श्री विष्णू सहस्रनाम : एक अमृतानुभव

    26-Nov-2026

Vishnu Sahasranama
 
सृष्टीच्या चराचरात व्यापून उरलेल्या परमेश्वराचे स्वरूप शब्दांतून जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘श्री विष्णू सहस्रनाम’. भगवान श्रीविष्णूंच्या सहस्र नामांतून प्रकटणारे त्यांचे अनंत गुण, दिव्यत्व आणि विश्वव्यापक अस्तित्व साधकाला भक्तीपासून आत्मचिंतनापर्यंत घेऊन जाते. महाभारतातील भीष्म पितामहांच्या मुखातून प्रकटलेला हा आध्यात्मिक ज्ञानठेवा केवळ स्तोत्र नसून, परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार घडविणारा चिंतनमार्ग आहे. याच सहस्रनामाचा उगम, तत्त्वज्ञान आणि प्रत्येक नामातील आध्यात्मिक अर्थ उलगडणारी विशेष नवीन लेखमाला आजपासून सुरू होत आहे. परमात्म्याच्या नामातून त्याच्या स्वरूपाकडे जाणार्‍या या प्रवासाचे हे प्रास्ताविक.
 
महाभारताच्या अथांग आध्यात्मिक खजिन्यात दोन अमूल्य रत्ने विशेष तेजाने तळपतात, ‘भगवद्गीता’ आणि ‘श्री विष्णू सहस्रनाम’. या दोन्हींचा उगम दोन अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंगांत झाला आहे. युद्धारंभी कर्तव्यविन्मुख अर्जुनाला, श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले; तर महायुद्धातील विजयानंतरही अपराधभावना आणि शोकाने व्याकूळ युधिष्ठिराला भीष्म पितामहांनी विष्णू सहस्रनामाचा अमूल्य उपदेश केला. गीता विवेक, ज्ञान आणि कर्मयोग शिकवते, तर सहस्रनाम भक्ती, श्रद्धा आणि ईश्वरशरणागतीचा मार्ग दाखवते. एक ज्ञानाचा महासागर, तर दुसरे भक्तीचा अमृतप्रवाह!
 
महाभारत आणि सहस्रनामाची पार्श्वभूमी : महाभारताला भारतीय संस्कृतीत ‘पञ्चम वेद’ संबोधले जाते. मानवी जीवनातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचे दर्शन त्यात घडते. महर्षी व्यासांनी महाभारताच्या व्यापकतेचे वर्णन करताना म्हटले की,
 
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित्|
 
अर्थात, जे येथे आहे, ते अन्यत्रही आढळेल; परंतु जे येथे नाही, ते अन्यत्र कोठेही आढळणार नाही.
महाभारत युद्धाचा पारंपरिक काल इ.स.पू. ३,१०२ मानला जातो. तथापि, डॉ. नीलेश ओक यांनी महाभारतातील खगोलशास्त्रीय संदर्भ, विशेषतः अरुंधती-वसिष्ठ निरीक्षणाधारे इ.स.पू. ५,५६१ हा पर्यायी काल सुचवला. या मतभेदांमुळे, हा विषय संशोधन आणि चिकित्सक अभ्यासाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. परंतु जर्मन जेनेटिकलशास्त्रज्ञांच्या पेपरच्या आधारे ’वाय क्रोमोसोम बॉटल नेक’ तयार झाला होता. या आधारे महाभारत ७ हजार ५०० वर्षांपूर्वी घडलेले असावे, हा डॉ. नीलेश यांच्या निष्कर्षाला पुष्टी मिळते.
 
मौखिक परंपरा आणि भीष्म पितामहांचे विराट व्यक्तिमत्त्व : भारतीय ज्ञानपरंपरेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, मौखिक परंपरेतून ज्ञानाचे अचूक जतन. वेद, उपनिषदे आणि अनेक संस्कृत ग्रंथ पिढ्यान्पिढ्या उच्चार, स्वर, छंद आणि घनपाठासारख्या कठीण पद्धतींनी जतन केले गेले. विष्णू सहस्रनाम हे याच परंपरेचे एक तेजस्वी प्रतीक. तर या स्तोत्राचे उपदेशक भीष्म पितामह म्हणजे त्याग, प्रतिज्ञा, शौर्य, ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठेचे विलक्षण प्रतीक.
 
देवव्रताची आजन्म ब्रह्मचर्याची आणि राजसिंहासनाचा त्याग करण्याची प्रतिज्ञाच, त्यांना ‘भीष्म’ हे नाव मिळवून देणारी ठरली. मात्र, त्यांच्या जीवनात एक शोकात्म विरोधाभासही आहे. कर्तव्यनिष्ठा आणि राजनिष्ठेमुळे, अन्यायाच्या प्रसंगी त्यांना अपेक्षित भूमिका घेता आली नाही. द्रौपदी वस्त्रहरणावेळीचे मौन, हा त्यांच्या जीवनातील चिंतन करण्याजोगा प्रसंग. तरीही, श्रीकृष्णावरील त्यांची भक्ती अढळ होती. म्हणूनच त्यांच्या अंतिम उपदेशाला एक वेगळचे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते.
 
सहस्रनामाची दिव्य उत्पत्ती : कुरुक्षेत्रावरील युद्ध संपले होते. असंख्य वीरांचे बलिदान, आप्तस्वकीयांचा मृत्यू आणि राज्यप्राप्तीची किंमत यांमुळे युधिष्ठिराचे मन विषण्ण होते. अशा वेळी बाणांच्या शय्येवर भीष्म पितामह, ज्ञानाचा अखेरचा अमृतकलश घेऊन पडले होते. जवळच भगवान श्रीकृष्ण उपस्थित होते. युधिष्ठिरांनी भीष्मांना मानवी जीवनातील सर्वोच्च तत्त्व जाणून घेण्यासाठी सहा मूलभूत प्रश्न विचारले. त्यांपैकी एक प्रश्न असा की,
 
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्॥
 
अर्थात, कोणत्या नामाचे नामस्मरण केल्याने, जीव जन्म-मृत्यूच्या संसारबंधनातून मुक्त होऊ शकतो? याचे उत्तर देताना भीष्मांनी भगवान विष्णूच्या सहस्र दिव्य नामांचा उपदेश केला. त्यातील एक महत्त्वपूर्ण श्लोक म्हणजे,
 
जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम्|
स्तुवन्नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः॥
 
अर्थात, जगाचे स्वामी, देवांचेही देव, अनंत आणि पुरुषोत्तम अशा भगवान विष्णूंचे सहस्र नामांनी स्तवन करावे.
विश्वव्यापक परमात्मा आणि सहस्रनामाचे तत्त्वज्ञान : विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाम हे परमेश्वराच्या एका विशिष्ट गुणाचे, शक्तीचे किंवा स्वरूपाचे दर्शन घडवते. ऋग्वेदातील ‘पुरुषसूक्ता’त परमात्म्याच्या विराट स्वरूपाचे वर्णन येते,
 
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्|
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥
 
अर्थात, सहस्र मस्तके, सहस्र नेत्र आणि सहस्र चरण असलेला विराट पुरुष, संपूर्ण विश्व व्यापूनही त्याच्या पलीकडे उरतो. येथे ‘सहस्र’ हा शब्द केवळ संख्यावाचक नसून, अनंतत्वाचे प्रतीक आहे. सहस्रनामाचा गाभाही हाच.
 
आचार्यांची भाष्यपरंपरा आणि नामसामर्थ्य : आद्य शंकराचार्यांनी अद्वैताच्या दृष्टिकोनातून नामांमधील परब्रह्माचे स्वरूप स्पष्ट केले. पराशर भट्ट यांनी, विशिष्टाद्वैताच्या भूमिकेतून भगवान विष्णूंचे कल्याणकारी गुण उलगडले, तर मध्वाचार्यांनी द्वैत तत्त्वज्ञानातून विष्णूचे सर्वोच्चत्व अधोरेखित केले. एकाच स्तोत्रातून विविध तत्त्वज्ञानपरंपरांना चिंतनाचा व्यापक अवकाश मिळतो, ही त्याची विशेषता.
 
या सहस्रनामांत काही नावे पुनःपुन्हा येतात. मात्र, प्रत्येक वेळी संदर्भानुसार त्यांचा अर्थ, भावार्थ आणि आध्यात्मिक आशय वेगवेगळा उलगडतो. त्यामुळे सहस्रनामाचे पठण म्हणजे, परमेश्वराच्या एका नव्या गुणाचे दर्शन घडवणारा चिंतनप्रवास आहे. या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा सार एका सुंदर श्लोकात व्यक्त होते,
 
वासुदेवपरं ज्ञानं वासुदेवपरं तपः|
वासुदेवपरो धर्मो वासुदेवपरा गतिः॥
 
अर्थात, ज्ञानाचे परम ध्येय वासुदेव, तपाचे परम् ध्येय वासुदेव, धर्माचे अंतिम अधिष्ठान वासुदेव आणि जीवनाची अंतिम गतीही वासुदेवच आहेत.
 
नामस्मरण , आधुनिक जीवनातील आध्यात्मिक आधार : आजच्या धावपळीच्या जीवनात मनाची एकाग्रता आणि अंतःशांती मिळवणे, हे मोठेच आव्हान झाले आहे. अशा वेळी विष्णू सहस्रनामाचे पठण, श्रवण आणि अर्थचिंतन साधकाला शांतता, सकारात्मकता आणि आत्मिक स्थैर्य देते. केवळ नित्यपठण न करता, प्रत्येक नामाचा अर्थ समजून घेणे आणि त्यातील दैवी गुण आपल्या आचरण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी साधना.
 
पारंपरिक फायदे - फलश्रुतीनुसार: महाभारत (अनुशासन पर्व) आणि ‘पद्मपुराण’ इत्यादींतील फलश्रुतीनुसार नियमित श्रद्धेने पठण केल्यास, शारीरिक आरोग्य आणि दीर्घायुष्य : रोग, ज्वर, कष्ट यांपासून मुक्ती; शरीर निरोगी राहते. ‘चरकसंहिते’तही ज्वर आणि इतर विकारांसाठी, विष्णूसहस्रनामाचे स्तवन सांगितले आहे. आयुर्वेदात वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखण्यास यास आदर्श मानले आहे.
 
मनःशांती आणि मानसिक स्थिरता : मन शांत होऊन भीती, चिंता, क्रोध, अहंकार, संकुचित वृत्ती कमी होतात. आत्मविश्वास, धैर्य, सकारात्मक विचार आणि एकाग्रता वाढते. अनिद्रा कमी होऊन चांगली झोप लागते.
 
नाडी आणि प्राणशक्त : शरीरातील सुमारे ७२ हजार नाड्या स्वच्छ आणि ऊर्जावान होतात. यामुळे प्राणप्रवाह सुधारतो आणि शरीर-मन दोन्ही उत्तेजित आणि संतुलित राहतात.
 
संरक्षण आणि शुद्धीकरण : पापक्षय, नकारात्मक ऊर्जा, बाधा, ग्रहदोषापासून संरक्षण. शरीर, मन आणि अंतःकरणाची शुद्धी होते.
 
शास्त्रीय + आधुनिक दृष्टिकोन तणाव आणि कॉर्टिसॉल कमी होणे : १२ आठवड्यांच्या नियमित पठणाने डिप्रेशन, अ‍ॅन्झायटी, स्ट्रेस आणि सीरम कॉर्टिसॉल लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे पायलट अभ्यास दाखवतात. रक्तदाबही सामान्य श्रेणीत येतो.
 
मेंदू आणि मज्जातंतू : याच्या पठणाने ईईजी अभ्यासांमध्ये अल्फा आणि थिटा मेंदू-लहरी वाढतात, विश्रांती, तणाव कमी होणे, लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारणे. तसेच, व्हागस नर्व्ह (सर्वांत मोठी स्वायत्त मज्जातंतू) सक्रिय होण्यास मदत होते, ज्यामुळे परासिंपॅथेटिक सिस्टम (विश्रांती प्रतिसाद यंत्रणा) मजबूत होते. हृदयगती परिवर्तनशीलता (HRV) सुधारते आणि स्वायत्त मज्जातंतूसंस्था संतुलित होते.
 
संज्ञानात्मक फायदे : स्मरणशक्ती (विशेषतः spatial memory), एकाग्रता, मानसिक स्पष्टता आणि भावनिक नियंत्रण सुधारते. मध्यमवयीन प्रौढांवरील अभ्यासात ‘एन्झायटी’ कमी होणे, माइंडफुलनेस वाढणे आणि भावनिक लवचिकतेची नोंद आहे.
 
स्नायू आणि शरीर : तणाव कमी झाल्याने स्नायूंमधील ताण घटतो. याच्या नियमित पठणाने श्वासनियंत्रण सुधारते, ज्याने एकूण शरीरास तणावरहित अवस्थेचा अनुभव येतो.
 
विष्णुसहस्रनाम हे सर्व सहस्रनामांमध्ये महत्त्वाचं आहे, याचं कारण काय ? तर, हे सहस्रनाम प्रत्यक्ष कृष्णासमोरच म्हटलं गेलं! तसे बघितल्यास दहा सहस्रनाम आहेत, त्यांपैकी तीन प्रसिद्ध आहेत, विष्णू, शिव आणि ललिता. बुकगंगा पब्लिकेशन, पुणे प्रकाशित (७१४ पृष्ठे) ‘श्री विष्णू सहस्त्रनाम : महाभारतातील एक अमूल्यरत्न’ या माझ्या मूळ इंग्रजी ग्रंथाचे सविता क्षीरसागर यांनी केलेल्या भावार्थ रूपांतरामध्ये, या समृद्ध ग्रंथात भारतीय ज्ञानपरंपरा, भीष्म-युधिष्ठिर संवाद, प्रत्येक नामाचा सखोल अर्थ, ६५० हून अधिक संस्कृत संदर्भ, न्यूरोसायन्स व पठणपद्धती यांसारख्या अनेक अंगांचा ऊहापोह केला आहे. आजपासून सुरु या लेखमालेत आपण विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नामाचा शब्दार्थ, भावार्थ आणि जीवनोपयोगी संदेश समजून घेणार आहोत. हा प्रवास अंतरंगाचा शोध घेणारा ठरेल, हीच अपेक्षा. ज्याच्या केवळ स्मरणाने मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो, त्या अनंत, अनादि, सर्वव्यापी भगवान श्रीविष्णूंच्या चरणी ही लेखमाला विनम्रपणे समर्पित!
 
लेखक- विनय क्षीरसागर
 




संबंधित मजकूर