भारतीय लोकशाहीचा प्रवास हा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा, कर्तव्यांचा आणि मूल्यांचा प्रवास आहे. मात्र, त्यांचा राजकीय स्वार्थासाठी झालेल्या वापराचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आजच्या ‘संविधान दिना’ निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रवासाचा घेतलेला मागोवा...
दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासभेने राज्यघटनेचा स्वीकार केला. आज आपण डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासभेतील प्रत्येकाचे स्मरण करत आहोत. आधुनिक राज्यघटनेची रचना करताना, भारताच्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक विद्वत्तेचा व्यापकपणे आधार घेण्यात त्यांचे मोठेपण दडले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जिथे अगणित धर्म, भाषा, चालीरीती आणि विचारप्रणाली एकत्र नांदतात, अशा राष्ट्रासाठी राज्यघटनेचा प्रभाव केवळ संसद आणि न्यायालयांपुरता मर्यादित न राहता, त्यापलीकडे पोहोचणे महत्त्वाचे आहे. लोकांमध्ये, विशेषतः युवावर्गामध्ये याची जाणीव-जागृती निर्माण करून, राज्यघटनेचे नाते अधिक घट्ट करणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक एकतेची भावना अधिक खोलवर नेणे, हाच आमचा प्रयत्न राहिला. म्हणूनच, एका दशकापूर्वी आमच्या सरकारने, दि. २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
माझ्यासह कोट्यवधी भारतीयांच्या जीवनप्रवासात, भारतीय राज्यघटना ही अविभाज्य घटक आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या बालपणात डोकावतो, ज्या साध्या परिस्थितीत मी वाढलो, दैनंदिन आयुष्यातील संघर्ष आठवतो; तेव्हा मी राज्यघटनेप्रतिच्या कृतज्ञतेने भारावतो. एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलावर, कोणत्याही सुविधा आणि जन्मजात मिळणार्या लाभापासून वंचित राहावे लागणार्या बालकावर, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या सेवेची जबाबदारी येते, हीच बाब आपल्या राज्यघटनेचे असाधारण महत्त्व अधोरेखित करते. आपल्या राज्यघटनेमुळेच व्यक्तीच्या जन्मावर, त्याच्या भविष्याच्या मर्यादा निश्चित होत नाहीत. आम्ही आमच्या परीने, राज्यघटना अधिक बळकट करून या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला.
प्रख्यात राज्यघटना अभ्यासक ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी, आपल्या राज्यघटनेचे वर्णन एक सामाजिक दस्तऐवज असे केले. सामाजिक आणि आर्थिक न्यायाची आकांक्षा आपल्या राज्यघटनेच्या प्रत्येक तरतुदीत रुजली आहे. अशा परिस्थितीत, आपल्या राज्यघटनाकारांनी पाहिलेल्या या मौल्यवान स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कार्य करण्यापेक्षा, अधिक समाधानकारक गोष्ट ती कोणती?
जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, ५० कोटी भारतीय दारिद्य्ररेषेच्या वर आले. कित्येक पिढ्यांच्या वंचनेतून मुक्त होत कोट्यवधी पालक, आपल्या मुलांच्या उत्तम भविष्याचे स्वप्न बघू शकतील. जेव्हा ‘प्रधानमंत्री आवास’ योजना एखाद्या कुटुंबाला झोपडीतून पक्क्या घरात राहण्याची संधी उपलब्ध करून देते, तेव्हा राज्यघटनेने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या हक्काला खर्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होते. ‘उज्ज्वला’ योजनेमुळे एखाद्या आईला धुराने भरलेल्या स्वयंपाकघरातील त्रासातून मुक्ती मिळते, तेव्हा आपण समानतेच्या आणि कल्याणाच्या मूल्यांना पुढे नेतो. ‘आयुष्मान भारत’मुळे एखादे गरीब कुटुंब कर्जाशिवाय दर्जेदार आरोग्यसेवा मिळवते, तेव्हा सामाजिक न्याय प्रत्यक्षात साकार होतो. जेव्हा ‘मुद्रा’ आणि ‘पीएम-स्वनिधी’ योजनांच्या माध्यमातून लघुउद्योजकांना आणि पथविक्रेत्यांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध होते, तेव्हाच आर्थिक न्यायाचे मूर्त स्वरूप साकार होते. ‘डिजिटल’ तंत्रज्ञान आणि ‘यूपीआय’सारखे प्लॅटफॉर्म्स सर्व प्रकारचे भेद ओलांडून, एकेकाळी ठरावीक लोकांसाठीच्या संधी प्रत्येकासाठी खुल्या करतात, तेव्हा संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशकताच आपण पुढे नेतो.
या संविधानात्मक दृष्टिकोनाची अनेक रूपे आपल्याला साकार झालेली दिसतात. आम्ही आणलेल्या घटनात्मक सुधारणांकडे याच पैलूतून पाहता येईल. दीर्घकाळ प्रलंबित वस्तू आणि सेवा कर सुधारणेचा मार्ग,‘१०१व्या’ घटनादुरुस्तीने मोकळा झाला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा ‘१०२व्या’ घटनादुरुस्तीमुळे मिळाला आणि समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले. समाजात ‘१०३व्या’ घटनादुरुस्तीचेही स्वागत मोठ्या प्रमाणात झाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करून, विद्यमान आरक्षणाच्या चौकटीबाहेरील समाजघटकांतील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांच्या दीर्घकाळ दुर्लक्षित आकांक्षांना या सुधारणेने न्याय दिला. १९५० नंतर प्रथमच, आपल्या राज्यघटनेची अद्ययावत आवृत्ती, आठव्या अनुसूचीतील सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
१९५० मध्ये आपली राज्यघटना लागू झाल्यावरही, १८६०च्या दशकातील वसाहतवादी काळातील दंड संहितेनुसारच आपण चालत होतो. भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून, आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत मूलभूत बदल घडवण्याचा प्रयत्न केला. वसाहतवादी व्यवस्थेतील शिक्षेवर भर देणार्या दृष्टिकोनाऐवजी, ‘नागरिककेंद्रित न्याय’ संकल्पना आपण केंद्रस्थानी आणली. गेल्या दशकभरात आपण ‘कर्तव्य’ या संकल्पनेवर, नागरिक कर्तव्यांवर विशेष भर दिला. आपल्या संस्कृतीने नेहमीच, समाजातील प्रत्येक भूमिकेसोबत येणार्या जबाबदार्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘स्वच्छ भारत’ अभियान ते जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणापर्यंतच्या लोकचळवळींमधून, या कर्तव्यभावनेचे दर्शन घडले. मात्र, यासोबतच आणखी एक वास्तव मांडणे मला आवश्यक वाटते. आपल्या इतिहासात काही असे प्रसंग आहेत, ज्यांच्यावर राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांनीच राज्यघटना कमकुवत करण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांनाच तब्बल पाच दशके सत्तेत राहण्याचीही संधी मिळाली.
यावर्षी, १९५१ मधल्या पहिल्या घटनादुरुस्तीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी जनतेने निवडून न दिलेल्या सरकारने, हंगामी संसदेत बहुमताचा वापर मूलभूत स्वातंत्र्यांवर मर्यादा आणण्यासाठी केला. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघे काही महिन्यांपूर्वीच ही घटनादुरुस्ती करण्यात आली. यावरून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणे आणि जनतेचा विरोध दडपणे, हाच त्यामागील उद्देश असल्याचे स्पष्ट होते. आणीबाणी काळातील ‘४२व्या’ घटनादुरुस्तीला, यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकन सीमित केले आणि संस्थात्मक अधिकारांच्या संतुलनात मूलभूत बदल घडवले. सत्तालोलुप आणि घटनाविरोधी नेतृत्व काय करू शकते, हे जाणून घेण्यासाठी युवापिढीने ‘३८’ आणि ‘३९व्या’ घटनादुरुस्तींचाही अभ्यास करावा, असे आवाहन मी करतो. जनतेने निवडून दिलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी ‘कलम ३५६’चा वारंवार केला गेलेला गैरवापर, हे एक अत्यंत खेदजनकच प्रकरण. एका राजकीय पक्षाच्या नावे जवळपास शंभरवेळा ‘कलम ३५६’ लादण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला असून, एका माजी पंतप्रधानांनी तर याबाबतीत ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे.
राज्यघटनेतील कलमाची त्यामागील मूळ भावनेनुसार संपूर्ण भारतात अंमलबजावणी होईल, अशी राज्यघटनाकारांची अपेक्षा होती. परंतु, ७० वर्षांहून अधिक काळ ‘कलम ३७०’ आणि ‘३५-ए’मुळे, जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना पूर्णपणे लागू झाली नाही. परिणामी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि महिलांच्या अधिकारांवर गदा आली. इतिहासातील ही चूकही २०१९ मध्ये दुरुस्त झाली.
देशाच्या अनेक भागांत, विशेषतः आदिवासीबहुल भागांत नक्षलवाद्यांनी अनेक दशके बंदुकीच्या बळावर, गरिबांना लोकांना घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवले. यावर्षी नक्षलवादाचे यशस्वीरीत्या उच्चाटन झाले, ही अत्यंत सुखावणारीच बाब. यामुळे आता गरिबातील गरीब व्यक्तीलाही भीतिविना, घटनादत्त अधिकारांचा वापर करता येईल. आता आपल्यापुढे आजच्या वास्तवापासून पूर्णपणे दूर असूनही, आपल्या विकासमार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘दिमागी नक्षलीं’चे आव्हान केवळ शिल्लक आहे.
देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष ‘ओबीसीं’चे आरक्षण कमी करून मुस्लिमांसाठी आरक्षण आणू इच्छित आहे, ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे. आपले घटनाकार, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात होते.
आपली राज्यघटना साकार होण्यात ज्या महिलांची मदत झाली, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेतल्याविना राज्यघटनेच्या प्रवासाचा मागोवा अपूर्णच ठरेल. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला जे काही घडले, ते अत्यंत लज्जास्पदच आहे. विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने आणलेले विधेयक एका विरोधी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही; यावरून पुन्हा एकदा घटनात्मक मूल्यांबद्दल त्यांना आदर नसल्याचेच दिसले. तरीही, भारतातील ‘नारीशक्ती’ला न्याय मिळवून देण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, याची मी त्यांना खात्री देतो. आपल्या घटनात्मक लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक स्पष्ट भूमिका निश्चित आहे. दुर्दैवाने मुख्य विरोधी पक्ष आता ‘विरोधी पक्ष’ न राहता, ‘अवरोध पक्ष’ झाल्याचे दिसते. लोकशाही प्रक्रियांमध्ये अडथळे आणणे हा घटनात्मक जबाबदार्या पार पाडण्याचा पर्याय असू शकत नाही, याची त्यांना जाणीव होण्याची गरज आहे.
भारत आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आपण २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना, आपल्या विचारात ‘भारत प्रथम’ आणि कृती करताना ‘कर्तव्य’ ही दोन साधी; पण प्रभावी तत्त्वे आपल्या सामूहिक प्रयत्नांना दिशा दाखवण्याचे काम करतील. हीच मार्गदर्शक तत्त्वे समजून आणि राज्यघटनेला आपल्या शक्तीचा स्रोत बनवून, आपण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करू शकतो.