
मुंबई -jhimma 3 archit deodhar hemant dhome लहानपणापासूनच अभिनयाची आवड, कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्याची ओढ आणि प्रत्येक नव्या भूमिकेतून काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता! याच आवडीतून अर्चित देवधरचा अभिनयप्रवास सुरू झाला. ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे अर्चितसाठी हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून त्याच्या अभिनयप्रवासातील एक खास टप्पा ठरणार आहे.
अर्चितने अगदी लहान वयातच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. ‘किल्ला’मध्ये अमृता सुभाष यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. इतक्या कमी वयात एका आशयघन आणि गाजलेल्या चित्रपटाचा भाग होणं, थेट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पोहोचणं, हा सगळाच अनुभव त्याच्यासाठी मोठी शिकवण देणारा होता. मात्र, अभिनयाबरोबरच त्याने शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षणासाठी चार वर्षे यूकेमध्ये राहिलेल्या अर्चितने युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅममधून ‘कलिनरी आर्ट्स अँड मॅनेजमेंट’ या विषयात फर्स्ट क्लाससह पदवी मिळवली आहे. सध्या पुण्यात त्याची एक बेकरी आणि कॅफे आहे.jhimma 3 archit deodhar hemant dhome
‘झिम्मा ३’मधील निवडीबद्दल आणि या संधीच्या अनपेक्षित प्रवासाबद्दल अर्चित सांगतो, “या चित्रपटात अभिनयाची संधी मला अनपेक्षितपणे मिळाली. हेमंत ढोमे यांनी अचानक इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं असल्याचं सांगितलं. मी आणि साजिरी जोशी एकमेकांना फॉलो करतो. त्यामुळे साजिरीच्या फॉलोइंग लिस्टमधून त्यांनी माझं प्रोफाइल पाहिलं आणि मी ‘किल्ला’मध्ये काम केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मी मुंबईत येऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या व्यक्तिरेखेसाठी माझं ऑडिशनही झालं नाही. त्यांना हवी असलेली व्यक्तिरेखा मीच साकारू शकतो, हे त्यांच्या मनात आधीच निश्चित होतं. शिक्षण पूर्ण करून पुण्यात माझे व्यवसाय सांभाळत असताना इतक्या वर्षांनंतर पुन्हा अशा प्रकारे अभिनयाची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. एकतर ‘झिम्मा ३’ सारख्या लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपट मालिकेचा भाग होता येत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टच इतकी जबरदस्त आहे की, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे. सेटवर प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवणारा होता. त्यामुळे मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो.’’
jhimma 3 archit deodhar hemant dhome
आता ‘झिम्मा ३’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या कलाकारांच्या फळीमध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी काय असणार आणि चित्रपटाच्या कथेत त्याचा सहभाग कसा असणार, हे मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे. अभिनय, पाककला आणि व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या अर्चितचा हा नवा अभिनयप्रवास नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा ३’मध्ये अर्चित नेमक्या कोणत्या अंदाजात दिसणार, याची उत्सुकता आहे.jhimma 3 archit deodhar hemant dhome