
मुंबई (Manipur Research Funding) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मणिपूरने राज्यातील उच्च शिक्षण, शैक्षणिक संशोधन आणि प्रशासकीय पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचे स्वागत केले आहे. या निर्णयांबद्दल अभाविपने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांचे आभार मानले आहेत. अभाविप मणिपूरचे प्रदेशमंत्री गौतम फिलेम यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या निर्णयांबद्दल विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे अभिनंदन केले.
मणिपूर मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन कार्यासाठी ‘मणिपूर मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य योजना’ मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र पीएच.डी. संशोधकांना तीन वर्षांपर्यंत दरमहा चार हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे संशोधकांवरील आर्थिक ताण कमी होण्यासोबतच त्यांना संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे. शिक्षक प्रशिक्षणाचे विकेंद्रीकरण आणि शिक्षकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांचे (डीआयईटी) कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंत्राटी तत्त्वावर १६२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.(Manipur Research Funding)
याशिवाय जिरीबाम, सेनापती, मोरेह आणि इंफाळ येथे चार नवीन विभागीय कर कार्यालये स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. अभाविपने या निर्णयाचेही स्वागत केले आहे. “तरुणांच्या क्षमतेत गुंतवणूक करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक संस्थांना अधिक सक्षम बनवणे किती महत्त्वाचे आहे, हे या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांतून अधोरेखित होते,” असे अभाविपने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या आर्थिक सहाय्य योजनेमुळे संशोधकांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी आशा अभाविपने व्यक्त केली आहे. तसेच, मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची वेळेत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही संघटनेने राज्य सरकारला केले आहे.(Manipur Research Funding)