धर्मानुसार बदलणारा न्याय!

    26-Nov-2026

Uniform Civil Code in India
 
‘समान नागरी कायदा’ या महत्त्वपूर्ण विषयाचा सर्वांगीण वेध घेणारी विशेष लेखमाला... इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि घटनात्मक भूमिकेपासून महाराष्ट्राच्या भवितव्यापर्यंत विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह या लेखमालेतून करण्यात येत आहे.
 
एकाच देशात हिंदू पुरुषाचा पहिला विवाह अस्तित्वात असताना केलेला दुसरा विवाह बेकायदेशीर ठरतो; मुस्लीम वैयक्तिक कायद्यानुसार मात्र पुरुषाला एकाहून अधिक विवाह करण्याची मुभा आहे. हिंदू स्त्रीला आणि मुस्लीम स्त्रीला विवाहातील निष्ठा, सुरक्षितता आणि जबाबदार्‍यांविषयी समान अपेक्षा असू शकतात; तरी त्यांच्यासाठी लागू होणारी कायदेशीर चौकट वेगवेगळी आहे. दुसर्‍या विवाहामुळे निवास, निर्वाह, अपत्यांचे संगोपन आणि पत्नींच्या सुरक्षिततेसंबंधी निर्माण होणार्‍या जबाबदार्‍यांचे स्वरूपही बदलते. वैवाहिक आयुष्यातील अधिकार धर्माप्रमाणे बदलत असतील, तर समान नागरिकत्वाचा अर्थ प्रत्यक्ष कुटुंबजीवनात किती उतरला आहे, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने विचारला पाहिजे.
 
वारसाहक्कातील फरक थेट आकड्यांत सांगायचा तर हे उदाहरण पाहा, मृत्युपत्र नसताना एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र मालकीची १२ लाख रुपयांची संपत्ती केवळ एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात वाटायची असल्यास हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार प्रत्येकी सहा लाख रुपये मिळतात. मुस्लीम वारसाहक्काच्या सामान्य नियमानुसार याच परिस्थितीत मुलाला आठ आणि मुलीला चार लाख रुपये मिळतील. इतर वारस किंवा वेगळ्या प्रकारची संपत्ती असल्यास गणित खूपच किचकट होते.
 
घटस्फोटात ही तफावत आणखी विचित्र आहे, हिंदू विवाह अधिनियमाखाली क्रूरता, परित्याग यांसारख्या कारणांवर किंवा परस्परसंमतीनेही विवाह संपवायचा असेल, तर न्यायालयाचा आदेश आवश्यक असतो. ख्रिश्चन आणि पारशी विवाहांसाठीही घटस्फोटाची स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्था आहे. मुस्लीम वैयक्तिक कायद्यात मात्र ‘तलाक-ए-अहसन’, ‘तलाक-ए-हसन’, ‘खुला’ आणि ‘मुबारात’ यांसारखे न्यायालयाबाहेरील मार्ग उपलब्ध आहेत. न्यायालयीन आदेश, पुराव्यांची तपासणी आणि न्यायालयाबाहेरील प्रक्रियेतील फरक हा केवळ तांत्रिक नसून पती-पत्नीच्या कायदेशीर सुरक्षिततेशी संबंधित आहे. ‘तत्काळ तिहेरी तलाक’ २०१९ मध्ये अवैध ठरला, तरी बाकी सर्व विवाहविच्छेद प्रक्रिया बेकायदेशीर झालेल्या नाहीत.
 
निर्वाहभत्त्याचा इतिहास तर अधिक अस्वस्थ करणारा आहे. १९८५च्या शाह बानो निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुस्लीम महिलेलाही दंडप्रक्रिया संहितेच्या ‘कलम १२५’अंतर्गत निर्वाहभत्ता मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. परंतु, काही धार्मिक गटांच्या विरोधानंतर संसदेत १९८६चा स्वतंत्र कायदा करण्यात आला. त्यातील इद्दतच्या काळात देय आर्थिक तरतूद आणि त्यानंतर त्या महिलेला तिच्या नातेवाईक किंवा ‘वक्फ मंडळा’वर बेभरवशामी आश्रित होण्याची अवस्था यांमुळे मुस्लीम महिलांच्या सर्वसाधारण संरक्षणाविषयी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. न्यायालयाने एका महिलेला दिलेल्या संरक्षणानंतर तेच संरक्षण पुन्हा सिद्ध करण्याची वेळ अनेक मुस्लीम महिलांवर येणे, ही त्यांच्या न्यायाच्या अपेक्षेची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. अखेर दानियल लतीफी (२००१) निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने पतीची जबाबदारी इद्दतपुरती मर्यादित नसून भविष्यातील निर्वाहासाठी न्याय्य तरतूद करावी लागते, असे स्पष्ट केले; मोहम्मद अब्दुल समद (२०२४) निर्णयाने ‘कलम १२५’चा सर्वसाधारण उपायही उपलब्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
 
कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणाचा २००५चा कायदा धर्मभेद न करता लागू होतो. तरी, जुवेरिया अब्दुल मजीद पटनी (२०१४) प्रकरणात घटस्फोटानंतरही विवाहकाळातील हिंसाचारासाठी या कायद्याखाली दिलासा मागता येतो, हे सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट करावे लागले. दत्तकविधानातही हिंदू कायद्याची स्वतंत्र व्यवस्था असून किशोर न्याय अधिनियम सर्वधर्मीयांना दत्तक घेण्याचा मार्ग देतो. अधिकार उपलब्ध असतानाही त्यासाठी वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांवर अवलंबून राहावे लागते, ही व्यवस्थेतील विसंगती आहे.
 
‘समान नागरी संहिता’ म्हणजे धार्मिक विवाहविधी पुसून टाकणे नव्हे. विवाहाची वैधता, घटस्फोटाची प्रक्रिया, स्त्रीचे आर्थिक संरक्षण, वारसा आणि मुलांचे हित यांसाठी समान व न्याय्य नियम ठरवणे, हा तिच्या चर्चेचा गाभा असला पाहिजे. कोणत्याही महिलेला आपल्या धर्मामुळे कमी अधिकार मिळू नयेत आणि मूलभूत संरक्षणासाठी दशकानुदशके न्यायालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, ही अपेक्षा घटनात्मक समानतेशी सुसंगत आहे.
 
लेखक- अ‍ॅड. आशिष सोनवणे
 




संबंधित मजकूर