चित्रपटसृष्टीत महिलांचे योगदान आता केवळ अभिनय किंवा पडद्यावरील भूमिकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. कथा लिहिण्यापासून दिग्दर्शन, निर्मिती, छायाचित्रण आणि तांत्रिक क्षेत्रांपर्यंत महिला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतात. ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI २०२६) महिला चित्रपट निर्मात्यांचा वाढता सहभाग आणि त्यांच्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमुळे ही बाब प्रकर्षाने दिसून आली.
यंदाच्या ‘इफ्फी’मध्ये तब्बल ५२ महिला चित्रपट निर्मात्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, स्पर्धात्मक विभागांमध्ये दहा महिला चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींना स्थान देण्यात आले आहे. ही आकडेवारी केवळ महिलांच्या सहभागाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर जागतिक सिनेमात महिला दिग्दर्शकांचा सर्जनशील दृष्टिकोन किती महत्त्वाचा ठरत आहे, हेही अधोरेखित करते.
दि. २४ नोव्हेंबर रोजी ‘इफ्फी’च्या निमित्ताने "Her Lens, Her Legacy, Her Liberty : Women Shaping World Cinema' या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नार्घिझा डोटीएवा, अलिना शेरबान आणि सुझान अॅण्ड्र्यूज कोरिया सहभागी झाल्या होत्या. भारतीय चित्रपट निर्माते अभिषेक जैन यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.
या चर्चेत महिला दिग्दर्शिकांना चित्रपट निर्मिती करताना येणार्या आर्थिक अडचणी, गुंतवणूकदारांकडून मिळणारा मर्यादित प्रतिसाद, लिंगभेद आणि ठरावीक साच्यातील स्त्रीप्रतिमांमधून बाहेर पडण्याचे आव्हान यावर चर्चा झाली. अलिना शेरबान यांनी रोमा समुदायाचे वास्तव मांडणार्या पटकथांना अपेक्षित आर्थिक पाठबळ मिळण्यात आलेल्या अडचणी सांगितल्या, तर सुझान यांनी महिलांना दिग्दर्शक म्हणून आपली क्षमता वारंवार सिद्ध करावी लागते, याकडे लक्ष वेधले. स्थानिक संस्कृती आणि स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहून केलेल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात, असा विश्वास या दिग्दर्शिकांनी व्यक्त केला.
महिलांसमोरील आव्हाने अजूनही कायम!
महिला दिग्दर्शिकांची संख्या वाढत असली, तरी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सहज-सोपा नाही. आर्थिक पाठबळ मिळवणे, मोठ्या निर्मिती संस्थांचा विश्वास संपादन करणे, स्वतःच्या विषयांना व्यावसायिक चौकटीबाहेर जाऊन मांडण्याचे स्वातंत्र्य मिळवणे, अशा अनेक पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागतो.
विशेषतः महिलांच्या अनुभवांवर आधारित कथा अनेकदा विशिष्ट सामाजिक चौकटीतून पाहिल्या जातात. मात्र, महिला दिग्दर्शिका आता केवळ महिलांचे प्रश्न मांडत नाहीत, तर राजकीय संघर्ष, युद्ध, विस्थापन, इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मानवी नात्यांसारख्या व्यापक विषयांनाही आपल्या चित्रपटांतून स्पर्श करत आहेत. ‘इफ्फी २०२६’मधील महिला दिग्दर्शिकांची उपस्थिती ही केवळ संख्यात्मक वाढ नाही, तर जागतिक चित्रपटसृष्टीतील बदलत्या विचारांची नांदी आहे. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या महिला दिग्दर्शिका आपल्या संस्कृती, अनुभव आणि सामाजिक वास्तवातून कथा सांगत आहेत. त्यांच्या कथा कधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, कधी विस्मृतीत गेलेल्या समुदायांना ओळख मिळवून देतात, तर कधी मानवी नात्यांमधील संवेदनशील पैलू उलगडतात.
महिला दिग्दर्शिका जेव्हा कॅमेर्यामागे उभ्या राहतात, तेव्हा पडद्यावर केवळ एक कथा साकारत नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही समोर आणतात. कारण, चित्रपटसृष्टीत स्त्रीला केवळ पडद्यावरची भूमिका नको, तर कथा सांगण्याचा, निर्णय घेण्याचा आणि स्वतःचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याचा अधिकारही हवा. ‘इफ्फी’मधील महिला दिग्दर्शिकांचा सहभाग याच बदलत्या चित्रपट-प्रवासाची साक्ष देतो!
भारतीय महिला दिग्दर्शिकांच्या कथांना जागतिक व्यासपीठ!
यंदाच्या ‘इफ्फी’मध्ये भारतीय महिला दिग्दर्शिकांनीही आपल्या वेगळ्या विषयांमधून लक्ष वेधले आहे. यामध्ये लीना यादव - ‘बिकमिंग’ : लडाखच्या पार्श्वभूमीवर अध्यात्म आणि नियती यांचा वेध घेणारा चित्रपट. मुस्कान अस्थाना - ‘सेव मिच्छर’ : भारतीय प्रादेशिक कथाविश्वातील वेगळा दृष्टिकोन मांडणारा चित्रपट. अनुपमा शारधी - ‘पिली चन्ने’ - तुळू भाषेतील चित्रपटातून प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन. अंतरा जी. जी. चौधरी - ‘सूर्यमुखी’ : आसामी भाषेतील कथाविश्वाला व्यासपीठ.
जिग्विषा काळे : मराठीतील स्त्री दिग्दर्शिकेचा संवेदनशील दृष्टिकोन
जिग्विषा काळेचा ‘तिघी’ हा मराठी चित्रपट ‘इफ्फी २०२६’च्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात प्रदर्शित झाला असून, ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ या पुरस्काराच्या स्पर्धेतही आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणार्या जिग्विषा काळेने ‘तिघी’ या चित्रपटातून नात्यांमधील गुंतागुंत, त्याग आणि न बोलल्या गेलेल्या भावनांचा संवेदनशील वेध घेतला आहे. त्यांच्या या चित्रपटातून मराठीतील स्त्री दिग्दर्शिकांचा स्वतंत्र आणि संवेदनशील दृष्टिकोन पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे. दिग्दर्शन केलेल्या पहिल्याच सिनेमाचा एवढ्या मोठया प्लॅटफॉर्मवर गौरव होणं अभिमानास्पद असल्याचं जिग्विषाने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तसेच ‘महिला दिग्दर्शक म्हणून अनुभव कसा होता?’ असे प्रश्नही विचारणं लवकर बंद व्हावं, अशी इच्छाही तिने यावेळी बोलताना व्यक्त केली. "पुरुष दिग्दर्शकांना कोणी असं विचारत नाही, मग महिला दिग्दर्शकालाच असा प्रश्न का विचारला जातो?” असा सवालही तिने उपस्थित केला.
लेखक- कपिल देशपांडे