३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर संसदेचे विशेष अधिवेशन; परिसीमन, महिला आरक्षण विधेयकांवर चर्चा?

    27-Nov-2026
 
Parliament Special Session 2026
 
नवी दिल्ली (Parliament Special Session 2026) : दि. ३० नोव्हेंबर रोजीपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, लोकसभेचे कामकाज सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभेचे कामकाज बुधवार, दि. २ डिसेंबर रोजी पुन्हा सुरू करण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली आहे. सरकारी कामकाजाच्या आवश्यकतेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज दि. ३ डिसेंबर रोजीपर्यंत चालू शकते.
 
या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (डिलिमिटेशन बिल) आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक चर्चेत येण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची २०२९च्या निवडणुकांपासून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. (Parliament Special Session 2026)
 
मतदारसंघांची पुनर्रचना आणि लोकसभेतील सदस्यसंख्या वाढविण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या विधेयकांचा विशेष अधिवेशनातील अधिकृत कामकाजात समावेश असल्याची सरकारने अद्याप पुष्टी केलेली नाही.
यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन दि. १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, ते औपचारिकरीत्या संस्थगित करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याच अधिवेशनाचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे. या विशेष बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Parliament Special Session 2026)
 
 




संबंधित मजकूर