भयंकर अश्लील कृत्य करत, देशाची मान शरमेने झुकवली म्हणून परस्तू अहमदी या गायिकेला, ७४ कोडे मारण्याची सजा दिली गेली. तसेच दोन वर्षे तिला देशाबाहेर जाण्यास बंदीही घालण्यात आली. असे तिने काय भयंकर केले होते? तर तिने हिजाब घातला नव्हता, तिचे केस झाकलेले नव्हते, तसेच तिने अतिशय पायघोळ गाऊनही घातला होता. मात्र, तो गाऊन ‘स्लिव्हलेस’ म्हणजे, बिनबाह्यांचा होता. त्यातून तिचे हात दिसत होते आणि सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे, ती गाणे म्हणत होती. ते गाणे समाज माध्यमांवर ३० लाख लोकांनी पाहिले. सार्वजनिकरीत्या, तेही पुरुषांसमोर महिलांनी गाणे म्हणणे म्हणजे भयंकर पापच. या पापाची सजा म्हणून, इस्लामिक न्यायानुसार इराण सरकारने परस्तू अहमदीला आणि तिच्या सोबतच्या चारजणांना ही सजा सुनावली. हिजाबवरून हजारो महिलांचे शिरकाण होणारे हे इराण! महिलांवरील हा अत्याचार, हा अन्याय कधी थांबेल?
पण, अशा प्रकारे प्रताडित झालेली परस्तू काही पहिलीच गायिका नाही; तर मार्च २०२५ मध्येही इराणी गायक मेहदी याराही यालाही ७४ कोडे मारण्यात आले होते. त्याने म्हणे गाण्यातून महिलांना हिजाबविरोधात उकसवले होते. तसेच, २०२४ साली गायिका जारा एस्माइली हिलादेखील इराणमध्ये अटक झाली होती. कारण काय, तर तिने हिजाब घातला नव्हता. हिजाबची सक्ती नको म्हणत, इराणमध्ये अनेक वर्षे जनआंदोलन पेटले आहे. मेहसा अमिन या युवतीचा इराणच्या पोलिसांनी खून केल्यानंतर, तर हे आंदोलन उग्र झाले. त्यानंतर हिजाबाचा विरोध केला, म्हणून इराणमध्ये हजारो लोकांना आजवर अटक करण्यात आली आहे. शेकडो लोकांना फासावरही लटकवण्यात आले. निष्पाप आणि न्यायासाठी लढणार्यांना मृत्युदंड दिला जातो. का? महिलांनी हिजाब घातला नाही, तर तिच्यावर अत्याचार करण्याची ही कोणती मानसिकता?
तर, याचा मागोवा घेतल्यावर संदर्भ सापडतो, तो ‘जामी अत-तिर्मिधी (हदीस ११७३)’मधील एका ‘हदीस’चा. या ‘हदीस’चे स्पष्टीकरण करताना इस्लामिक विद्वानांनी अर्थ काढला की, जेव्हा एखादी स्त्री परपुरुषांसमोर आपले केस किंवा सौंदर्य उघडे ठेवते, तेव्हा सैतान मानवी मनाचा (वस्वसा) वापर करून, परपुरुषांच्या मनात वाईट विचार किंवा आकर्षण निर्माण करतो. यामुळे समाजात अनैतिकता (फितना) पसरण्याचा धोका असतो. ‘हदीस’मध्ये जे लिहिले, त्यापलीकडे काहीच नाही ही इस्लामिक मानसिकता असल्याने, इराण आणि इतर कट्टरपंथी देशांमध्ये महिलांना हिजाबसह बुरखाही घालावाच लागतो. तसे केले नाही; तर इराणसारख्या देशात ‘शरिया’ कायद्यानुसार सजा देण्यात येते.
भारतात जरी हे लागू नसले, तरीही इथले मुसलमान हिजाब आणि बुरखापद्धतीचे पालन करतातच. अगदी, ‘पहले हिजाब बाद में किताब’ म्हणतात. परीक्षागृहात हिजाब काढणे अनिवार्य असेल, तर काही लोक खुशाल म्हणतात की, एकवेळ परीक्षा देणार नाही; पण हिजाब घालेनच. तीच माझी ओळख आहे, माझी संस्कृती आहे. काय म्हणावे? तिकडे मुस्लीम बहुसंख्य इराणमध्ये हिजाबविरोधात युवक-युवती मृत्यू स्वीकारायलाही तयार आहेत, तर इथे हिजाबसक्ती नसतानाही हिजाब घालणारच म्हणणारे मुस्लीम आहेत. आजकाल तर एक-दोन वर्षांच्या बालिकांनाही हिजाब घातल्याचे पाहिले आहे.
विषयांतर झाले, मुद्दा आहे महिलांच्या केसामुळे सैतान जागा होतो; म्हणून हिजाबची सक्ती करणारा इराण सध्या युद्धाच्या गर्तेत आहे. तसेच इराणची आर्थिक-सामाजिक कोंडीही झाली आहे. मात्र, तरीही इराणी महिलांची स्थिती काही बदलत नाही. या महिलांची इच्छा ती काय? तर मोकळ्या आकाशाखाली स्वच्छंदीपणे एकदातरी चालावे, त्यांच्या केसांना एकदातरी खुली हवा लागावी, या इच्छेने असे काय इराणवर आकाश कोसळणार आहे? इराणची अशी संस्कृती कोणती, जी महिलांच्या हिजाबवर तग धरुन आहे? इराणी महिला प्रश्न विचारतात पण, उत्तर देण्याऐवजी तिथले कट्टरतावादी त्यांना ७४ कोडे मारत, फासावर लटकवत आहेत. इराणी महिलांच्या या चिरडल्या गेलेल्या अस्तित्वाविषयी, जगभरातून संताप व्यक्त होत राहतो. पण, स्वतःचा नसलेला मोठेपणा निष्पाप महिलांना चिरडूनच सिद्ध करता येतो, असेच कट्टरपंथीयांना वाटते. कट्टरपंथी कधी सुधारणार? परस्तू अहमदीच्या निमित्ताने पुन्हा उभा राहिलेला ज्वलंत प्रश्न!