मुंबई, (Narmada-Tapi Diversion Project): उत्तर महाराष्ट्रातील सिंचन विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नर्मदा खोऱ्यात महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी तापी खोऱ्यात वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नर्मदा-तापी वळण योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ हजार ५४८ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेला मोठा आधार मिळणार असून, ७५ गावांमधील २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.(Narmada-Tapi Diversion Project)
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे नर्मदा पाणी तंटा लवादाच्या अंतिम निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले १५८.३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५.५९ टीएमसी पाणी तापी खोऱ्यात आणले जाणार आहे. यासाठी नर्मदा खोऱ्यातील खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंजरा, राजबर्डी आणि शेलकुई येथे सहा वळण बंधारे उभारण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांमधील पाणी बोगदे आणि जोडकालव्यांद्वारे जलोला धरणात आणून साठविले जाईल. त्यानंतर १९.५० किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे ते तापी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून ११.५० मेगावॅट वीजनिर्मितीही प्रस्तावित आहे.(Narmada-Tapi Diversion Project)
तापी खोऱ्यात आणलेले पाणी गोपालपूर बंधाऱ्यात साठवून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे पाण्याचे नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वितरण शक्य होईल. या योजनेचा सर्वाधिक लाभ तळोदा, शहादा आणि धडगाव तालुक्यांना होणार आहे. तळोदा तालुक्यातील १४ हजार ११६ हेक्टर, शहादा तालुक्यातील ९ हजार ४१० हेक्टर आणि धडगाव तालुक्यातील वैयक्तिक उपसा सिंचनाद्वारे ३ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. परिणामी, एकूण ७५ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.(Narmada-Tapi Diversion Project)
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सर्वेक्षण, तांत्रिक आराखडे, आवश्यक वैधानिक परवानग्या आणि वनजमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर विविध बांधकामांची कामे हाती घेतली जातील. या योजनेमुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला शाश्वत सिंचनाचा पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.