मुंबई (अक्षय मांडवकर) - मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात मलबारी कवड्या धनेशाच्या प्रजननाचा सविस्तर अभ्यास करण्यात आला असून, या पक्ष्याची १७ नवीन सक्रिय घरटी नोंदवण्यात आली आहेत (pench malabar pied hornbill). या घरट्यांमधून २०२५ मध्ये १२ पिल्ले यशस्वीरीत्या बाहेर पडली (pench malabar pied hornbill). मलबारी कवड्या धनेशाचा विणीचा हंगाम हा पेंचमध्ये पश्चिम घाटापेक्षा विलंबाने सुरू होत असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे (pench malabar pied hornbill). विशेष म्हणजे, या अभ्यासात धनेशाच्या खाद्याच्या सवयी, घरट्यांची निवड आणि पिल्लांच्या संगोपनाविषयी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. (pench malabar pied hornbill)
अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या जैवविविधता संशोधन प्रयोगशाळेचे प्रा. डॉ. गजानन वाघ आणि संशोधक निखिल बोरोडे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), मध्य प्रदेश आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने हा अभ्यास केला. मध्य प्रदेश राज्य जैवविविधता मंडळ आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट यांच्या सहकार्याने नोव्हेंबर २०२० ते जून २०२६ या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान, मोगली अभयारण्य आणि बफर क्षेत्रातील १२१ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. पश्चिम घाटात या पक्ष्यांचा विणीचा हंगाम डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुरू होतो. मात्र, पेंचमध्ये हा काळ मार्चच्या उत्तरार्धात सुरू होऊन जुलैच्या सुरुवातीपर्यंत चालतो. २०२५ मध्ये नोंदवलेल्या घरट्यांमधून १२ पिल्ले यशस्वीरीत्या बाहेर पडली. यापूर्वी २०२४ मध्ये ११ सक्रिय घरट्यांमधून १० पिल्ले बाहेर पडली होती. या निरीक्षणांमुळे पेंचमधील मलबारी धनेशाच्या प्रजनन यशाची माहिती उपलब्ध झाली आहे. या संशोधन प्रकल्पात स्थानिक 'धनेश मित्र' म्हणून मिथलेश सिरसाम कर्माझरी याने काम केले आहे.
मलबारी धनेशाच्या खाद्याच्या अभ्यासात एकूण ४१ फळझाडांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये ११ फायकस प्रजातींचा म्हणजेच वडाच्या कुळातील झाडांचा समावेश आहे. तर प्रजनन काळात धनेशाच्या खाद्यात फळांबरोबरच प्राणिजन्य पदार्थांचाही समावेश असतो. खार, उंदीर, वटवाघळे, पक्षी, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, घोरपड,सरडे, पाली, बेडूक, शंख,गोगलगाय आणि कीटक अशा ३२ प्राणिजन्य आहाराची नोंद या संशोधनातून करण्यात आली. मलबारी धनेश घरटी करण्यासाठी महुआ, स्टीर्क्युलिया, अर्जुन आणि अडिना या झाडांच्या पोकळ्यांना पसंती देत असल्याचे संशोधनात आढळले. महत्त्वाचे म्हणजे मलबारी कवड्या धनेशाच्या एकाच थव्यात सर्वाधिक ४५ पक्ष्यांची नोंद या संशोधनातून करण्यात आली.
कॅमेरा ट्रॅपमधून उलगडले रहस्य
“मलबारी धनेशाच्या प्रजननाचा अभ्यास करताना कॅमेरा ट्रॅपचा वापर करणे हा आमच्या संशोधनातील महत्त्वाचा भाग होता. घरट्यांजवळ कॅमेरा लावताना पक्ष्यांना त्रास होऊ नये, यासाठी फ्लॅशवर आवरण घातले होते. या माध्यमातून नर धनेश मादी आणि पिल्लांसाठी कोणत्या प्रकारचे खाद्य आणतो, याचे निरीक्षण करता आले. खार,वटवाघळे, पक्षी प्रजाती, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, बेडूक, विंचू आणि भुंगे यांसारखे प्राणिजन्य खाद्य नर पक्षी घरट्यात आणत असल्याचे नोंदवता आले. या निरीक्षणांमुळे मलबारी धनेशाच्या प्रजननविषयक यापूर्वी न उलगडलेल्या बाबी समजून घेण्यास मदत झाली.” — प्रा. डॉ. गजानन वाघ, प्रमुख संशोधक, मलबारी धनेश संशोधन प्रकल्प
पेंचमध्ये पक्ष्यांची समृद्ध विविधता
या संशोधनात कवड्या धनेशाचा रातथाऱ्याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला. हा धनेश सुरक्षितेच्या दृष्टीने रातथारेची जागा सतत बदलवीत राहतो हे सुद्धा संशोधनात आढळून आले. याचे प्रजनन संपल्यानंतर त्या झाडांच्या पोकळीत लगेचच उडती खार, मसण्या उद, घोरपड, साप व काही पक्षी प्रजाती आपले बस्तान बसवतात. - निखिल बोरोडे, संशोधक