‘समान नागरी कायदा’ या महत्त्वपूर्ण विषयाचा सर्वांगीण वेध घेणारी विशेष लेखमाला... इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि घटनात्मक भूमिकेपासून महाराष्ट्राच्या भवितव्यापर्यंत विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह या लेखमालेतून करण्यात येत आहे.
समान नागरी कायद्या’मुळे धर्मस्वातंत्र्य धोक्यात येईल; अल्पसंख्याकांची सांस्कृतिक ओळख पुसली जाईल आणि हिंदू कायदे इतर धर्मीयांवर लादले जातील, असे आक्षेप घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, यांपैकी अनेक आक्षेप संविधान सभेतही उपस्थित करण्यात आले होते; त्यांचा विचार करूनच घटनाकारांनी ‘अनुच्छेद ४४’ स्वीकारला होता. आजच्या आक्षेपांची उत्तरे शोधतानाही संविधानाचाच आधार घेणे सयुक्तिक ठरेल.
धर्मस्वातंत्र्याची हमी देणार्या ‘अनुच्छेद २५’मधील दुसर्या खंडातच धार्मिक आचरणाशी संबंधित लौकिक व्यवहारांचे नियमन आणि समाजसुधारणांसाठी कायदे करण्याचा अधिकार राज्याला दिला आहे. १९५१ मध्ये नरसू अप्पा माळी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हिंदू बहुपत्नित्वास प्रतिबंध करणारा कायदा घटनासंगत ठरवला; तर २००३ मधील जावेद विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने धर्माने बहुपत्नित्वाला परवानगी दिली असली, तरी ती अनिवार्य धार्मिक प्रथा नाही, हे स्पष्ट केले. निकाह, सप्तपदी किंवा अन्य विवाहविधींचे स्वातंत्र्य जपूनही विवाहाचे वय, एकपत्नित्व, घटस्फोट आणि वारसाहक्क यांचे कायदेशीर नियमन करता येते.
२०१७ मधील शायरा बानो प्रकरणात हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर आला. पतीने एकाचवेळी तीनदा ‘तलाक’ उच्चारून विवाह संपुष्टात आणण्याच्या प्रथेला धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पाचपैकी तीन न्यायमूर्तींनी ती प्रथा अवैध ठरवली; तर तत्कालीन सरन्यायाधीश खेहर आणि न्या. नझीर यांच्या मते तिला धार्मिक संरक्षण होते आणि ती रद्द करण्याचा मार्ग न्यायालयीन हस्तक्षेपाऐवजी कायदेनिर्मितीचा होता. विशेष म्हणजे धार्मिक संरक्षण मान्य करणार्या या दोन न्यायमूर्तींनीही वैयक्तिक कायद्यांत सुधारणा करण्याचा विधिमंडळाचा अधिकार मान्य केला होता. पुढे २०१९ मध्ये संसदेने तत्काळ ‘तिहेरी तलाक’ दंडनीय ठरवला. त्यामुळे वैयक्तिक कायद्यांना धर्माचा आधार आहे, म्हणून त्यांत विधिमंडळाला बदल करता येत नाही, हा दावा टिकत नाही.
महाराष्ट्रातील प्रस्तावित संहितेला असदुद्दीन ओवेसी यांनी ‘हिंदू सिव्हिल कोड’ संबोधून हिंदू अविभक्त कुटुंबाचा (कणऋ) मुद्दा उपस्थित केला आहे. प्राप्तिकर कायद्यातील कणऋच्या स्वतंत्र करदर्ज्याचा विवाह, घटस्फोट, निर्वाहभत्ता किंवा दत्तकविधानाच्या अधिकारांशी थेट संबंध नाही. संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचे नियम हा स्वतंत्र विषय आहे; ‘शरियत’ मात्र १९३७च्या अधिनियमाद्वारे विवाह, घटस्फोट आणि वारसा यांसह अनेक कौटुंबिक विषयांना लागू होते. त्यामुळे या दोन संकल्पनांची समकक्ष व्यवस्था म्हणून तुलना करणेच चुकीचे आहे.
‘समान नागरी कायदा’ करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे, हाही गैरसमज आहे. ‘अनुच्छेद २४६’ आणि समवर्ती सूचीतील नोंद ५ नुसार विवाह, घटस्फोट, दत्तकविधान, उत्तराधिकार आणि संयुक्त कुटुंबाचे विभाजन यांवर संसद आणि राज्य विधानमंडळ, दोघांनाही कायदे करता येतात. केंद्रीय कायद्याशी विसंगती असल्यास राज्याचा कायदा प्रभावी ठरण्यासाठी ‘अनुच्छेद २५४(२)’नुसार राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. मात्र, कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्नावरील कर हा संघसूचीतील नोंद ८२ नुसार केंद्राच्या अधिकारातील विषय आहे. म्हणून महाराष्ट्राच्या नागरी संहितेकडून केंद्रीय प्राप्तिकर कायद्यात बदल करण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक अधिकारांचा विचार करताना ‘अनुच्छेद २९’ भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार देतो, प्रत्येक वैयक्तिक कायदा अपरिवर्तनीय ठेवण्याची हमी देत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आदिवासींच्या रूढी आणि त्यांना लाभलेले विशेष घटनात्मक व वैधानिक संरक्षण हा स्वतंत्र विषय आहे. हिंदू विवाह अधिनियमातही अनुसूचित जमातींसाठी अपवाद आहे. अशा संरक्षणांचा विचार संहितेची व्याप्ती निश्चित करताना करता येतो; सांस्कृतिक विविधता आणि नागरी अधिकारांतील समानता यांत अनिवार्य संघर्ष नाही.
विरोधासाठी दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या २१व्या विधी आयोगाच्या सल्लापत्राचाही दाखला दिला जातो. आयोगाच्या मते त्या टप्प्यावर ‘समान नागरी संहिता’ आवश्यक किंवा इष्ट नव्हती; मात्र विविध वैयक्तिक कायद्यांतील भेदभाव दूर करण्यासाठी त्याने सुधारणा सुचवल्या होत्या. ते अंतिम अहवालाऐवजी चर्चेसाठीचे सल्लापत्र होते. पुढे दि. १४ जून २०२३ रोजी २२व्या विधी आयोगाने ‘समान नागरी कायद्या’चा विषय नव्याने विचारात घेऊन नागरिक व धार्मिक संघटनांकडून मते मागवली. त्यामुळे २०१८ मधील अभिप्राय हा कायदेनिर्मितीवरील घटनात्मक निर्बंध मानता येणार नाही. ‘विशेष विवाह अधिनियमा’सारखा पर्यायी कायदा उपलब्ध असणे आणि सर्व नागरिकांना मुळातच ‘समान नागरी हक्क’ असणे, यांतही मूलभूत फरक आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे; परंतु प्रत्येक धार्मिक समुदायाची पूर्वसंमती ही ‘अनुच्छेद ४४’मधील अट नाही. हिंदू कायद्यांच्या सुधारणांना विरोध झाला होता, तरी कायदेनिर्मितीची प्रक्रिया पुढे गेली, हे आपण पाहिलेच आहे. समितीतील प्रतिनिधित्व, प्रश्नावली, गोपनीयता आणि प्रस्तावित तरतुदींविषयीच्या हरकतींचे निरसन झाले पाहिजे. मात्र लोकशाहीने दिलेला विरोधाचा अधिकार म्हणजे कायदेसुधारणांवरील कायमस्वरूपी नकाराधिकार नव्हे. कायद्याच्या स्वरूपाविषयी मतभेद असणे आणि कायदा करण्याचा घटनात्मक अधिकारच नाकारणे, या भिन्न बाबी आहेत. भावी संहितेची कसोटी तिच्या तरतुदींमधून मिळणारा समान न्याय आणि घटनात्मक स्वातंत्र्यांचे संरक्षण हीच असेल.
लेखक- अॅड. आशिष सोनवणे