देशाच्या राजकारणाची पुनर्मांडणी!

    28-Nov-2026

Constituency Delimitation and Women’s Reservation
 
मतदारसंघांची पुनर्रचना आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण, ही काळाची गरज आहे. या विधेयकांना विरोध करण्याचा कसलाही नैतिक किंवा तात्त्विक आधार विरोधी पक्षांकडे नाही. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी त्या विधेयकांना विरोध केल्यास त्याचा विपरीत परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत घडेल. या दोन विधेयकांमुळे देशातील राजकारणाचीच फेरमांडणी होणार असून, काँग्रेससह काही सेक्युलर पक्षांचे राजकीय वर्चस्व घटणार आहे, म्हणूनच हा सगळा थयथयाट!
 
यंदा भारतात ‘धुरंधर’, ‘रामायण’ यांसारखे ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाले. पण, पुढील आठवड्यात केंद्र सरकार जो ‘ब्लॉकबस्टर’ खेळ करणार आहे, त्यापुढे हे चित्रपटही फिके पडतील, अशी चिन्हे. अपेक्षेप्रमाणेच केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. येत्या सोमवारपासून चार दिवस चालणार्‍या या अधिवेशनात लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि संसदेत महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवणारी घटनादुरुस्ती विधेयके मंजूर करून घेतली जातील. या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकांसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत असणे आवश्यक. यापूर्वी, हीच विधेयके यंदा एप्रिलमध्ये बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आली होती. पण, तेव्हा सरकार दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकले नव्हते. आता सरकारने ही विधेयके पुन्हा एकदा संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्याचा निर्णय घेतला असल्याने यावेळी सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत जमले असावे, असे मानण्यास जागा आहे. याचे कारण, गेल्या सहा महिन्यांत देशाच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी.
 
गेल्या विशेष अधिवेशनानंतर राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून, त्यामुळे संसदेतील सत्ता समीकरण बदलले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीची वाताहत झाली, तर सत्ताधारी ‘एनडीए’ला बळ प्राप्त झाले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकचा पराभव होऊन विजय या चित्रपट अभिनेत्याच्या ‘टीव्हीके’ या पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारकडे साधे बहुमत नसल्याने काही विरोधी पक्ष तत्काळ ‘टीव्हीके’ला जाऊन मिळाले. त्यात द्रमुकबरोबर निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या काँग्रेसचा समावेश आहे. निकालाच्या दिवशीच काँग्रेसने द्रमुकची साथ सोडली आणि सत्तेत वाटा मिळविण्यासाठी विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाला पाठिंबा दिला. डाव्या पक्षांनीही तेच केले, तर द्रमुकचा कट्टर विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली आणि या फुटीर आमदारांनी ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिला. त्यामुळे द्रमुकने काँग्रेसशी असलेले संबंध तोडले आणि तो ‘इंडी’ आघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर या पक्षाने ‘एनडीए’ सरकारला असलेला आपला विरोध काहीसा सौम्य केला आहे, असे दिसून येते.
 
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील मतदारांच्या बदललेल्या मानसिकतेला अनुसरून तृणमूल काँग्रेसच्या ६८ पैकी ५० आमदारांनी या पक्षात फूट पाडली आणि आपला स्वतंत्र गट स्थापन केला. तीच गोष्ट तृणमूलच्या संसदीय पक्षात घडली. या पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून नंतर ‘एनसीपीआय’ नावाच्या पक्षात आपल्याला विलीन करून घेतले. या ‘एनसीपीआय’ पक्षाने ‘एनडीए’ सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडींमुळे अन्य छोट्या विरोधी पक्षांच्या भूमिकेतही बदल घडले असून, त्यांनी सरकारला असलेला विरोध सौम्य केला आहे.
 
सरकारविरोधात असलेल्या ‘एनसीपी’ (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) या पक्षांमध्येही फूट पडली आहे. उबाठाच्या नऊपैकी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, पर्यायाने ‘एनडीए’मध्ये प्रवेश केला आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत शरद पवार यांच्या पक्षाची भूमिकाही सौम्य झाली असून, त्यांनी या विधेयकांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिजू जनता दल, ‘वायएसआर’ काँग्रेस, अण्णाद्रमुक वगैरे काही छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवून घेण्यात सरकारला यश आल्याचे या विशेष अधिवेशनाच्या घोषणेने दाखवून दिले आहे. ‘वायएसआर’ काँग्रेस, बिजू जनता दल, तसेच द्रमुक यांसारखे पक्ष मतदानाच्या वेळी तटस्थ राहूनही ही विधेयके मंजूर करण्यास सरकारला मदत करू शकतात. मात्र, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची याबाबतची रणनीती नेमकी काय आहे, ते मतदानाच्या दिवशीच कळून येईल.
 
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची तीव्र निकड भासत आहे. गेल्या ५० वर्षांत ही पुनर्रचना झालेली नाही. याकाळात भारताच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली असून, परिणामी प्रत्येक खासदार १० लाख ते २५ लाख मतदारांचे प्रतिनिधित्त्व करतो, असे दृश्य आहे. एक लोकप्रतिनिधी इतक्या लोकांची भेटही घेऊ शकत नाही, तर तो त्यांच्या समस्या कशा सोडवील? त्यामुळेच मतदारसंघांचा आकार घटवून माणशी अधिक लोकप्रतिनिधी निर्माण करण्याची गरज आहे. सरकारच्या योजनेनुसार प्रत्येक राज्याच्या विद्यमान आमदार व खासदारांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली जाईल. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मतदारसंघांची पुनर्रचना करताना सरकारकडून मुस्लीमबहुल मतदारसंघ अशा तर्‍हेने फोडले जातील की, नव्या मतदारसंघांचे गणित सत्ताधारी भाजपला अनुकूल राहील, अशी भीती काँग्रेस व अन्य सेक्युलर पक्ष व्यक्त करीत आहेत. मात्र, काँग्रेसने यापूर्वी हेच केले होते. भाजपने तसे केल्यास त्याला फारसा दोष देता येणार नाही. सत्तेत राहिल्याचे व न राहिल्याचे हे अपरिहार्य फायदे-तोटे आहेत. यापूर्वी, काँग्रेसने मतदारसंघ पुनर्रचनेचा लाभ घेतला असल्याने त्या पक्षाला आता टीका करण्याचा काहीही अधिकार नाही.
 
द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस हेच ‘इंडी’ आघाडीचे भक्कम खांब होते. हे खांब उलथून पडल्याने ‘इंडी’ आघाडीची इमारत मोडकळीस आली आहे. महिलांना वाढीव प्रतिनिधित्व देण्यास विरोध करणारे पक्षच सध्या विधानसभा निवडणुकीत महिलांना आर्थिक मदत आणि अन्य लाभ देण्याची आश्वासने देत आहेत. एकीकडे महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे त्यांच्या वाढत्या प्रतिनिधित्वाला विरोधही करायचा, याची सांगड घालणे शक्य नाही. महिला आरक्षणास विरोध केल्यास त्यांची ही आश्वासने पोकळ असल्याचे दाखविले जाईल. भाजपच्या मुत्सद्दी नेत्यांनी या राजकीय परिस्थितीचा अचूक लाभ उठवीत, सत्ताधारी पक्षाच्या बाजूने दोन तृतीयांश बहुमत जमविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था असून नसल्यासारखी आहे. समाजवादी पक्षही आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. या पक्षांनी महिला आरक्षणास आणि राज्यातील आमदार-खासदारांची संख्या वाढविण्यास विरोध केल्यास त्याचा चुकीचा संदेश महिला मतदारांमध्ये जाईल. अर्थात, जे पक्ष महिलांच्या आरक्षणाला आणि आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधींच्या वाढीव संख्येला विरोध करतील, त्यांना मतदार कसा पाठिंबा देतील, ही साधी गोष्टही या विरोधकांच्या लक्षात येत नाही. या विधेयकांचे इतरही दूरगामी परिणाम होणार असले, तरी विस्तारभयास्तव त्यावर येथे चर्चा करीत नाही. पण, ही विधेयके देशातील राजकारणाचीच पुनर्मांडणी करणारी ठरतील, अशी चिन्हे आहेत.
 




संबंधित मजकूर