पुनर्विकासातून धारावीला गुन्हेगारीच्या विळख्यातून मुक्ती !

रुंद रस्ते, प्रकाशमान गल्ल्या आणि रोजगाराच्या संधींमुळे पोलिसांसमोरील आव्हाने कमी होण्याची माजी अधिकाऱ्यांना अपेक्षा


Dharavi Redevelopment
 
मुंबई, (Dharavi Redevelopment) : मुंबईतील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीची ओळख आता बदलण्याची शक्यता आहे. धारावीचा पुनर्विकास केवळ रहिवाशांना हक्काची घरे देणारा प्रकल्प ठरणार नसून, या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अरुंद गल्ल्या, अनधिकृत बांधकामे, अस्पष्ट पत्ते आणि दाट लोकवस्तीमुळे पोलिसांसमोर निर्माण होणारी आव्हाने पुनर्विकासानंतर कमी होतील, असा विश्वास धारावीत काम केलेल्या मुंबई पोलिसांच्या माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 
मुंबई पोलिसांच्या अनेक पिढ्यांसाठी धारावी हे केवळ दाट लोकवस्तीचे ठिकाण नव्हते, तर गुन्हेगारांचा माग काढताना कसोटी पाहणारे एक मोठे आव्हान होते. अरुंद आणि अंधाऱ्या गल्ल्या, एकमेकांना जोडलेल्या अंतर्गत वाटा तसेच पडताळणी करणे कठीण असलेले पत्ते यांचा फायदा अनेकदा गुन्हेगार घेत असत. पोलिसांचा पाठलाग सुरू असतानाही काही मिनिटांत गर्दीत किंवा गल्ल्यांच्या जाळ्यातून गायब होणे त्यांना शक्य होत असे. त्यामुळे पुनर्विकासामुळे धारावीच्या भौतिक रचनेत होणारा बदल कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरेल, असे माजी अधिकाऱ्यांचे मत आहे.(Dharavi Redevelopment)
 
'हॉकी मॅन' म्हणून ओळखले जाणारे माजी सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी त्यांच्या सेवाकाळात धारावीतील गुन्हेगारीविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. त्यांच्या मते, त्या काळात धारावीतील काही ठिकाणे गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान बनली होती. अनेकदा संशयितांकडून खोटे पत्ते दिले जात असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण ठरत असे. परिसराची अनियोजित रचना गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत होती.
 
मात्र पुनर्विकासानंतर रुंद रस्ते, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि अधिकृत पत्त्यांची व्यवस्था निर्माण झाल्यास अशा पळवाटा कमी होतील. त्यामुळे पोलिसांना गस्त घालणे, संशयितांचा माग काढणे आणि घटनास्थळी तातडीने पोहोचणे अधिक सोपे होईल, असे ढोबळे यांचे मत आहे.(Dharavi Redevelopment)
 
धारावीच्या भूलभुलैयाचा पोलिसांनाही बसला होता फटका
 
कुख्यात गुंड मन्या सुर्वेच्या चकमकीत सहभागी झालेले माजी सहायक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांनाही धारावीच्या गुंतागुंतीच्या रचनेचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. सुर्वेच्या टोळीकडून धमक्या मिळू लागल्यानंतर त्यातील एक संशयित धारावीत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर जवळपास १०० पोलिसांचे पथक धारावीत दाखल झाले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनाच रस्ता चुकल्याचे लक्षात आले. सर्व गल्ल्या सारख्याच दिसत असल्याने नेमका मार्ग शोधणे कठीण झाले.(Dharavi Redevelopment)
 
रोजगाराच्या संधीही गुन्हेगारीला रोखण्यासाठी महत्त्वाच्या
 
मात्र, केवळ रस्ते रुंद करून किंवा पोलिसांची गस्त वाढवून गुन्हेगारी पूर्णपणे संपणार नाही, याकडेही बागवान लक्ष वेधतात. त्यासाठी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुनर्विकासातून नवीन व्यावसायिक जागा आणि उद्योगांना चालना मिळाल्यास तरुणांसाठी रोजगाराचे पर्याय निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या संधी वाढल्यास तरुणांचा गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.(Dharavi Redevelopment)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर