मुंबई (Mohan Bhagwat Tortured Truth Book Launch) : आयुष्यात इतका संघर्ष करावा लागला, की माणसाच्या मनात कटुता निर्माण होते. इतरांविषयी राग, द्वेष आणि संतापाची भावना निर्माण होते. मात्र, या जीवनचरित्रात असे काहीही दिसत नाही. लेखिकेने आपल्यातील माणुसकीचा भाव जपला आहे. जीवनात कितीही मोठा संघर्ष आला, तरी माणुसकी टिकून राहिली पाहिजे; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
सरसंघचालकांच्या हस्ते लेखिका तसनीम पटेल यांच्या ‘टॉर्चर्ड ट्रुथ’ या पुस्तकाचे एमजीएम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृहात विमोचन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अंकुशराव कदम, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक इंद्रेश कुमार आणि सामाजिक कार्यकर्ते मेहताब खान पठाण उपस्थित होते.(Mohan Bhagwat Tortured Truth Book Launch)
लेखिका तसनीम पटेल यांनी मूळ मराठीत ‘भाळ आभाळ’ या शीर्षकाखाली आपली आत्मकथा लिहिली आहे. या पुस्तकाचे प्रथम हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यात आले. याच इंग्रजी आवृत्तीचे विमोचन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, आपण धर्मानुसार जीवन जगतो. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. रिलिजन अनेक आहेत; पण आपला धर्म तो आहे, ज्याची व्याख्या संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून केली आहे. तो सत्य आणि करुणेवर आधारित आहे. आपले जीवन याच धर्मानुसार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भारत समृद्ध होता, तेव्हा जगातील विविध भागांतील समाज भारतीय संस्कार आणि भारतीय आदर्श मूल्यांनुसार जीवन जगत होते. ती व्यवस्था संपुष्टात आली. त्यामुळे आज अनेक देश चिंतित असून, त्यांना भारताकडूनच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.(Mohan Bhagwat Tortured Truth Book Launch)
या पुस्तकात लेखिका तसनीम पटेल यांच्या बालपणापासून ते संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी मांडण्यात आली आहे. स्त्री म्हणून सहन करावा लागलेला अन्याय, आर्थिक अडचणी, सामाजिक उपेक्षा आणि भेदभाव, अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात शिक्षण मिळवणे आणि यश संपादन करणे, यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा प्रवास या पुस्तकातून उलगडण्यात आला आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक