सरकार आणि उद्योगधंदे ही देशाच्या विकासाची दोन अत्यंत महत्त्वाची चाके. या दोन्ही चाकांमध्ये संतुलन असेल, तरच देशाच्या विकासप्रक्रियेला गतिमानता प्राप्त होते. तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीबरोबरच पायाभूत सोयीसुविधा, मालवाहतूक अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारी रोजगारनिर्मितीही देशाच्या विकासाला सर्वस्वी चालना देणारी ठरते. तेव्हा, ‘विकसित भारता’साठीच्या विकसित उद्योगांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
भारताला आर्थिक-व्यावसायिक क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रात विकसित करायचे असेल, तर त्यासाठी विकसित उद्योग-व्यवसाय नितांत आवश्यक ठरतात. अशा प्रकारचा आर्थिक-औद्योगिक विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांतील व जागतिकस्तरावरील उत्पादन-वितरण प्रक्रियेत यशस्वीपणे मात करणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतातील उद्योग-व्यवसायाने केवळ उत्पादनवाढ व उत्पादकतेच्या वाढीवर समाधान न मानता, केवळ भारत व भारतीयांपुरतेच आपले उत्पादन-व्यवसाय क्षेत्र मर्यादित न ठेवता, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापक असे स्वरूप प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे. ‘जगासाठी भारतातील उत्पादन’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हाक म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरते.
यासाठी भारतीय उद्योगांतर्गतची परंपरागत रचना व व्यवस्था पडताळून पाहण्यासारखी आहे. आपल्या उद्योग व्यवस्थेत प्रकर्षाने व प्रामुख्याने लक्षात येणारी बाब म्हणजे, आपल्या उद्योगांमध्ये मोठ्या उद्योगांपासून मध्यम-लघू व त्याच्याच जोडीला ग्रामीण व कुटीरोद्योगांचा समन्वय दिसून येतो. आपल्या एकूणच औद्योगिक-व्यवसाय क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, लहान-मोठ्या प्रत्येक उद्योगांना उद्यमी उद्योजकतेची साथ लाभली आहे. उद्योगातील गुंतवणूक भलेही कमी-अधिक असो, ‘एंटरप्रेन्युअरशिप’ म्हणजेच, उद्योजकतेची भावना व जिद्द समान स्वरूपात दिसून येते. दुसरी तेवढीच महत्त्वाची बाब म्हणजे, भारतातील विविध उद्योग हे अनेकार्थांनी परस्परपूरक आहेत. एका उद्योगाचा उत्पादित माल दुसर्याच्या व्यवसायासाठी कच्चा माल ठरू शकतो. यात प्रक्रिया उद्योगापासून विविध प्रकारच्या पूरक उद्योगांचा समावेश होतो.
उद्योग-व्यवसायाला प्रगती व स्थिरता लाभण्यासाठी आर्थिक पाठबळ व त्याला पूरक असे धोरणात्मक निर्णय यांची नितांत आवश्यकता असते. ही बाब शासन व बँकासह वित्तीय संस्था आणि संबंधित प्रशासनस्तरावर अपेक्षितरीत्या हाताळलेली दिसत असून, ‘एमएसएमई’ उद्योगांपासून मोठ्या व प्रस्थापित उद्योगांना हे धोरण व प्रयत्नपूरक व साहाय्यक ठरल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे.
उद्योगानुकूल व व्यवसायपूरक वातावरणनिर्मितीचा औपचारिक प्रयत्न २००३ मध्ये ‘व्हायब्रंट गुजरात’ या उपक्रमामुळे प्रामुख्याने झाला. यामध्ये सुरुवातीला देशांतर्गत व त्याच्याच जोडीला विदेशी उद्योग व विशेषत: अनिवासी भारतीय उद्योजक वा उद्योजकतेचा विचार करणारे अशा सर्वांना आवर्जून सामील करून घेण्यात आले. या सर्वांना सुरुवातीला गुजरातमध्ये उद्योग-व्यवसाय विस्तार व त्याचबरोबर नवी आर्थिक व तंत्रज्ञानविषयक विस्तारासह गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करून त्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या कल्पक प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळून, त्यातूनच ‘व्हायब्रंट गुजरात’ हा प्रयोग गुजरातच्या संदर्भात विकसित उद्योग-व्यवसायांना चालना देणारा ठरला व पुढे त्याची सातत्याने व सफलपणे अंमलबजावणी केली गेली, हे यासंदर्भात महत्त्वाचे ठरते.
उद्योगांची सुरुवात आणि विकासासाठी उद्योगांना आवश्यक अशा मूलभूत सुविधा व संसाधनांची आवश्यकता असते. यामध्ये लहान-मध्यम व मोठ्या उद्योगांच्या आवश्यकतेनुसार सोयीच्या ठिकाणची जमीन, उद्योग प्रक्रिया व वापरासाठी आवश्यक पाणी, अखंडित व आवश्यक प्रमाणातील वीजपुरवठा, रस्ते व वाहतूक-दळणवळणाची साधने, व्यवसायासाठी आवश्यक अशा कौशल्यांची उपलब्धता, रेल्वे व आवश्यकतेनुसार बंदर वाहतूक सोयी व मुख्य म्हणजे, संबंधित राज्य सरकारचे उद्योग-पूरक धोरण व या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनिक मानसिकता इ. ची नितांत गरज असते.
गुजरातसारख्या राज्याने उद्योगांच्या संदर्भात प्रसंगी आर्थिक-करसवलती देऊन वरील बाब सिद्ध केली आहे. टाटांचा ‘नॅनो’ वाहन प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यासाठी अत्यंत लवचीकपणेच नव्हे, तर वैयक्तिक व तातडीने लक्ष घालून जी कारवाई केली, ती बाब उद्योग विकासाच्या दृष्टीने कळीची सिद्ध झाली होती. यातूनच पुढे केंद्र सरकारच्या जोडीलाच विभिन्न राज्य सरकारांनी उद्योगपूरक धोरणांचा अवलंब करून आपापल्या राज्यांमध्ये उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले. यासाठी प्रसंगी राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रयत्नांद्वारे विदेशी उद्योग-उद्योजक व गुंतवणूकदारांसह वित्तीय संस्थांना सातत्याने आकर्षित केले गेले. विदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचे अग्रणी स्थान व घेतलेली आघाडी लक्षणीय ठरली आहे.
उद्योग-व्यवसायवाढ या प्रक्रियेमध्ये लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांची वाढ अपरिहार्यपणे होत असते. मोठ्या वा प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करणार्या मध्यम व लघू उद्योगांना जसा उद्योगवाढीने फायदा होतो, त्याचप्रमाणे उद्योगांसाठी आवश्यक अशा बांधकाम, दुरुस्ती व विकास, नवीकरण इत्यादीतून मोठ्या व्यावसायिक विकास संधी मिळतात; तर कच्चा माल व प्रक्रिया झालेले उत्पादन यांची नित्याने ने-आण व वाहतूक करण्याकामी विविध स्वरूपातील वाहननिर्मिती व चालक-वाहकांपासून कार्यालयीन कर्मचार्यांपर्यंत मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होत असतात.
उद्योग-व्यवसायवाढ, शिक्षण-प्रशिक्षण व त्याद्वारे कौशल्य विकासवाढ हे फार मोठे क्षेत्र अनेकांना नेहमीच फायदेशीर ठरते. यावर वैयक्तिकस्तरापासून सरकारदरबारी प्रयत्न होत असतात. मात्र, त्याला अधिकाधिक दर्जेदार व गतिमान करणेदेखील आवश्यक ठरते. या आणि अशा प्रयत्नांमुळे उद्योग-व्यवसायाच्या वाढत्या मानव-संसाधनविषयक गरजा पूर्ण होतानाच, शैक्षणिक व कौशल्यविषयक पात्रताधारक उमेदवारांना योग्य व त्यांच्या अपेक्षेनुरूप संधी मिळतानाच, उद्योग-व्यवसायाच्या वाढीला नेहमीच चालना मिळेल.
लेखक- दत्तात्रय आंबुलकर (लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.) ९८२२८४७८८६