२८ वर्षांपासून मुक्या जीवांसाठी आयुष्य वाहिलेल्या रूपाली जोशी यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची कहाणी उलगडणारा हा लेख...
एखाद्या प्राण्याला वेदना होत असताना, त्याची भाषा समजून घेण्यासाठी शब्दांची गरज नसते, तर संवेदनशील मनाची गरज असते. रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत पडलेली गाय, आजाराने त्रस्त असलेला गोवंश, कत्तलखान्याकडे जाणार्या गोमाता किंवा उपचारांअभावी मृत्यूच्या दारात उभे असलेले मुके जीव... अशा असंख्य प्राण्यांसाठी गेली २८ वर्षे निःस्वार्थपणे धावणारे एक नाव म्हणजे, रूपाली गंगाधर जोशी.
नाशिकमधील ‘मंगलरूप गोशाळे’च्या माध्यमातून त्यांनी गोसेवेचा एक मोठा वटवृक्ष उभा केला आहे. एका मैत्रिणीला दिलेल्या मदतीतून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो प्राण्यांच्या जीवनाचा आधार बनला आहे. केवळ गोवंशाचे संगोपन नव्हे; तर आजारी, अपंग आणि अपघातग्रस्त प्राण्यांना उपचार देऊन त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
रूपाली जोशी यांच्या गोसेवेच्या प्रवासाची मुळे त्यांच्या बालपणात दडलेली. लहानपणापासूनच त्यांना प्राण्यांविषयी विशेष प्रेम होते. गल्लीतील मांजरी, कुत्री आणि त्यांची पिले यांना सांभाळणे, त्यांची काळजी घेणे, हा त्यांच्या आवडीचा भाग. या कामात त्यांच्या आईचीही त्यांना मोलाची साथ लाभली. त्यामुळे मुक्या प्राण्यांविषयीची संवेदनशीलता त्यांच्या मनात लहानपणापासूनच रुजली.
१९९८ मध्ये एका गरजू मैत्रिणीला मदतीची आवश्यकता होती. तिच्या मदतीसाठी रूपाली यांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच त्यांचा गोशाळेशी संबंध आला. सुरुवातीला केवळ मैत्रिणीला मदत करण्याच्या उद्देशाने दिलेली साथ पुढे त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनली. कत्तलखान्यात जाणार्या गोवंशाला जीवनदान देऊन त्यांना नैसर्गिक जीवन जगण्याची संधी देता येते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला या कार्यासाठी पूर्णपणे झोकून दिले. त्यांनी सर्वप्रथम ‘कृषी गोसेवा ट्रस्ट, तपोवन’ येथे कामाला सुरुवात केली. हळूहळू संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. आजही त्या जबाबदारीने हे कार्य पुढे नेत आहेत.
मार्च २०१२ मध्ये ‘जागतिक महिला दिना’निमित्त एका वृत्तपत्राच्या पुरवणीत रूपाली जोशी यांच्या गोसेवेच्या कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली होती. या लेखामध्ये त्यांचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांपैकी एक होते पुरुषोत्तम आव्हाड.
पुरुषोत्तम यांनीही गोसेवेची इच्छा व्यक्त केली. रूपाली यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, सुरुवातीला त्यांचा सहभाग किती काळ टिकेल, याबाबत त्या साशंक होत्या. कारण, अनेकजण उत्साहाने काम सुरू करतात; परंतु काही दिवसांनी त्यांचा उत्साह कमी होतो, असा त्यांचा अनुभव होता.
म्हणूनच, त्यांनी पुरुषोत्तम यांची प्रत्यक्ष कामातून परीक्षा घेण्याचे ठरवले. एखाद्या गावात आजारी गाय असल्याची माहिती मिळाली की, त्या पुरुषोत्तम यांना तिथे पाठवत. त्या गायीवर उपचार करून तिला पूर्णपणे बरे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत. प्रत्येक वेळी पुरुषोत्तम यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून गायीला बरे केले. त्यांच्या कामातील समर्पण आणि सातत्य पाहून रूपाली यांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत गेला.
या विश्वासातूनच रस्त्यावर भटकणार्या, विशेषतः अपघातग्रस्त गोवंशासाठी स्वतंत्र संस्था सुरू करण्याचा विचार पुढे आला. दि. २५ एप्रिल २०१६ रोजी ‘मंगलरूप गोशाळा’ या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली आणि एका नव्या सेवापर्वाला सुरुवात झाली.
एका हृदयद्रावक घटनेने एक महत्त्वाचा विचारही संस्थेला दिला. ‘आज एका हातगाड्यावरून वासराला आणावे लागले; पण भविष्यात अशा प्रसंगांसाठी संस्थेकडे अद्ययावत ‘हायड्रॉलिक अॅम्ब्युलन्स’ असली पाहिजे,’ स्वतःशीच केलेल्या या संकल्पातून पुढे दोन ते तीन वर्षांत ‘हायड्रॉलिक अॅम्ब्युलन्स’ उभी राहिली. हातगाड्यापासून अत्याधुनिक अॅम्ब्युलन्सपर्यंतचा हा प्रवास संघर्षाचा असला, तरी त्यामागे मुक्या जीवांना वेळेत मदत मिळावी, हीच भावना होती.
दि. ४ मे २०२३ रोजी राजस्थानमधून हैदराबादकडे १४७ उंट नेले जात असल्याची माहिती समोर आली. दि. २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी आणि ईद एकाच दिवशी येत असल्याने या उंटांची कुर्बानी होण्याची शयता होती. ही बाब लक्षात येताच, ‘मंगलरूप गोशाळे’ने या प्रकरणात पुढाकार घेतला. या कारवाईनंतर १६ दिवस हे उंट नाशिकमध्ये होते. याकाळात प्रत्येक उंटाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना ‘टॅगिंग’, लसीकरण आणि नोंदणी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. गुजरातमधील ‘रामचंद्र मिशन’ संस्था आणि राजस्थान सरकारच्या सहकार्याने या उंटांना पुन्हा राजस्थान सरकारच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक उंटाच्या गळ्यात भगव्या रंगाची ‘जय श्रीराम’ पट्टी बांधून, आरती करून आणि पोलीस संरक्षणासह पशुवैद्यकीय डॉटरांच्या पथकाच्या उपस्थितीत त्यांना रवाना करण्यात आले.
मार्च २०२६ मध्ये नाशिकमध्ये काळ्या घोड्यांच्या नालविक्रीच्या नावाखाली घोड्यांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा प्रकार समोर आला होता. काही अंधश्रद्धाळू लोकांकडून घोड्याच्या नालेला मोठी किंमत दिली जात असल्याने पैशाच्या हव्यासापोटी घोड्यांच्या मालकांकडून दर १० ते १५ मिनिटांनी नाल ठोकली जात होती. त्यामुळे घोड्यांच्या पायांची अक्षरशः चाळण झाली होती. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले होते.
‘मंगलरूप गोशाळे’ने या प्रकरणात कायदेशीर मार्गाने कारवाई केली आणि संबंधित घोड्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, हे घोडे नैसर्गिकरीत्या काळे नव्हते, तर त्यांना हेअर डाय लावून काळे करण्यात आले होते. या घोड्यांना विविध गोशाळांमध्ये संगोपनासाठी देण्यात आले. त्यांपैकी एक घोडा आज ‘मंगलरूप गोशाळे’तही आहे.
अशा घटनांमधून प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ संवेदनशीलता पुरेशी नसून कायद्याची जाण, धाडस आणि प्रत्यक्ष कृतीचीही आवश्यकता असते, हे ‘मंगलरूप’च्या कार्यातून दिसून येते. आज ‘मंगलरूप गोशाळा’ ही केवळ गोवंशाच्या संगोपनाची जागा राहिलेली नाही, तर विविध आजारांनी ग्रस्त प्राण्यांसाठी उपचार आणि पुनर्वसनाचे केंद्र बनली आहे.
सध्या या गोशाळेत ३३८ गोवंश, तीन घोडे, दोन खेचर, २५ श्वान, सहा मांजरी आणि अनेक पक्ष्यांचा सांभाळ केला जात आहे. अपघातग्रस्त, आजारी, कॅन्सरग्रस्त, ट्युमर असलेले, तसेच गंभीर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेले प्राणी येथे आणले जातात.
विशेष म्हणजे, ‘मंगलरूप गोशाळे’त स्वतःचे अद्ययावत ‘एस-रे’ मशीन आणि ‘हायड्रॉलिक ऑपरेशन टेबल’ असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे विविध गंभीर शस्त्रक्रिया केल्या जातात. अपघातात खुबा मोडलेल्या गायी, कॅन्सरग्रस्त प्राणी आणि शरीरावर गंभीर जखमा असलेल्या गोवंशावर उपचार केले जातात.
यातील एक उदाहरण विशेष हृदयस्पर्शी आहे. एका गायीला डोळ्यांचा कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर शरीरात पसरत असल्याने तिचे दोन्ही डोळे काढण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. उपचारांनंतर ती कॅन्सरमुक्त झाली. आज तिला दिसत नसले, तरी तिचे आयुष्य थांबलेले नाही. तिला नव्याने जगण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तीही हळूहळू शिकत आहे आणि इतरांच्या मदतीने नैसर्गिक जीवन जगत आहे.
आज ३३८ गोवंश आणि इतर प्राण्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मुख्यतः घास, चारा आणि औषधांवरच दरमहा सुमारे चार ते साडेचार लाख रुपये खर्च होतात. याशिवाय जागेचे भाडे, कर्मचार्यांचे वेतन, वीजबिल, पाणीबिल, इंधन आणि इतर अनेक खर्च आहेत. ‘एकही गोवंश रस्त्यावर भटकता कामा नये,’ हा ‘मंगलरूप गोशाळे’चा संकल्प. आजच्या ३३८ गोवंशाच्या संगोपनापासून भविष्यात हजारो गोवंशाला आसरा देण्यापर्यंतचा त्यांचा हा ध्यास आहे.
रूपाली यांचा २८ वर्षांचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. हातगाड्यांवरून वासराला आणण्यापासून ते अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स उभी करण्यापर्यंत, एका छोट्या उपक्रमापासून सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यापर्यंत आणि काही प्राण्यांच्या संगोपनापासून शेकडो मुक्या जीवांना आश्रय देण्यापर्यंत रूपाली जोशी यांनी मोठा टप्पा गाठला आहे. मात्र, या प्रवासात त्यांची एकच इच्छा कायम आहे. परमेश्वराकडे त्यांचे एकच मागणे आहे, ते म्हणजे आयुष्याचा अंतिम श्वासही याच गोशाळेत निघावा! भगवान गोपालकृष्ण नारायण आपली ही इच्छा पूर्ण करतील, असा त्यांना ठाम विश्वास आहे.
आज या गोशाळेला स्वतःची जागा मिळण्याची गरज आहे. त्यामुळे गोसेवेची आवड असणार्या, प्राणिमात्रांविषयी कळवळा असणार्या आणि सामाजिक कार्यात योगदान देऊ इच्छिणार्या दानशूर व्यक्तींनी ‘मंगलरूप गोशाळे’ला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन रूपाली जोशी यांनी केले आहे. शेवटी, एखाद्या मुक्या जीवाला जीवदान देणे म्हणजे, केवळ एका प्राण्याचे आयुष्य वाचवणे नव्हे; तर माणुसकी जिवंत ठेवणे होय!
लेखक- कपिल देशपांडे (अधिक माहितीसाठी संपर्क - ९६५७१३०९१९)