मुंबई, (Gautam Adani Mumbai Book Festival) : "पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाला प्रोत्साहन देण्याचा ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चा उपक्रम अभिनव आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग पाहून विशेष आनंद झाला. लहान मुलांसह प्रत्येक नागरिकाने पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करून त्यातून नवनवीन गोष्टी शिकाव्यात आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे,” असे आवाहन ‘अदानी समूहा’चे अध्यक्ष आणि ख्यातनाम उद्योगपती गौतम अदानी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात सुरू असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ला बुधवारी गौतम अदानी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील विविध दालनांची पाहणी केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानप्रसारासाठी करण्यात आलेले प्रयत्न पाहून त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.(Gautam Adani Mumbai Book Festival)
"मुंबई पुस्तक महोत्सवा’ला भेट देण्याची संधी मिळाली. येथे इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असल्याची मला येण्यापूर्वी कल्पना नव्हती. हा अत्यंत अनोखा उपक्रम असून, त्याचे मी मनापासून कौतुक करतो. मुलांसह सर्व नागरिकांनी या पुस्तकांचा पुरेपूर लाभ घ्यावा. प्रत्येकाने अधिकाधिक वाचन करावे आणि पुस्तकांमधून शिकावे,” असे अदानी म्हणाले. यावेळी त्यांनी लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देशपांडे, उद्योगपती मोहित कंबोज-भारतीय, महोत्सवाचे आयोजक आ. अमीत साटम, संयोजक आचार्य पवन त्रिपाठी आणि ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल उपस्थित होते. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’, महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ नोव्हेंबर ते दि. २९ नोव्हेंबर रोजीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ४०० हून अधिक प्रकाशकांची ६०० पुस्तक दालने असून, साहित्यिक चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालवाचकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Gautam Adani Mumbai Book Festival)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या स्टॉलला सदिच्छा भेट दिली.