शकतो.
दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी जागतिक व्यासपीठ!
‘इफ्फी’सारखे आंतरराष्ट्रीय महोत्सव हे केवळ चित्रपट प्रदर्शनापुरते मर्यादित नसतात. ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी संवादाचे व्यासपीठ असतात. विविध देशांतील चित्रपट निर्मात्यांना एकमेकांच्या कामाची ओळख होते. त्यांच्या चित्रपटनिर्मितीच्या पद्धती, तांत्रिक प्रयोग, कथाकथनाची शैली आणि सांस्कृतिक दृष्टिकोन समजून घेता येतात. पत्रकार परिषदा, चर्चासत्रे, ‘मास्टरलासेस’ आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून नव्या कल्पनांना चालना मिळते. आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीचे मार्ग खुले होतात. एखाद्या भारतीय दिग्दर्शकाला परदेशातील निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळू शकते, तर परदेशी चित्रपट निर्मात्यांनाही भारतीय कथा आणि संस्कृतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता येते.
अशा महोत्सवांचा फायदा भारतीय चित्रपटसृष्टीलादेखील होतो. भारतातील विविध भाषांमधील चित्रपटांना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. मराठी, बंगाली, मल्याळी, तामिळ, आसामी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमधून भारताची सांस्कृतिक विविधता जगासमोर येते. विशेषतः मराठी चित्रपटांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. मराठी समाजजीवन, ग्रामीण वास्तव, शहरी बदल, लोककला, साहित्य आणि सामाजिक प्रश्न यांवर आधारित चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेक्षक मिळू शकतात. त्याचवेळी जागतिक चित्रपटांमधील नवे प्रयोग पाहून मराठी चित्रपट निर्मात्यांनाही वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची प्रेरणा मिळते. ‘इफ्फी’सारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ताकदीला व्यासपीठ देतात. ते केवळ जगभरातील चित्रपट एकत्र आणत नाहीत, तर वेगवेगळ्या संस्कृती, विचार, अनुभव आणि माणसांच्या कथा एकमेकांसमोर मांडतात. म्हणूनच अशा महोत्सवांचे महत्त्व पुरस्कार, ‘रेड कार्पेट’ किंवा चित्रपट प्रदर्शनापुरते मर्यादित नाही. कारण, सिनेमा ही एक अशी वैश्विक भाषा आहे, जिला समजून घेण्यासाठी शब्दांची गरज नसते; गरज असते ती फक्त संवेदनशील मनाची. आणि म्हणूनच चित्रपटांच्या माध्यमातून जग एकमेकांच्या अधिक जवळ येते.
लेखक- कपिल देशपांडे