पायाभूत विकासाचा नवा महामार्ग!

    27-Nov-2026

Construction Machinery Manufacturing Scheme India 
 
केंद्र सरकारने देशातील आधुनिक बांधकाम आणि पायाभूत सुविधा यंत्रसामग्री उत्पादनाला चालना देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या भव्य योजनेला दिलेली मंजुरी हे ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल. या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे आयात अवलंबित्व संपून भारत जागतिक यंत्रसामग्री उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.
 
कोणत्याही देशाच्या आर्थिक महासत्ता बनण्याच्या प्रवासात आधुनिक पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा टप्पा. मात्र, या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारी महाकाय आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री परदेशातून आयात करावी लागत असेल, तर त्या विकासाला मर्यादाही येतात. हीच बाब ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बांधकाम आणि पायाभूत सुविधा यंत्रसामग्री अर्थात, ‘सीआयई’ उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. रस्ते, द्रुतगती महामार्ग, मेट्रो, बोगदे, बंदरे, विमानतळे, खाणकाम, ऊर्जा प्रकल्प आणि गृहनिर्माण प्रकल्पांना वेग देणारी अवजड यंत्रे, तसेच त्यांचे सुटे भाग या व्यापक क्षेत्राच्या कक्षेत येतात. आजघडीला चीन आणि अमेरिकेनंतर भारत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी ‘सीआयई’ बाजारपेठ ठरली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या उद्योगाची एकूण उलाढाल सुमारे ९७ हजार ५०० कोटी रुपये इतकी नोंदवली गेली असून, देशातील वेगवान शहरीकरण आणि पायाभूत प्रकल्पांच्या जोरावर २०२९-३० पर्यंत ही बाजारपेठ दुप्पटीहून अधिक वाढून २ लाख २८ हजार १०० कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
 
देशाच्या उत्पादन क्षेत्रात आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) ‘सीआयई’ क्षेत्राचे योगदान हे उलाढालीपुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी गुणक म्हणून काम करते. पायाभूत सुविधांवर होणारा सरकारी आणि खासगी भांडवली खर्च प्रत्यक्षात उतरवण्याचे माध्यम म्हणजे ही यंत्रसामग्री होय. या यंत्रांच्या उत्पादनापासून ते त्यांच्या सुट्या भागांची निर्मिती, विक्री, देखभाल आणि दुरुस्तीपर्यंतच्या साखळीत देशातील लाखो अभियंते, कुशल कामगार, प्रशिक्षित यंत्रचालक आणि हजारो सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगारनिर्मितीला गती देणारा हा उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात मोलाची भर घालत आला आहे.
 
या क्षेत्रातील भारताचा आजवरचा प्रवास पाहिला, तर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके आपण अवजड आणि गुंतागुंतीच्या यंत्रसामग्रीसाठी युरोप, अमेरिका आणि अलीकडच्या काळात चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिलो. भारतात प्रामुख्याने परदेशातून आणलेल्या सुट्या भागांची जुळवाजुळव करण्यापुरतेच काम मर्यादित राहिले होते. १९६०च्या दशकापूर्वी बांधकाम आणि खाणकामासाठी लागणारी बहुतांश अवजड यंत्रे आयात करावी लागत. १९६४ मध्ये ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ अर्थात, ‘बीईएमएल’ने बुलडोझर, डम्पर्स, ग्रेडर्स आणि स्क्रॅपर्सचे उत्पादन सुरू केले. पुढे ‘हिंदुस्तान मोटर्स’नेही या क्षेत्रात प्रवेश केला, तर १९७४ मध्ये ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ने ‘हायड्रॉलिक एस्कॅव्हेटर्स’चे उत्पादन सुरू केले. जागतिक कंपन्यांशी सहकार्य, संयुक्त उपक्रम आणि देशांतर्गत उत्पादन केंद्रांमुळे उद्योगाचा विस्तार झाला. आज देशांतर्गत बाजारात विकल्या जाणार्‍या बांधकाम यंत्रांपैकी संख्येने सुमारे ९८ टक्के यंत्रे भारतात तयार होतात. तरीही, प्रगत यंत्रे आणि महत्त्वाच्या घटकांसाठी आयातीवरील अवलंबित्व कायम आहे. ‘सीआयई’ क्षेत्राच्या एकूण गरजेपैकी सुमारे ४५ टक्के गरज आयातीतून भागवली जाते. टनेल बोरिंग मशीन्स, अवजड ट्रस, विशिष्ट प्रकारच्या क्रेन्स आणि प्रगत ‘हायड्रॉलिक’ प्रणालींसाठी हे अवलंबित्व अधिक आहे.
 
गेल्या १२ वर्षांत ‘भारतमाला’, ‘सागरमाला’, ‘पंतप्रधान गतिशक्ती योजना’, समर्पित मालवाहतूक कॉरिडोर आणि देशभरातील मेट्रोजाळ्याच्या विस्ताराने या क्षेत्राची मागणी प्रचंड वाढली. रस्तेबांधणी, रेल्वेरूळ टाकणे, बंदरांचा विकास, कोळसा व खनिज उत्खनन, जलविद्युत प्रकल्प, सिमेंट आणि पोलाद उद्योग ही सर्व महत्त्वाची क्षेत्रे थेट या यंत्रसामग्रीवर अवलंबून आहेत. आधुनिक यंत्रे वेळेत आणि योग्य किमतीत उपलब्ध झाली नाहीत, तर राष्ट्रीय प्रकल्प रखडतात आणि त्यांचा खर्च कैकपटींनी वाढतो. अशा परिस्थितीत या क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता ही आर्थिकच नव्हे, तर सामरिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरते. विशेषतः शहरांखालून किंवा डोंगरांतून बोगदे खणणारी महाकाय टनेल बोरिंग मशीन्स (टीबीएम), उच्च क्षमतेच्या क्रेन्स आणि खाणकामातील अवजड वाहनांसाठी चीनसारख्या देशांवर अवलंबून राहणे किती धोक्याचे ठरू शकते, हे आपण अनेक प्रकल्पांच्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले आहे. परकीय यंत्रांवरील अवलंबित्वामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान विदेशी चलन देशाबाहेर जातेच. शिवाय, भू-राजकीय तणावाच्या काळात सुट्या भागांचा पुरवठा रोखून भारताच्या विकासकामांची कोंडी करण्याची भीतीही कायम राहते. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून ही अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तिचे तंत्रज्ञान भारतातच विकसित होणे, ही काळाची नितांत गरज होती.
 
केंद्र सरकारने मंजूर केलेली योजना हीच पोकळी भरून काढणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयामार्फत २०२६-२७ ते २०३३-३४ या आठ वर्षांच्या कालावधीत ती राबवली जाणार आहे. भारतात पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जाणार्‍या सात प्रमुख यंत्र श्रेणींवर या योजनेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये बोगदा खणणारी यंत्रे (टनेल बोरिंग मशीन्स), ऑफ-हायवे ट्रस, उत्खनन यंत्रे (एस्कॅव्हेटर्स), क्रेन्स, लोडर्स, पाईलिंग रिग्ज आणि ड्रिलिंग मशीन्स, तसेच त्यांच्या महत्त्वाच्या सुट्या भागांचा समावेश आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी विक्रीशी निगडित प्रोत्साहन (सेल्स लिंड इन्सेंटिव्ह) देणे आणि देशातच स्वतंत्र ‘सीआयई’ चाचणी सुविधा (टेस्टिंग फॅसिलिटी) उभारण्यासाठी अनुदान देणे, असे या योजनेचे दोन प्रमुख स्तंभ आहेत. या निर्णयामुळे जागतिक कंपन्या भारतात प्रकल्प उभारण्यास प्रवृत्त होतील, देशांतर्गत लघुउद्योगांना सुटे भाग पुरवण्याची सुवर्णसंधी मिळेल आणि आयातीवरील मोठी बचत होऊन भारत एक सक्षम निर्यातदार देश म्हणून जगासमोर उभा राहील.
 
अर्थात, या योजनेला दीर्घकालीन आणि शाश्वत यश मिळवून देण्यासाठी आगामी काळात काही पूरक पावलेही तितयाच वेगाने उचलावी लागतील. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी संशोधन आणि विकासावर (आर अ‍ॅण्ड डी) भरीव गुंतवणूक करत डिझेलऐवजी हरित इंधन, बॅटरी आणि हायड्रोजनवर चालणारी पर्यावरणपूरक यंत्रसामग्री विकसित करणे गरजेचे आहे. ‘प्रिसिजन हायड्रॉलिस’, सेन्सर्स, गिअरबॉस आणि इलेट्रॉनिस सुट्या भागांच्या निर्मितीत देशांतर्गत लघुउद्योगांची तांत्रिक क्षमता वाढवावी लागेल. तसेच अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रे हाताळण्यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ घडवावे लागेल. जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमत या जोरावर भारतीय बनावटीची यंत्रे जगभरातील प्रकल्पांमध्ये कार्यरत झालेली दिसली पाहिजेत. सरकारने दिलेले ११ हजार कोटींचे हे धोरणात्मक बळ आणि भारतीय उद्योजकांची नवनिर्मितीची जिद्द एकत्र आली, तर २०४७ मधील ‘विकसित भारता’च्या उभारणीत स्वदेशी यंत्रसामग्रीचा वाटा सर्वाधिक मोलाचा ठरेल, यात कोणतीही शंका नाही!
 




संबंधित मजकूर