मुंबई, (Temple Trails of Dakshin Tourist Train) :दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी आता विशेष पर्यटन रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) पश्चिम विभाग, मुंबईतर्फे ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे १८ जानेवारी २०२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रवाना होणार असून, ११ रात्री आणि १२ दिवसांच्या या सहलीत दक्षिण भारतातील नऊ प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
या सहलीत गोकर्ण, मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम आणि महाबलीपुरम या ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. पर्यटकांना धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेता यावा, यासाठी सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.(Temple Trails of Dakshin Tourist Train)
गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर आणि ओम बीच, मुरुडेश्वरचे शिवमंदिर व समुद्रकिनारा, गुरुवायूर मंदिर, रामेश्वरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिर आणि धनुष्कोडी, मदुराईचे मीनाक्षी मंदिर या प्रमुख स्थळांचा प्रवासात समावेश आहे. कन्याकुमारी येथे कुमारी अम्मन मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम आणि सनसेट पॉइंटला भेट दिली जाणार आहे. तसेच तिरुचिरापल्लीतील श्री रंगनाथस्वामी मंदिर आणि तंजावर मंदिर, कांचीपुरममधील कामाक्षी अम्मन, एकाम्बरेश्वर आणि श्री वरदराज पेरुमल मंदिर, तर महाबलीपुरममधील शोर मंदिर आणि कृष्णाज बटरबॉल ही स्थळेही पर्यटकांना पाहता येणार आहेत.
आठ स्थानकांवर चढण्याची-उतरण्याची सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज आणि बेळगावी या आठ स्थानकांवर रेल्वेत चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह विविध शहरांतील प्रवाशांना या पर्यटन सहलीत सहभागी होता येणार आहे.(Temple Trails of Dakshin Tourist Train)
२०,४२० रुपयांपासून पर्यटन पॅकेज
या पर्यटन सहलीसाठी इकॉनॉमी (स्लीपर क्लास) पॅकेज २० हजार ४२० रुपये, स्टँडर्ड (३ एसी) पॅकेज ३२ हजार ७७० रुपये आणि कम्फर्ट (२ एसी) पॅकेज ४२ हजार ९४० रुपये प्रतिप्रवासी असे दर निश्चित करण्यात आले आहेत. पाच ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठीही विशेष पॅकेज दर उपलब्ध आहेत.
पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, हॉटेल निवास, शाकाहारी भोजन, स्थानिक पर्यटनासाठी बस व वाहतूक व्यवस्था, प्रवास विमा, रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था आणि लागू करांचा समावेश आहे. भारत गौरव रेल्वे योजनेअंतर्गत रेल्वे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ३३ टक्के सवलत देण्यात येत असून, ती या पॅकेज दरांमध्ये समाविष्ट आहे.(Temple Trails of Dakshin Tourist Train)
आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की, दक्षिण भारताचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पर्यटकांना आरामदायी व संस्मरणीय पद्धतीने अनुभवता यावा, या उद्देशाने ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ पर्यटन रेल्वेची आखणी करण्यात आली आहे. अशा विशेष पर्यटन पॅकेजमुळे तीर्थयात्रा आणि पर्यटन अधिक सुलभ, सोयीस्कर व किफायतशीर करण्याचा आयआरसीटीसीचा प्रयत्न आहे.
बुकिंग आणि अधिक माहितीसाठी आयआरसीटीसी पर्यटन कार्यालय, पश्चिम विभाग, तिसरा मजला, फोर्ब्स बिल्डिंग, चरंजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई येथे संपर्क साधता येईल. फोन व व्हॉट्सॲप क्रमांक ८२८७९३१८८६ तसेच ई-मेल bgtmumbai\@irctc.com वर माहिती उपलब्ध आहे.(Temple Trails of Dakshin Tourist Train)