अंतराळात ‘एआय’चे साम्राज्य!

    27-Nov-2026   

AI Data Centres in Space
 
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यातील लढाईला आता अंतराळाचे परिमाण लाभणार आहे. ऊर्जा, संगणकीय क्षमता आणि माहिती प्रक्रिया यांवरील मर्यादा दूर करण्यासाठी एलॉन मस्क यांनी अंतराळाकडे मोर्चा वळवला आहे. पृथ्वीवरील ‘डेटा सेंटर्स’च्या पलीकडे जाऊन अवकाशातच संगणकीय पायाभूत सुविधा उभारण्याची ही कल्पना प्रत्यक्षात आली, तर तंत्रज्ञानाच्या इतिहासातील ही एका नव्या पर्वाची नांदी ठरु शकते.
 
एकेकाळी आकाशाकडे पाहून उड्डाणाचे स्वप्न पाहणार्‍या माणसाने विमानाचा शोध लावला. त्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर यंत्रमानव पाठवले आणि पृथ्वीभोवती उपग्रहांचे जाळे निर्माण केले. आता याच प्रवासात आणखी एका महत्त्वाकांक्षी संकल्पनेची भर पडत आहे. ती म्हणजे अंतराळातच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) ‘डेटा सेंटर्स’ उभारण्याची!
 
आज जगात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित राहिलेली नाही. अर्थव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, संशोधन, दळणवळण आणि राष्ट्रीय सुरक्षेपासून ते दैनंदिन जीवनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा प्रभाव वाढत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या प्रचंड विस्तारामागे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे ‘एआय’ला चालवण्यासाठी लागणारी अफाट संगणकीय क्षमता आणि ऊर्जा उपलब्ध करून द्यायची कशी? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या दिशेने ‘स्पेसएस’ने अंतराळाकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. अंतराळात तब्बल दहा लाखांपर्यंत उपग्रहांच्या माध्यमातून ‘ऑर्बिटल डेटा सेंटर्स’ उभारण्याची संकल्पना ही केवळ उपग्रह तंत्रज्ञानातील प्रगती नाही, तर भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेची रचनाच बदलण्याची क्षमता असलेली कल्पना आहे.
 
पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांना सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळू शकते. योग्य कक्षेत असलेल्या उपग्रहांना तुलनेने दीर्घकाळ सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. त्यामुळे मोठ्या सौरपॅनेलच्या साहाय्याने वीज निर्माण करून ती थेट संगणकीय प्रणाली चालवण्यासाठी वापरता येऊ शकते. पृथ्वीवरील ‘डेटा सेंटर्स’प्रमाणे वीजनिर्मितीसाठी स्वतंत्र ऊर्जा प्रकल्प किंवा मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता भासणार नाही, असा या संकल्पनेमागील विचार आहे. याशिवाय, अंतराळात ‘डेटा’ प्रक्रिया झाल्यानंतर त्यातील आवश्यक माहिती पृथ्वीवर पाठवता येईल. त्यामुळे प्रत्येक गणनेसाठी पृथ्वीवरील मोठ्या ‘डेटा सेंटर’वर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र, अंतराळात सूर्यप्रकाश मुबलक असला, तरी तेथील परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे, असे समजणे चुकीचे ठरेल. ऊर्जा मिळवणे आणि ती वापरल्यानंतर निर्माण होणारी उष्णता बाहेर टाकणे, या दोन वेगळ्या समस्या आहेत. अंतराळातील निर्वात वातावरणात उष्णता दूर करण्यासाठी विशेष ‘रेडिएटर्स’ची आवश्यकता असते. त्यामुळे अंतराळातील ‘डेटा सेंटर’ची खरी कसोटी केवळ ऊर्जानिर्मितीत नसून, संपूर्ण प्रणालीच्या कार्यक्षमतेत असेल. ‘स्पेसएस’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव ‘स्टारमाईंड’ असे. ‘स्टारमाईंड’च्या माध्यमातून उपग्रहांनाच संगणकीय प्रक्रिया करणार्‍या केंद्रांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. या प्रणालीमध्ये प्रत्येक उपग्रह हा केवळ माहिती पाठवणारा किंवा स्वीकारणारा घटक नसेल, तर त्यामध्ये संगणकीय उपकरणे असतील. ती मोठ्या प्रमाणातील माहितीवर प्रक्रिया करू शकतील. अनेक उपग्रह एकमेकांशी जोडले गेल्यानंतर एक विशाल वितरित संगणकीय नेटवर्क तयार होईल. ‘स्पेसएस’च्या प्रस्तावानुसार, या ‘ऑप्टिकल नेटवर्क’ला पर्यायी व्यवस्था म्हणून ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’चा वापरही करता येणार आहे. याचा अर्थ असा की, अंतराळातील हे उपग्रह एकमेकांशी जोडलेले राहतील, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि आवश्यकतेनुसार पृथ्वीवरील केंद्रांशी संपर्क साधता येईल.
 
अंतराळात ‘डेटा सेंटर’ उभारण्याची कल्पना आकर्षक असली, तरी तिचे प्रत्यक्षात रूपांतर करणे अत्यंत आव्हानात्मकच. पृथ्वीच्या मर्यादा ओलांडून मानवी बुद्धिमत्तेला अवकाशाची जोड देणारा हा प्रवास यशस्वी झाला, तर भविष्यातील तंत्रज्ञानाचा इतिहास लिहिताना ‘स्टारमाईंड’सारख्या प्रकल्पांचा उल्लेख निश्चितच महत्त्वाचा ठरेल.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर