मुंबई, : (Chiku Piku Children's Books Mumbai Book Festival)मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमणाऱ्या चिमुकल्यांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडण्यासाठी मुंबई पुस्तक महोत्सवात ‘चिकू पिकू प्रकाशन’चा विशेष स्टॉल लक्षवेधी ठरत आहे. एक ते आठ वर्षांच्या मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या स्टॉलवर गोष्टी, कविता, लोककला, इतिहास, निसर्ग, रहस्य, पोशाख अशा विविध विषयांवरील पुस्तकांची मेजवानी आहे. विशेष म्हणजे, मुलांनी केवळ पुस्तके विकत घ्यावीत किंवा वाचावीत, एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून त्यांना पुस्तकांच्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी पालकांनी मुलांना पुस्तक महोत्सवात आणावे, असे प्रकाशनाचे गोविंद कबाडे यांनी सांगितले.
पुण्यात कार्यालय असलेल्या ‘चिकू पिकू’ प्रकाशनाचे हे आठवे वर्ष आहे. केवळ लहान मुलांसाठी मराठी भाषेत साहित्यनिर्मिती करणाऱ्या या प्रकाशनाचे देशभरात सुमारे १० हजार सदस्य आहेत. दर महिन्याला पोस्टाद्वारे मुलांपर्यंत अंक पोहोचवले जातात. मुलांच्या वयोगटानुसार त्यांच्या आकलनशक्तीला आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे साहित्य तयार करण्यावर प्रकाशनाचा भर आहे.(Chiku Piku Children's Books Mumbai Book Festival)
मुलांची जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न
‘चिकू पिकू’च्या पुस्तकांमध्ये केवळ पारंपरिक गोष्टी नसून विविध अॅक्टिव्हिटींच्या माध्यमातून मुलांना शिकण्याची संधी दिली जाते. कथा, कविता, चित्रे आणि कृती यांच्या माध्यमातून मुलांची जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय ‘जंमत गोष्टी’ या ऑडिओ स्टोरी अॅपच्या माध्यमातून गोष्टी ऐकण्याचा अनुभवही मुलांना मिळतो. या अॅपचे देशभरात सुमारे १५ हजार सबस्क्रायबर आहेत.(Chiku Piku Children's Books Mumbai Book Festival)
पुस्तक महोत्सव म्हणजे अनुभवाची शाळा
मुंबई पुस्तक महोत्सवात सध्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असली तरी लहान मुलांसाठीच्या पुस्तकांच्या स्टॉलकडे पालकांचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे गोविंद कबाडे यांनी सांगितले. मात्र, मुलांनी पुस्तक वाचलेच पाहिजे किंवा पुस्तक विकत घेतलेच पाहिजे, असा आग्रह नसून त्यांना पुस्तकांच्या जगाशी परिचित करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. पुस्तकांचे स्टॉल, विविध प्रकारची पुस्तके, लेखक, प्रकाशक आणि वाचनाचे वातावरण याचा अनुभव मुलांना मिळणे हीदेखील त्यांच्या विकासातील महत्त्वाची पायरी आहे.
एनबीटीने यंदाच्या पुस्तक महोत्सवात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. त्यामुळे पालकांनी आवर्जून मुलांना या विभागात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.(Chiku Piku Children's Books Mumbai Book Festival)
लहान मुलांना संतपरंपरेची ओळख करून देणार
आतापर्यंत लोककला, इतिहास, निसर्ग, रहस्य, विविध पोशाख, गोष्टी आणि कविता अशा विषयांवर मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणारे ‘चिकू पिकू’ प्रकाशन आता संतपरंपरेचीही ओळख चिमुकल्यांना करून देणार आहे. संतपरंपरेवर आधारित मुलांना सहज समजेल अशा स्वरूपातील काही पुस्तके लवकरच आणण्याचा मानस प्रकाशनाने व्यक्त केला आहे.
पुस्तक हे केवळ वाचनाचे साधन नसून मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारे माध्यम आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सवातील ‘चिकू पिकू’सारखे स्टॉल चिमुकल्यांसाठी पुस्तकांशी मैत्री करण्याची एक वेगळीच संधी ठरत आहेत.(Chiku Piku Children's Books Mumbai Book Festival)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....