मोठ्या धाकाची आश्वस्त सावली!

    26-Nov-2026   

Ramesh Gaidhan
 
विचारांवरची निष्ठा शब्दांतून व्यक्त होणे सोपे; मात्र ती जगण्यात उतरविण्यासाठी आयुष्याची समिधा करावी लागते. संघकार्यात अशा माणसांच्या त्यागाने आणि निष्ठेनेच संघकार्याचा वटवृक्ष विस्तारतो. अशाच नाशिकच्या रमेश गायधनी यांचे शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
नाशिकच्या रविवार कारज्यांत अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातली एक महत्त्वाची वास्तू म्हणजे गायधनी वाडा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने गायधनी कुटुंबाचा वाडा महत्त्वाचा. कारण, त्यात गायधनी नावाची संघशरण माणसे नांदतात. नुसती नांदत नाहीत, तर नाशिकच्या संघविश्वात, सामाजिक कामात, कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदानही आहे. रमेश गायधनी या कुटुंबातला मोठा भाऊ म्हणून, कुटुंबप्रमुख होते. वयोपरत्वे त्यांचे दि. २० नोव्हेंबर रोजी नाशिक येथे निधन झाले. मात्र, नाशिकच्या संघकामातील त्यांच्या आठवणी आणि नाशिकच्या संघकार्यातील त्यांचे व त्यांचे कुटुंबाचे योगदान, कधीही नाकारले जाऊ शकत नाही.
 
साप्ताहिक ‘विवेक’चा प्रवासी कार्यकर्ता अधिक कर्मचारी म्हणून, नाशिकला जाणे व्हायचे. राहण्याची व्यवस्था नाशिकच्या जुन्या तिळभांडेश्वर गल्लीतल्या कार्यालयात असली, तरी प्रवासातले एकतरी भोजन आग्रहाने गायधनी वाड्यावर नक्की व्हायचे. गायधनी कुटुंबातल्या पुढच्या पिढीसोबत गोदाकाठी फेरफटका व्हायचा आणि कुटुंबाची संघकामाविषयीची तळमळही जाणवायची आणि त्यात एक सहजभावही असायचा. हा जिव्हाळा पुढे कायम वाढतच गेला. रमेशदादांच्या प्रत्येक भेटीत एक आदरयुक्त शिकण्याची प्रक्रिया चालायची. ‘विवेक’चे वर्गणीदार वाढविण्याचे काम असो किंवा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वाचक, या सगळ्याच्याच मागे रमेश गायधनी अत्यंत ठामपणे उभे राहिले. त्यांच्या कामाची एक पद्धत होती. ही पद्धत फार निराळी होती. बैठक, विषय मांडणे, उद्बोधन करणे, यापेक्षा व्यक्तिगत संपर्क आणि संवादावर त्यांचा अधिक जोर होता. जे काही काम त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊ, त्यांना ते घरीच बोलवायचे. चांगला पाहुणचार, खाऊपिऊ झाल्यावर रमेशजी सरळ विषयाला हात घालायचे. मग ते कामाशी जोडले जाणे असो किंवा आर्थिक विषय उभे करणे, आवाजाच्या अत्यंत कमी पट्टीत; मात्र भाषेत पुरेसा जोर ठेवून रमेशराव बोलायला सुरुवात करायचे. समोर अत्यंत इरसाल, नाठाळ मनुष्य बसला असला, तरी रमेशरावांसमोर काहीही बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. याचे गमक रमेशरावांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा, त्यांच्या त्यागात दडलेले होते. ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रचारक राहिलेल्या सुरेशराव केतकरांनी त्यांना स्वत:चा ‘इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅटर’चा व्यवसाय कमी करून, अधिकाधिक काळ संघकाम करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांनी संघाची आज्ञा म्हणून मानला आणि शरीर साथ देईपर्यंत हा आदेश पाळलादेखील. वाड्याच्या तळमजल्यावर दादांचे ऑफिस होते. ऑफिस असले, तरी एखाद्या ‘इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅटर’चे असावे, असे काही त्यात फार नव्हते. उपकरणे, चोपड्या कशाचाही मागमूस नव्हता; नंतर माझ्या लक्षात आले की, व्यवसायापेक्षा या जागेत संघ कार्यकर्तेच अधिक भेटायला येतात, त्याचा हा परिणाम होता.
 
रमेशराव आणीबाणीत कारावासातही गेले होते. घराची यात खूप ससेहोलपट झाली. घरातील महिलांनी यात पुढाकार घेतला. कुटुंब चालविण्यासाठी लहान-मोठे व्यवसाय केले. पण, हे इतकेच मर्यादित नव्हते. नाशिकच्या जिल्हा कार्यालयात अनेक कार्यकर्ते बंद होते. जिल्ह्यातून त्यांना लोक भेटायला येत. त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय या सगळ्यांची उतरण्याची व्यवस्था नाशिकला गायधनींकडेच असायची. कोणतीही तक्रार न करता घरातील महिलांनी हे सारे केले. आणीबाणी संपली, सारेकाही सुरळीत झाले. या संकटाचा गायधनी कुटुंबावर मात्र काहीच परिणाम झाला नाही. संघकाम पुन्हा पूर्वीसारखेच सुरू झाले. इतकी संकटे झेलून आजही गायधनी कुटुंबातील एक व्यक्ती संघ प्रचारक आहे. संघावरची त्यांची निष्ठा कुठेही ढळलेली नाही.
 
दररोज शाखेत गेलेच पाहिजे, हा रमेशरावांचा आग्रह होता. दै. ‘मुंबई तरुण भारत’ वाचण्याविषयी व ‘विवेक’ वाचण्याविषयी ते कमालीचे आग्रही होते. त्यासाठी धावपळ करण्याची, वेळ देण्याची त्यांची पूर्ण तयारी होती. संघकामाचा केंद्रबिंदू असलेले त्यांचे घर, हे अनेक केंद्रीय कार्यकर्त्यांचा राबता असणारे घर होते. कार्यकर्ता केंद्रीय असो किंवा अत्यंत ग्रामीण भागातला, त्याला वागणूक तितयाच सन्मानाने मिळायची. रमेशरावांनी जिल्ह्यापर्यंतची जबाबदारी पूर्ण ताकदीने पेलली. संघशाखेचा आचार विभागाबाबतीत ते खूप आग्रही होते. नव्या कार्यालयाच्या तळमजल्यावर साप्ताहिक शाखा होती. मुख्यशिक्षक बहुधा नवखा होता किंवा संख्या अधिक झाल्याने दबकला होता. आज्ञा, ध्वज लावणे, एका स्थितीत उभे राहणे, या सगळ्याबाबतची त्यांची भूमिका आग्रही होती.
 
पुढे नाशिकमध्ये संघकामाचा विस्तार खूप वाढला. अनेक कार्यकर्ते जोडले गेले. रमेशरावांवरचा प्रवासाचा ताण कमी होत गेला. काम, कामातला सहभाग मात्र कायम होता. प्रवास कमी झाला आणि फोन, ‘एसएमएस’वरून विचारणा-पाठपुरावा कायम होता. एखादा लेख आवडला, तर रमेशदादांचा फोन यायचाच. मात्र, त्यांनी अजून चार लोकांना सांगितलेले असायचे. लेख आवडला नाही की, सरळ असा काय लिहिलाय? असा रोकडा सवाल असायचा. कालांतराने जुन्या वाड्याचे नव्या इमारतीत रूपांतर झाले. लहान खोल्या प्रशस्त झाल्या. मात्र, गायधनी वाड्याचे ‘या’ म्हणणे काही थांबले नाही. आजही ते अव्याहतपणे चालूच आहे. रमेशजींचे इहलोक सोडून जाणे, निसर्गनियमाला धरून असले; तरी आपले समर्पण आणि कार्यकर्तेपण, यामुळे रमेशदादा कायम स्मरणात राहतील.
 




किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
संबंधित मजकूर