मध्य अमेरिकेतील ‘माया’

    28-Nov-2026   
 
Guatemala Maya Indigenous People
 
निकेल, सोने आणि इतर खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या ग्वाटेमाला देशाचे मूळ रहिवासी असलेल्या ‘माया’ समाजाच्या लोकांवर शतकानुशतके अत्याचार होत आहेत. स्पेनने १५व्या शतकात मेक्सिको जिंकले आणि पुढे मेक्सिकोच्या मित्र मांडलिकांना घेऊन त्याने ‘माया’ संस्कृतीचे ग्वाटेमाला जिंकले. खरेतर या देशाचे नाव ‘ग्वाटेमाला’ हे स्पेन आक्रमणकर्त्यांनी ठेवले. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव ‘किचे’. ‘किचे’ म्हणजे, माया लोकांच्या भाषेत घनदाट अरण्याचा निसर्गसमृद्ध प्रदेश. या निसर्गसमृद्धीमुळेच तर या माया लोकांची गेली शेकडो वर्षे वाताहत झाली आणि ती आजही कायम आहे. मध्य अमेरिकेमधल्या या देशात अगदी कालपरवाच इझाबाल परिसरात ६० माया कुटुंबांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून लावण्यासाठी पोलीस व लष्कर दाखल झाले. शेकडो वर्षे स्पॅनिशांनी ख्रिस्तीकरण करूनही या देशात ४१ टक्के माया लोक अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांना त्यांच्याच देशात दुय्यम स्थान. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि त्यातही जगभरच्या आदिवासींना आम्हीच न्याय मिळवून देऊ (ख्रिश्चन बनवून!), अशी काहीशी कार्यपद्धती असलेल्या या पाश्चात्त्य देशांमधील हे भीषण सत्य!
 
ग्वाटेमालावर स्पेेनने विजय कसा मिळवला, याचा इतिहास पाहिला तर संताप येतो. १५२३ मध्ये स्पेनचा अल्वाराडो हा सैन्यासह ग्वाटेमालामध्ये आला. त्यावेळी इथे किचे आणि काक्चीकेल या दोन राजांचे साम्राज्य होते. दोघांमधून विस्तवही जात नसे. अल्वाराडोने युद्ध करण्यापेक्षा इथल्या दोन राजांशी अत्यंत लबाडीचे राजकारण केले. त्याने काक्चीकेल राजाला सांगितले की, "आम्ही तुम्हाला मदत करतो, किचे राज्यावर आक्रमण कर.” काक्चीकेलने स्पेनच्या मदतीने किचेला हरवले. किचे राजा वाटाघाटीला तयार झाला. स्पेनला वाटले की, दोन स्थानिक राजे एकत्र येतील. असे होऊ नये म्हणून अल्वाराडोने किचेला निमंत्रण दिले. किचे राजघराण्याचे दोन वयोवृद्ध राजे त्याला भेटायला आल्याबरोबर त्याने त्या दोघांना जिवंत जाळले. किचेच्या सैन्यावर ताबा मिळवला. दुसरीकडे काक्चीकेल राजाला मदत केली म्हणून त्याच्याकडे सोन्याची खंडणी मागितली. राजाने राज्यातील सर्व सोने दिले. मात्र, आता स्पेनच्या सैनिकांकडे किचेचे सैनिकही होते. अल्वाराडोने एकाकी पडलेल्या काक्चीकेल राजावर हल्ला केला आणि ग्वाटेमालावर स्पॅनिश सत्ता थोपवली. स्पॅनिशांनी ग्वाटेमालाच्या स्त्रियांवर अत्याचार केले. जे पुरुष युद्धास सक्षम होते, त्यांना जिवंत ठेवले; बाकीच्यांना जाळून टाकले. पुढे १८व्या शतकात स्पेनच्या गुलामगिरीतून ग्वाटेमाला मुक्त झाला. मात्र, तोपर्यंत इथे ५६ टक्के लोकसंख्या ही स्पॅनिश वंशाच्या लोकांची झाली होती. मूळचे माया लोक डोंगरदरी-कपारीत राहून लपूनछपून संस्कृती जपत राहिले.
आज काय स्थिती आहे? तर माया लोकांची लोकसंख्या या देशात निम्मी असतानाही या देशाचे सर्व सरकारी आणि खासगी व्यवहार हे स्पॅनिश भाषेत चालतात. भाषेचे असे, तर सत्तेचे नावच नको. आजतागायत एकही माया माणूस या देशाच्या सत्ता-खुर्चीत बसलेला नाही. राष्ट्राध्यक्ष झाले ते ‘लादिनो’ समाजाचे लोक.
 
हे लादिनो कोण? तर १५व्या शतकाम ध्ये स्पेनचे लोक ग्वाटेमालामध्ये आले, तेव्हा त्यांनी सोबत स्त्रियांना आणले नव्हते. इथे आल्यावर त्यांनी ग्वाटेमालाच्या महिलांचे शोषण केले, त्यांच्यावर अत्याचार केला. त्यातून जी संतती निर्माण झाली, ते हे ‘लादिनो’. स्पॅनिश लोकांनी माया लोकांपेक्षा या लादिनोंना झुकते माप दिले. त्यामुळे देशाची ९० टक्के साधनसामग्रीही ‘लादिनो’ समाजाकडे आहे. पूर्वी सत्ताधारी असलेला ‘माया’ समाज आज त्यांच्याच घरातून बेदखल करण्यात येत आहे. माया लोक ज्या परिसरात राहतात, तिथे दि. १५ नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत ग्वाटेमाला सरकारने कायदा सुरक्षेसाठी आणीबाणी लागू केली असून, या आणीबाणीच्या आड माया लोकांना त्यांच्या खनिज समृद्ध परिसरातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात येत आहे. त्यांच्या नावावर घर आणि जमिनीची कागदपत्रे आहेत. पण, ग्वाटेमालाच्या सरकारी दफ्तरातून मात्र ती गायब आहेत. जगाचा मोठा भाऊ असल्याच्या आविर्भावात असलेली अमेरिका. मात्र, मध्य अमेरिकेच्या ग्वाटेमालातील मायांची ही स्थिती! त्यांना न्याय कसा मिळेल?
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर