‘जलयुक्त शिवार ३.०’ : दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने नवे पाऊल!


Jalyukt Shivar 3.0
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सुरू केलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात नवी दिशा दिली. पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे आणि दुष्काळग्रस्त गावांना टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही योजना लोकचळवळ बनली. ‘जलयुक्त शिवार ३.०’च्या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांमध्ये जलसंधारणाची नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्रा’च्या संकल्पनेला बळ देणारा हा पुढचा टप्पा ठरणार आहे. त्यानिमित्ताने...
 
पावसाचा प्रत्येक थेंब अडवायचा, तो जमिनीत जिरवायचा आणि गावाच्या पाण्याची गरज गावातच भागवायची, या विचारातून सुरू झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाला आता तिसर्‍या टप्प्यात नवे व्यापक स्वरूप मिळणार आहे. राज्यातील १८ हजार गावांमध्ये जलसंधारणाची कामे आणि मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचना निर्माण करण्याचे उद्दिष्ट सरकारतर्फे निर्धारित करण्यात आले आहे. हे केवळ आकडे नाहीत; तर दुष्काळाच्या संकटाशी लढण्याची राज्याची सामूहिक इच्छाशक्ती म्हणावी लागेल.
 
महाराष्ट्रात दुष्काळ हा केवळ नैसर्गिक संकट नाही. पावसाचे अनियमित वितरण, पाण्याचा अपव्यय, भूजलाचा अतिवापर आणि जलस्रोतांचे दुर्लक्ष, यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचे संकट अधिक तीव्र होत गेले. अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्याचा वापर करण्यापेक्षा पाऊस पडत असतानाच पाणी अडवून त्याचे नियोजन करण्याची गरज ओळखणे महत्त्वाचे होते. याच विचारातून २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची सुरुवात केली.
 
एका निर्णयातून उभी राहिलेली जलसंधारणाची चळवळ
 
२०१४ मध्ये राज्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाचे मोठे आव्हान होते. मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक दुष्काळी भागांमध्ये शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत होते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या मोठी होती. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता, दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला.
 
दि. ५ डिसेंबर २०१४ रोजी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्यभर सुरू करण्यात आले. गावाच्या शिवारात पडणारे पावसाचे पाणी गावाच्या हद्दीतच अडवणे, नद्या-नाले खोलीकरण, बंधारे, शेततळी आणि जलसंधारणाच्या विविध संरचना निर्माण करणे, तसेच भूजल पातळी वाढविणे, यावर अभियानाचा भर होता. ही योजना सरकारी फाईलपुरती मर्यादित न ठेवता, लोकसहभागातून राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेनेही या प्रयत्नांना पूरक दिशा दिली.
 
आकडे सांगतात जलसंधारणाच्या प्रयत्नांची कहाणी
 
‘जलयुक्त शिवार’च्या पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा घेतला, तर अभियानाची व्याप्ती लक्षात येते. २०१५ ते २०१९ या कालावधीत २२ हजार ५९३ गावांमध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण करण्यात आली. सरकारी आकडेवारीनुसार, २० हजार ५४४ गावांना ‘१०० टक्के जलपरिपूर्ण’ म्हणून घोषित करण्यात आले. या कामांमुळे २७ लाख ‘टीसीएम’ जलसाठा निर्माण झाला, तर ३९ लाख हेटर सिंचन क्षमता निर्माण झाली.
 
या अभियानाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे टँकरवरील अवलंबित्व कमी होणे. २०१५ मध्ये राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ६ हजार १४० टँकर्सची आवश्यकता होती. पुढील वर्षात ही संख्या कमी होत २०१६ मध्ये १ हजार ३७९, २०१७ मध्ये ३६६ आणि २०१८ मध्ये १५२ पर्यंत आली. या आकडेवारीतून जलसंधारणाच्या कामांचा ग्रामीण पाणीपुरवठ्यावर झालेला संभाव्य परिणाम स्पष्ट होतो. ही आकडेवारी केवळ एका सरकारच्या योजनेचे यश सांगणारी नाही; तर पाण्याचे नियोजन, लोकसहभाग आणि स्थानिक पातळीवरील हस्तक्षेप यांची ताकदही अधोरेखित करणारी आहे. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न हा केवळ प्रशासनाचा विषय न राहता, गावाचा सामूहिक विषय बनला.
 
महाविकास आघाडीचा विरोध, चौकशांचा ससेमिरा आणि स्थगिती
 
‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाल्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकारने या अभियानांतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. दि. १४ ऑटोबर २०२० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभियानातील कामांची खुली चौकशी करण्यासह योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सेवानिवृत्त अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या निर्णयामुळे ‘जलयुक्त शिवार’च्या पुढील टप्प्यातील कामांना खीळ बसली. मात्र, जून २०२२ मध्ये राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अभियानाला नव्याने गती देण्यात आली आणि ‘जलयुक्त शिवार २.०’ सुरू करण्यात आले.
 
‘२.०’नंतर आता ‘३.०’ : अधिक व्यापक, अधिक शास्त्रीय
 
‘जलयुक्त शिवार’च्या पहिल्या टप्प्यानंतर दुसर्‍या टप्प्यात उपलब्ध भूजलाचा शाश्वत वापर, पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसाक्षरतेवर भर देण्यात आला. जानेवारी २०२३ पासून ‘जलयुक्त शिवार २.०’ची अंमलबजावणी सुरू झाली. आता तिसर्‍या टप्प्यात १८ हजार गावांमध्ये जलसंधारणाची कामे राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
यावेळी विविध योजनांमधील निधी आणि कामांचे एकत्रीकरण करून अधिक समन्वित पद्धतीने जलसंधारण करण्याचा प्रयत्न आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन’ योजना, ‘मनरेगा’ आणि इतर योजनांच्या माध्यमातून उपलब्ध संसाधनांचा उपयोग केला जाणार आहे. वन विभाग, ग्रामविकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि पाणीपुरवठा विभागांना या कामांमध्ये सहभागी करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पाण्याचे नियोजन केवळ गावाच्या शिवारापुरते मर्यादित राहू नये, तर घरांच्या छतावरील पावसाचे पाणी, शासकीय इमारती, वन क्षेत्र, शेततळी आणि नदी पुनरुज्जीवन अशा विविध स्तरांवर व्हावे, हा या नव्या टप्प्याचा व्यापक दृष्टिकोन आहे.
 
योजनेचे यश आकड्यांपलीकडे तपासण्याची गरज
 
‘जलयुक्त शिवार’ अभियानाने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली, हे निश्चित. मात्र, कोणतीही जलसंधारण योजना यशस्वी ठरवताना केवळ किती कामे झाली किंवा किती गावांना ‘जलपरिपूर्ण’ घोषित केले, यावर समाधान मानता येणार नाही. प्रत्यक्ष भूजल पातळी किती वाढली? उन्हाळ्यात किती काळ पाणी उपलब्ध राहिले? शेतकर्‍यांना सिंचनाचा किती लाभ झाला? पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम झाला का? निर्माण केलेल्या संरचनांची देखभाल कोण करणार? या प्रश्नांची उत्तरेही तितकीच महत्त्वाची आहेत.
 
‘जलयुक्त शिवार ३.०’मध्ये शास्त्रीय नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन, ‘मॅपिंग’ आणि संरचनांची पडताळणी यावर भर देण्याची भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. उपग्रह तंत्रज्ञान, ‘जीआयएस’ आणि स्थानिक जल-ताळेबंद यांच्या मदतीने योग्य ठिकाणी योग्य कामे झाली, तर खर्चाचा परिणाम अधिक दीर्घकालीन होऊ शकतो.
 
लोकसहभागाशिवाय जलसमृद्धी नाही
 
पाणी ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. गावातील प्रत्येक नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायत, उद्योग आणि सामाजिक संस्था यांचा सामूहिक सहभाग आवश्यक आहे. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकांनी श्रमदान करणे, गावाच्या पाण्याचा ताळेबंद तयार करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि निर्माण झालेल्या संरचनांची देखभाल करणे, या बाबी अभियानाच्या यशासाठी निर्णायक ठरणार आहेत.
 
‘जलसंचय : जनभागीदारी’ या संकल्पनेतून राज्य सरकारने लोकसहभागाला पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे. जलसंधारणाच्या कामांमध्ये स्थानिक विकास निधी, ‘सीएसआर’, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची संधी आहे. प्रत्येक गावाने स्वतःच्या पाण्याची जबाबदारी स्वीकारली, तर ‘जलयुक्त शिवार’ ही योजना खर्‍या अर्थाने लोकचळवळ बनू शकते.
 
‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ : घोषणेपासून वास्तवाकडे...
 
महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीचा मार्ग केवळ मोठ्या धरणांमधून जात नाही. लहान जलसंधारण संरचना, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास, जलसाक्षरता आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांचा एकत्रित परिणामच जलसमृद्धी घडवू शकतो. ‘जलयुक्त शिवार ३.०’ हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सुरू केलेल्या जलसंधारणाच्या प्रवासाला आता तंत्रज्ञान, व्यापक समन्वय आणि जनभागीदारीची जोड देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या अभियानाचे खरे यश मे २०२७ पर्यंत किती संरचना उभ्या राहिल्या यापेक्षा, त्या संरचनांनी पुढील अनेक वर्षे महाराष्ट्रातील गावांना पाणी दिले का, यावर ठरणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरला, प्रत्येक गावाने आपल्या पाण्याचे नियोजन केले आणि जलसंधारणाची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारली, तर ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्रा’चे स्वप्न घोषणेतून वास्तवात उतरू शकते.
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर