शाहूनगरच्या बीएमसी भाडेकरूंना त्याच परिसरात मिळणार मालकी हक्काची घरे!

पुनर्विकासाला गती; किमान ५०० चौ. फुटांचे घर देण्याची तरतूद,संक्रमण काळात दरमहा २२ ते ३० हजार रुपयांचे भाडे साहाय्य


Shahunagar Redevelopment
 
मुंबई, (Shahunagar Redevelopment) : शाहूनगरमधील बीएमसीच्या भाडेकरूंच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा होत असून, अनेक दशकांपासून अरुंद आणि जीर्ण घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्याच परिसरात मोठी व मालकी हक्काची घरे मिळणार आहेत. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांचे घर किंवा सध्याच्या घराच्या चटई क्षेत्रफळाच्या १.३५ पट क्षेत्रफळाचे घर, यापैकी जे अधिक असेल ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
 
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन अधिसूचनेनुसार ही पुनर्वसन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पुनर्वसित रहिवाशांना त्याच परिसरात कायमस्वरूपी घरे देण्यात येणार असून, पुनर्विकास स्थळाचा ताबा दिल्यापासून पाच वर्षांच्या आत ही घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रहिवाशांचे शाळा, रोजगार, सामाजिक संबंध आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही.(Shahunagar Redevelopment)
 
संक्रमण काळात भाडे किंवा पर्यायी निवासाचा पर्याय
 
पुनर्विकासाच्या कालावधीत रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. २७५ ते ३७५ चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडाच्या नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये ३५० ते ४०५ चौरस फुटांची संक्रमण घरे 'प्रथम येईल त्याला प्रथम' या तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.(Shahunagar Redevelopment)
 
पर्यायी व्यवस्था म्हणून नातेवाइकांकडे राहू इच्छिणाऱ्या किंवा खासगी घर भाड्याने घेणाऱ्या रहिवाशांना दरमहा २२ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत भाडे साह्य निवडता येणार आहे. या रकमेत दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होणार असून, स्थलांतरासाठी १५ हजार रुपयांचा एकरकमी भत्ताही दिला जाणार आहे.
 
नव्या इमारतींच्या देखभालीसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. रहिवाशांना घरांचा ताबा दिल्यानंतर पुढील १० वर्षे इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पुनर्वसन क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्रावर व्यावसायिक वापराची तरतूद असून, त्यातून मिळणाऱ्या भाडे उत्पन्नाचा उपयोग दीर्घकालीन देखभालीसाठी केला जाणार आहे.(Shahunagar Redevelopment)
 
पीएएए करारासाठी ३० दिवसांची मुदत
 
पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बीएमसी, डीआरपी/एसआरए आणि अदाणी नवभारत डेव्हलपर्स (एएनडीपीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जनजागृती आणि सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १९ नोव्हेंबर रोजी या शिबिराची सांगता झाली. यावेळी रहिवाशांना पात्रता, पुनर्वसन प्रक्रिया, संक्रमण निवास व्यवस्था आणि प्रकल्पाच्या कालमर्यादेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.(Shahunagar Redevelopment)
 
आता पुनर्वसन प्रक्रियेतील महत्त्वाचा अंतिम टप्पा म्हणजे कायमस्वरूपी पर्यायी निवास करार (PAAA). डीआरपी/एसआरए, एएनडीपीएल आणि प्रत्येक पात्र रहिवासी यांच्यात हा त्रिपक्षीय करार होणार आहे. हा करार पुढील ३० दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन रहिवाशांना करण्यात आले आहे.
 
रहिवाशांनी मोठ्या घरांसह त्याच परिसरात पुनर्वसनाची हमी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित शिबिरात अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देत पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. कायमस्वरूपी मालकी हक्काचे मोठे घर, संक्रमण काळातील आर्थिक साह्य आणि पुढील १० वर्षांची देखभाल अशा तरतुदींमुळे शाहूनगर पुनर्विकासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.(Shahunagar Redevelopment)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर