मुंबई (Reasi Terrorists Land Seizure) : जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी नुकतेच पाकिस्तानस्थित पाच दहशतवाद्यांच्या रियासी जिल्ह्यातील सुमारे २९ कनाल जमीन जप्त करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, या पाच दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते पाकिस्तानातून हिजबुल मुजाहिदीन (एचएम) या दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पुन्हा सक्रिय करण्यासाठी ते सीमापारून शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरवत असल्याचा आरोप आहे.
स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांचे कट्टरपंथीकरण करण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांवरून हे दहशतवादी आपली जमीन विकून त्यातून मिळणारी रक्कम दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली.(Reasi Terrorists Land Seizure)
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या मालकांची नावे मोहम्मद कय्यूम ऊर्फ अब्दुल कय्यूम, बशीर अहमद ऊर्फ मासूम, शौकत अली, मंजूर अहमद ऊर्फ मंजूर हुसेन आणि इम्तियाज अहमद अशी आहेत. हे पाचही जण रियासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील रहिवासी असून, सध्या पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Reasi Terrorists Land Seizure)