मुंबईची ओळख देशाची आर्थिक राजधानी म्हणून असली, तरी वाढती लोकसंख्या, विस्तारणारे महानगर क्षेत्र, औद्योगिक विकास आणि नव्या पायाभूत सुविधा, यांमुळे मुंबईची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोयना जलविद्युत’ प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर पश्चिमेकडे वाहणार्या पाण्याचा मुंबईसाठी उपयोग करण्याची शक्यता तपासण्याचा राज्य सरकारचा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. या प्रकल्पातून जवळपास ६० ‘टीएमसी’ पाणी वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाते. या पाण्याचा नियोजनबद्ध वापर शक्य आहे का, यासाठी तांत्रिक अभ्यास करण्यात येणार आहे. नव्या जलस्रोतांचा शोध, उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापन या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. कोयनेच्या पाण्याचा पर्याय याच दूरगामी नियोजनाचा भाग म्हणून पाहायला हवा.
या प्रस्तावाचा लाभ केवळ मुंबईपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. संभाव्य जलवाहिनीच्या मार्गावरील ‘डेटा सेंटर’ उद्योग, औद्योगिक क्षेत्रे, शहरे आणि ग्रामीण भागांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या तहानेपुरता मर्यादित न राहता, व्यापक प्रादेशिक विकासाला चालना देणारा ठरू शकतो. त्याचबरोबर मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी कोकणातील अन्य जलस्रोतांवर असलेला ताण कमी करण्याचीही शक्यता निर्माण होईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पाणी वळविणे, ही साधी प्रक्रिया नाही. पाणी उपसण्यासाठी लागणारी ऊर्जा, जलवाहिन्यांचा खर्च, भौगोलिक अडथळे, पर्यावरणीय परिणाम आणि पाण्याची उपलब्धता, या सर्व बाबींची शास्त्रीय तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तावाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करणे, ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. राज्य सरकार ही पायरी यशस्वीपणे पार करेल, यात शंकाच नाही.
मुंबईला भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आजच पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे. संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकटाची शक्यता ओळखून नियोजन करणे, हीच खरी राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे. कोयनेच्या पाण्याचा प्रस्ताव याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो.
राजकीय विरोधाचे ग्रहण!
कोयना जलविद्युत’ प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर पश्चिमेकडे वाहणार्या पाण्याचा मुंबईसाठी उपयोग करण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होताच, राजकीय वर्तुळात विरोधाचे सूर उमटू लागले. सातारा आणि सांगलीतील दुष्काळी भागांना पाणी मिळाले पाहिजे, तसेच कोकणातील गावांची तहान भागल्याशिवाय पाणी मुंबईकडे वळवू नये, अशी भूमिका काही लोकप्रतिनिधींनी मांडली. स्थानिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र, प्रस्तावाचा तांत्रिक अभ्यास होण्याआधीच त्याला विरोध करणे कितपत योग्य, हा प्रश्नही उपस्थित होतो.
कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला, तरी उन्हाळ्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि अन्य दुष्काळी भागांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या भागांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय घेता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्ट केले आहे की, सध्या वापरात असलेले किंवा कोणत्याही प्रदेशाच्या हक्काचे पाणी वळविण्याचा सरकारचा विचार नाही. कोकणासह संबंधित भागांच्या मागण्यांचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे प्रस्तावाचा अर्थ, ‘विद्यमान पाणीवाटपात हस्तक्षेप’ असा काढणे योग्य ठरणार नाही.
लोकप्रतिनिधींनी स्थानिक जनतेचे प्रश्न मांडणे, सरकारला जाब विचारणे आणि आवश्यक तेथे विरोध करणे, हे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग. मात्र, प्रत्येक विकास प्रस्तावाला राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनविण्याऐवजी त्यातील त्रुटी, अडचणी आणि पर्याय समोर आणणे अधिक गरजेचे आहे. अभ्यासाआधीच विरोधाची भूमिका घेतल्यास, संभाव्य विकासाच्या संधींची दारे बंद होऊ शकतात. सरकारनेही या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.
मुंबईची तहान भागवताना कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दुष्काळी भागांचे जलहित सुरक्षित राहिले पाहिजे. विकास आणि स्थानिकांचे हक्क यांच्यात संघर्ष निर्माण करण्याऐवजी दोन्हींचा समतोल साधणे, हीच खरी राजकीय परिपक्वता ठरेल. विकासाला विरोध करण्यापेक्षा तो सर्वसमावेशक करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे, ही म्हणूनच काळाची गरज म्हणावी लागेल.