युवा पिढीने यशाचा शॉर्टकट कधीही घेऊ नये! -राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया

    28-Nov-2026   
 
 
Govind Dholakia
 
मुंबई (Govind Dholakia): युवा पिढीने यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट घेऊ नये. देवावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करा. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या कामाचे किमान तीन वर्षे प्रात्यक्षिक ज्ञान घ्या आणि त्यानंतर व्यवसायाला सुरुवात करा. निश्चितच यश मिळेल,” असा सल्ला श्री रामकृष्ण एक्स्पोर्ट्सचे (एसआरके) संस्थापक आणि राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
मुंबई पुस्तक महोत्सवात ‘मूल्ये, दृष्टी आणि विजय’ या विषयावर संवाद साधताना ढोलकिया बोलत होते. खा. गोविंद ढोलकिया म्हणाले की, “भगवद्गीतेपासून माझे आयुष्य घडले. आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपले जीवन घडत असते. मुंबईत पुस्तक महोत्सवाचे आयोजन होणे ही मुंबईकरांसह देशवासीयांसाठी सौभाग्याची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले. (Govind Dholakia)
 
ग्रामीण भागातून आलेल्या आपल्या प्रवासाविषयी सांगताना ढोलकिया म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. वयाच्या बाराव्या वर्षी मला पहिली चप्पल मिळाली. केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतले. १९६४ मध्ये गाव सोडून सुरतला आलो. तेथे डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगच्या कारखान्यात काम केले. त्यानंतर कंपनी सुरू केली. आज आमच्या कंपनीत सुमारे नऊ हजार लोक काम करतात आणि १२ हजार कोटी रुपयांची निर्यात होते. मी इथपर्यंत पोहोचलो, हा देवाचा आशीर्वाद आहे.” (Govind Dholakia)
 
समस्या म्हणजे प्रगतीची संधी
 
“प्रॉब्लेम इज प्रोग्रेस’ हे आमच्या कंपनीचे वाक्य आहे. आयुष्यात अडचणी आहेत, कारण आपण जिवंत आहोत. कोणतीही समस्या आली तरी मी कधी घाबरलो नाही. त्यातून मार्ग शोधत पुढे जात राहिलो,” असे ढोलकिया यांनी सांगितले. “समाधान हे यशाचे दुसरे नाव आहे. हवेतले मनोरे उभे करण्याऐवजी आपल्याला आवडणारे काम करा. समोरच्याला मान द्यायला शिका,” असा सल्लाही त्यांनी दिला. (Govind Dholakia)
 
कामगारांशी कुटुंबाप्रमाणे नाते
 
“मी माझ्या कामगारांना कधीही केवळ कामगार समजले नाही. आम्ही सर्वजण एकत्र जेवतो. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या कंपनीत द्वेषाला जागा नाही, तर केवळ प्रेमाला स्थान आहे,” असे त्यांनी नमूद केले. (Govind Dholakia)
 
उद्योजक ते खासदारकीपर्यंतचा प्रवास उलगडताना ढोलकी या म्हणाले की, “मी राजकारणी नाही, मी उद्योजक आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी मैत्री झाली. माझी दुसरी-तिसरी पिढी व्यवसायात आल्यानंतर माझा स्वभाव राष्ट्रासाठी उपयोगी पडावा, असे त्यांना वाटले. त्यानंतर एक दिवस अमित शाह यांनी स्वतःहून फोन करून मला राज्यसभेवर जाण्याबाबत सांगितले." (Govind Dholakia)
 
आय ॲम नथिंग बट आय कॅन डू एनीथिंग
 
“आपल्या आयुष्यात अदृश्य शक्तीच्या योजनेनुसार अनेक गोष्टी घडत असतात. आपण आज येथे बसलो आहोत, हेही त्या अदृश्य शक्तीचे नियोजन आहे. युवा पिढीने देवावर विश्वास ठेवून चुकीचे काम टाळावे. व्यवसायाची संधी मिळाल्यास तिला पहिले प्राधान्य द्यावे,” असे आवाहन करत “आय एम नथिंग बट आय कॅन डू एनीथिंग” हा मंत्र लक्षात ठेवण्याचा सल्लाही ढोलकिया यांनी दिला. (Govind Dholakia)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर