मुंबई (BMC Municipal Bond) : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने पहिला म्युनिसिपल बाँड जारी करण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. या बाँडसाठी बाजार नियामक सेबीकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी दिली. प्रस्तावित बाँडमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसह संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही सहभागी होता येणार आहे. सध्या महापालिका सर्वसाधारण स्वरूपातील बाँड जारी करण्याचे नियोजन करीत आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
ग्रीन, ब्ल्यू आणि सोशल बाँडचाही विचार
भविष्यात हवामान कृती आराखड्याशी सुसंगत असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विशेष प्रकारचे बाँड जारी करण्याचा पर्यायही महापालिका तपासणार आहे. यामध्ये पर्यावरणविषयक प्रकल्पांसाठी ग्रीन बाँड, जलव्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांसाठी ब्ल्यू बाँड आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांसाठी सोशल बाँड यांचा समावेश असू शकतो. म्युनिसिपल बाँडमुळे महापालिकेला पारंपरिक महसुली स्रोतांव्यतिरिक्त भांडवली बाजारातून निधी उभारता येणार आहे. मात्र, प्रस्तावित बाँडची रक्कम, व्याजदर, मुदत आणि प्रत्यक्ष जारी करण्याची तारीख याबाबत अद्याप तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.(BMC Municipal Bond)