माफीनाम्याने पाप धुतले जाणार?

    26-Nov-2026
 
Tamil Nadu government apology Karthigai Deepam
 
सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील प्राचीन दगडी दीपस्तंभावर कार्तिगई दीपम प्रज्वलित न करणार्‍या विजय सरकारने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र, हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार्‍या या सरकारच्या माफीला नेमका अर्थ काय, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो.
 
तामिळनाडूतील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील दीपथूनवर अर्थात, प्राचीन दगडी दीपस्तंभावर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्याच्या वादाने राज्यातील सत्तांतराचा फोलपणा आणि छद्म धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाडला. मागील वर्षी दि. १ डिसेंबर २०२५ रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी, सिकंदर बदुशा दर्ग्याजवळील दगडी दीपथूनवर हिंदू धार्मिक विधी करण्यास अनुमती दिली होती. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल, हा तत्कालीन द्रमुक सरकारचा पोकळ दावा न्यायालयाने ‘काल्पनिक भूत’ संबोधत फेटाळला होता. तिरुपरंकुंद्रम हे भगवान मुरुगन भक्तांसाठी पवित्र श्रद्धास्थान असून, कार्तिक महिन्यात डोंगराच्या शिखरावर महादीप प्रज्वलित करणे, ही शतकानुशतकाची धार्मिक परंपरा आहे. १४व्या शतकात पांड्य राजाला पराभूत करून, काहीकाळ मदुराईवर राज्य करणार्‍या सिकंदर बदुशा या परकीय आक्रमकाचा प्रतिहल्ल्यात खात्मा झाल्यानंतर तिथे दर्गा उभारण्यात आला. ही दीपपरंपरा दर्ग्यापेक्षाही जुनी असताना, तत्कालीन स्टॅलिन सरकारचा तिला विरोध होता. परिणामी, यंदाच्या मे महिन्यातील विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या जनतेने स्टॅलिन यांचा पराभव करत, अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ पक्षाकडे सुत्रे दिली. मात्र, तामिळनाडूत चेहरा बदलला, तरी हिंदूविरोधी मानसिकता तीच राहिल्याचे, दुर्दैवाने पुन्हा सिद्ध झाले.
 
मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही दि. २४ नोव्हेंबरच्या कार्तिगई दीपम उत्सवासाठी टेकडीवरील दगडी दीपस्तंभावरच दिवा लावण्याबाबत स्पष्ट अंतरिम आदेश दिले. मद्रास उच्च न्यायालयानेही जिल्हा प्रशासनाला, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास बजावले. असे असतानाही काँग्रेसच्या कुबड्या घेऊन सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. राज्य सरकार आणि मदुराई जिल्हा प्रशासनाने या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत, त्या दीपस्तंभावर दिवा पेटू दिला नाही. प्रशासन निष्क्रिय राहून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असताना, आपल्या न्याय्य धार्मिक अधिकारांसाठी आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भाजप आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन दीपप्रज्वलन करण्याऐवजी, विजय सरकारने पोलिसांचा बडगा उगारत भाजप आणि हिंदू संघटनांच्या तब्बल ३०० सदस्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले. न्यायालयीन आदेशपालनाचा आग्रह धरणार्‍या हिंदूंना गुन्हेगार ठरवायचे आणि आदेश धुडकावणार्‍या प्रशासनाला अभय द्यायचे, हा विजय सरकारचा उद्दामपणा स्टॅलिन सरकारलाही लाजवणाराच.
 
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान कारवाईचा फास आवळला जाऊ लागला, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नोकर्‍यांवर गदा येण्याची चिन्हे दिसू लागली, तेव्हा तामिळनाडू सरकार आणि मदुराई जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. परिणामी, सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही दगडी स्तंभावर दिवा न लावण्यात आल्याबद्दल राज्य सरकार आणि मदुराई जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयासमोर हात जोडत बिनशर्त माफी मागितली. पण, आता या बिनशर्त माफीचा अर्थच काय?
 
न्यायालयाचा दंडुका उगारला गेल्यावर कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी मागितलेली माफी म्हणजे, विजय सरकारचे हृदयपरिवर्तन आहे का? तर अजिबात नाही. ही माफी न्यायालयीन शिक्षेपासून वाचण्यासाठी केलेली तांत्रिक नौटंकी आहे. आधीच्या स्टॅलिन सरकारने उच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यावर, न्यायाधीशांविरुद्ध ‘महाभियोगा’ची भाषा केली होती; तर आताच्या विजय सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच पायदळी तुडवला. अंगलट आल्यावर न्यायालयात माफी मागायची आणि बाहेर मात्र अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा अजेंडा रेटायचा, हा ‘द्राविडी’ दुटप्पीपणा आता लपलेला नाही.
 
विजय सरकारची माफी सच्चेपणातून आली असेल, तर मग आंदोलन करणार्‍या ३०० हिंदू आणि भाजप कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मुख्यमंत्री विजय तत्काळ मागे घेणार का? ज्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे विजय सरकार कधीच देणार नाही. कारण, सत्तेसाठी त्यांनीही काँग्रेस आणि विदुथलाई चिरुथैगल काचीसारख्या सनातनविरोधी पक्षांच्याच मांडीला मांडी लावली आहे. प्रशासनाची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची असते, श्रद्धेचा संकोच करण्याची नव्हे. पण, पेरियारवादाच्या आणि नास्तिकतेच्या बुरख्याखाली तामिळनाडूत वर्षानुवर्षे सनातन धर्मावर हल्ले होत आहेत. संघाच्या संचलनाला परवानगी नाकारायची, मंदिरांच्या निधीवर डल्ला मारायचा आणि चर्च व दर्ग्यांच्या बाबतीत मात्र सौम्यता दाखवत सवलतींची खैरात वाटायची, हाच द्रविडी राजकारणाचा कित्ता विजय सरकारही गिरवत आहे.
 
तिरुपरंकुंद्रमचा हा संघर्ष आता हिंदू समाजाच्या संविधानिक अधिकारांच्या रक्षणाचा आणि स्वाभिमानाचा लढा बनला आहे. तामिळनाडूच्या जनतेने द्रमुकच्या हिंदूविरोधी राजकारणाला कंटाळून, विजय यांच्या हाती सत्ता सोपवली होती. मात्र, सत्तेवर येताच विजय सरकारनेही हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. आज तामिळनाडूमध्ये हिंदूंना आपल्याच प्राचीन परंपरांच्या रक्षणासाठी न्यायालयात जावे लागत आहे. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही त्याच्या अंमलबजावणीसाठी, रस्त्यावर उतरावे लागत आहे. हे लोकशाहीला काळिमा फासणारेच वास्तव. सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या बिनशर्त माफीमुळे विजय सरकारचा नैतिक पराभव उघड झाला. आपल्या धार्मिक परंपरांबाबत दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना आता तामिळनाडूतील हिंदूंमध्ये संघटित होत असून, त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. तिरुपरंकुंद्रमच्या टेकडीवर प्रज्वलित होणारा हा न्यायाचा दीपच आगामी काळात तामिळनाडूतील या छद्म धर्मनिरपेक्ष राजकारणाचा अंत करेल, हे मात्र निश्चित.
 




संबंधित मजकूर