उत्तमौजा ‘उत्तमौजा’ पांडव पक्षातील अतिशय बलवान योद्धा. त्याच्या नावाची व्युत्पत्ती व्यास अशी सांगतात की, उत्तम म्हणजे उत्तम होय. हा ‘उत्तम’ शब्दसुद्धा आणखी दोन उपशब्दापासूनच बनला आहे. ‘उत’ म्हणजे खालच्या अवस्थेतून वर येणे आणि ‘तम’ म्हणजे अति श्रेष्ठ अवस्था. गुणविकासाच्या पायर्या दाखविताना व्याकरणात, साधारण अवस्थेच्या वरील अधिक श्रेष्ठ अवस्थेला ‘तर’ आणि अति श्रेष्ठ अवस्थेला ‘तम’ असा गुणविशेष लावतात. उच्च, उच्चतर, उच्चतम याप्रकारे. असल्या अति उच्च अवस्थेचे प्रतीक म्हणजे ‘उत्तम’ शब्द. या ‘उत्तम’ शब्दाला ‘ओज’ उपशब्द लागून, ‘उत्तमौज’ असा नवीन शब्द तयार करण्यात आला.
‘ओजस’ म्हणजे उत्क्रांत प्राकृतिक शक्ती. असली ओजस् शक्ती जागृत झाल्यास, साधकात आपणहून कवित्व शक्ती, विचारशक्ती, गायनकला, चित्रकला, सौंदर्य, बुद्धी-शक्ती इत्यादी ओजसावस्था येतात. म्हणून सारे संतयोगी उत्तम कवी आपणहून होतात. त्यांना कवित्वाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. याबाबतीत भगवान वेदव्यासांनी पूर्ण मानवाची अत्युत्तम अवस्था पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राद्वारे दाखविली आहे, तर भगवान श्रीरामचंद्रांना वाल्मीकी ऋषींनी मर्यादा पुरुषोत्तम दर्शविले.
भगवान गोपालकृष्ण अतिशय सुंदर, मल्ल, गायक, वादक, तत्त्ववेत्ता, राजकारणी, मुत्सद्दी, व्यवहारज्ञानी, सुधारक, सत्यान्वेषी, इत्यादी गुणांनी परिपूर्ण दाखविले आहेत. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श संपूर्ण मानवजातीसाठी अनंत काळाकरिता राहील. साधकात ओजस् शक्ती उत्पन्न झाल्यावर, उत्क्रांत परिपूर्ण मानवाचे सर्व गुण असल्या ओजसयुक्त साधकात आपणहून उत्पन्न होतात. उत्तम ओज हा गुण झाला, तर उत्तम औजा ही त्या उत्तम गुणांची अवस्था झाली. म्हणून, सर्वगुणसंपन्न साधकाला भगवान वेदव्यास ‘उत्तमौजा’ असे नामाभिधान देतात. अर्जुनरूप साधकाचा गुरू, सखा, उपदेशक भगवान श्रीकृष्ण, तर साहाय्यक उत्तमौजा असल्यावर दुर्वृत्तिरूप कौरवांवर विजय मिळविणे अशय नाही. गीता म्हणते, ‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥’
पांडवांचे विवाह व त्याचा यौगिक अर्थ
असे दिसून येते की, अर्जुन, भीम व जवळजवळ सर्व पांडवांनी अनेक वेळा विवाह करून, त्या स्त्रियांना आपल्या घरात आणलेले दिसेल. पांडवांचे गुरू श्रीकृष्णांनीसुद्धा अनेक विवाह केले. नरकासुराच्या बंदिखान्यातील १६ हजार १०० कन्या, त्याशिवाय भागवत पुराणात ‘स्यमंतक’ मण्याच्या चोरीच्या आख्यायिकेशी जोडलेली एक कथा आहे. जांबुवंत हे रामायण काळातील महापराक्रमी राजे, त्यांची पुत्री जांबुवंती हिच्याशी भगवंतांनी विवाह केला. अगदी तुळसीसोबतसुद्धा विवाह केला. परंतु, आश्चर्य असे की वाईट वृती मानलेल्या कौरवांनी अनेक विवाह केले नाहीत. द्रौपदीचे त्यांनी वस्त्रहरण केले; परंतु तेदेखील तिला दासी बनविल्यानंतर! इथे ‘स्त्री’चा अर्थ ‘चांगल्या वृत्ती’ असा घेतला, तर योग्य आशय लक्षात येईल. जेथे जेथे चांगल्या वृत्ती असतील, त्या आपण त्वरित आत्मसात कराव्यात. नरकासुराच्या बंदिखान्यातील १६ हजार १०८ मुली म्हणजे, शरीरातील सहस्र योग नाड्या होत. अर्जुनपुत्र अभिमन्यूचा जन्मसुद्धा असाच प्रेमविवाहातून झाला आहे. साधनाशास्त्रातील शिस्त व अनुभवांना आपल्या अद्वितीय कुंचल्याद्वारे रंग देऊन, चित्रभाव साकारताना त्यांनी त्या काळच्या अथवा सर्वकालीनच म्हणा ना, सामाजिक व्यंगांवर बरोबर बोट ठेवले आहे. संन्यासी बनून प्रेम प्रकरणे करणार्या भोंदू संन्याशांना व्यासांनी अर्जुनपुत्र अभिमन्यूच्या चरित्राद्वारे शालजोडीतील दिली आहे, हे लक्षात घेणे योग्य होईल.
अर्जुन व सुभद्रापुत्र अभिमन्यूचा जन्म
द्रौपदी पाच पांडवांची पत्नी झाली; पण पाचही पांडव जर तिच्याशी एकाच वेळेस पत्निभावाने व्यवहार करायला लागले, तर गोंधळ आणि वैमनस्य उत्पन्न होण्याचीच शक्यता नाकारता येत नाही हे जाणून व्यासांनी एकेकाजवळ द्रौपदी अडीच महिने पत्निभावाने राहील, असा नियम पांडवांना घालून दिला. त्याचबरोबर, असाही दुसरा नियम घालून दिला की एखाद्या पांडवाजवळ अडीच महिन्याच्या कालावधीत द्रौपदी असताना दुसरा पांडव जर तेथे एकांतात गेला तर त्याने एक वर्षभर तीर्थाटन करीत देशभर फिरावे. असल्या अडीच मासाच्या नियमानुसार पांडवांचा बराच काळ गेला. पण एके दिवशी एक अनाहूत अडचण आली.
एका ब्राह्मणाच्या गायी तस्करांनी पळविल्या, तो ब्राह्मण अर्जुनाजवळ येऊन पळविलेल्या गायी सोडवून देण्यास याचना करायला लागला. ब्राह्मणदेवतेची अडचण दूर करणे खर्या क्षत्रियाचे कर्तव्यच असते. अर्जुनाने ब्राह्मणाला साहाय्य करण्याचे कबूल केले आणि आपली शस्त्रास्त्रे आणण्याकरिता अर्जुन घरात गेला; परंतु आणखी एक धर्म्य अडचण पुढे होती. घराच्या ज्या खोलीत अर्जुनाची शस्त्रास्त्रे होती, तेथेच धर्मराजासह द्रौपदी एकांतात बसली होती. द्रौपदीचा धर्म तिच्यासह एकांतात होता; पण वीर अर्जुनाचा क्षत्रिय धर्म खोलीतील शस्त्रास्त्रे काढून ब्राह्मणाला त्वरित साहाय्य करण्यात होता. धर्म-द्रौपदीचा एकांतभंग केल्याने त्याला वर्षभर तीर्थाटन करीत भटकावे लागेल, हे माहीत असूनही एका गरीब असाहाय्य ब्राह्मणवृत्तीकरिता अर्जुनाने ते कष्ट घेण्याचे ठरविले आणि द्रौपदी व धर्माचा एकांतधर्म भंग केला. आपली शस्त्रास्त्रे काढून अर्जुनाने तस्करांचे पारिपत्य केले आणि असाहाय्य ब्राह्मणाला त्याच्या अपहृत गायी मिळवून दिल्या. त्याचे प्रायश्चित्त म्हणून वर्षभर अर्जुन तीर्थाटन करीत राहिला.
वरील कथेचा आशय असा की, साधकावर एकसारखे संस्कार केल्यास ती वृत्ती स्थिर बनून, साधकाच्या पुढील आयुष्यात ती जीवनात साथ देईल. तसली वृत्ती तयार न होता, मधेच दुसर्या पांडवरूप पतीचा संस्कार सहवास केल्यास एकही वृत्ती स्थिर न होता, ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था होते. म्हणून, एकवृत्तीरूप पांडवाचा सहवास वृत्तीकाया द्रौपदीवर कमीत कमी अडीच महिने राहावा, असा नियम भगवान वेदव्यासांनी घालून दिला. वृत्ती स्थिर होत नसतीलच, तर जरा बाहेर फिरून जग पहावे व समाजज्ञान प्राप्त करावे, म्हणजेच तीर्थाटन करावे, असा नियम केला.
आता ‘ब्राह्मण’ म्हणजे ब्रह्मवृत्ती आणि ‘गो’ अर्थात गायी, म्हणजे इंद्रिये होत, हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यामुळे कोणत्या ब्राह्मणाच्या गायी तस्करांनी पळविल्या, हे सुज्ञ साधकांच्या लक्षात आले असेलच. इंद्रियातील प्रमाद वा तस्करवृत्ती साधकातील ब्रह्म जाणणार्या वृत्तीचे हरण करतात. त्यांचा पूर्ण बिमोड करण्याचे कार्य साधकातील क्षत्रियरूप अर्जुनच करेल आणि वीर अर्जुनाने ते ब्रह्मवृत्तीच्या इंद्रियरूप गायींचे हरण थोपविले; परंतु त्याकरिता अर्जुनाला व्यासांच्या नियमानुसार वर्षभर तीर्थाटन करीत फिरावे लागले.(क्रमशः)
लेखक- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७