राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मूलाधार त्याच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत सामावलेला असतो. सहस्रकांच्या कालप्रवाहात अनेक स्थित्यंतरे घडली, ज्ञानाची क्षितिजे विस्तारली; तथापि, ऋषिप्रज्ञेतून प्रसूत वेदविद्या गुरुपरंपरेच्या अखंड अनुबंधातून आजतागायत प्रवाहित राहिली. या ज्ञानसंपदेचे संरक्षण म्हणजे, केवळ अतीतकालीन वैभवाचे स्मरण नव्हे, तर संस्कृतीच्या चिरंतन अधिष्ठानाचे संवर्धन होय. वेदवाणीतील हे ज्ञानतेज भावी पिढ्यांपर्यंत संक्रमित व्हावे, या ध्येयाने देवरुख येथील ‘श्री गणेश वेदपाठशाळा’ गेली २८ वर्षे ज्ञानोपासनेचे व्रत निष्ठेने आचरत आहे. या संस्थेच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
ज्या राष्ट्राला आपल्या पूर्वजांच्या ज्ञानसंपत्तीचा अभिमान असतो, त्याने तिच्या रक्षणाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. कारण राष्ट्राचे वैभव त्याच्या विचारपरंपरेत, ज्ञानसाधनेत आणि पिढ्यान्पिढ्या जतन झालेल्या सांस्कृतिक ठेव्यामध्येही असते. भारतीय संस्कृतीच्या या ज्ञानवैभवाचा विचार केला, तर वेदांचे स्थान अग्रक्रमाने मान्यच करावे लागेल. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात अनेक राजसत्ता उदयास आल्या आणि लयास गेल्या; परंतु वेदांची मौखिक परंपरा टिकली. मंत्रांचे उच्चारण, स्वरांचे अनुसंधान, पाठांतराची शिस्त आणि गुरू-शिष्य परंपरेतील अध्ययननिष्ठा यांमुळे हा अमूल्य ठेवा आजही उपलब्ध आहे. या परंपरेचे रक्षण करणे, ही संपूर्ण समाजाचीच सांस्कृतिक जबाबदारी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे कार्यरत ‘श्री गणेश वेदपाठशाळा’ याच कर्तव्यभावनेतून गेली २८ वर्षे, वेदविद्येच्या संवर्धनाचे कार्य अविरत करीत आहे. या संस्थेचे उद्दिष्ट वेदांचे अध्ययन, अध्यापन आणि प्रसार करणे, वेदशास्त्रात निपुण विद्यार्थी घडवणे आणि संस्कृत भाषेचा प्रचार करण्याचे आहे. यामागे केवळ शैक्षणिक कार्यक्रमाच्या आखणीचा भाव नसून; तर भारतीय ज्ञानपरंपरेचे सातत्य राखण्याचा एक व्यापक विचारही आहे. कारण कोणतीही ज्ञानशाखा ग्रंथांमध्येच सुरक्षित राहिल्याने तिचे संवर्धन होणार नाही. त्याचे अध्ययन करणारे विद्यार्थी, त्यांना घडवणारे अध्यापक आणि त्यामागे उभा राहणारा समाज या तिन्ही घटकांच्या सक्रिय सहभागातूनच त्या ज्ञानशाखेचे अस्तित्व टिकते.
देवरुखच्या ‘वेदभवन’मध्ये सध्या २३ विद्यार्थी निवासी पद्धतीने वेदाध्ययन करीत आहेत. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फतच विनामूल्य केली जाते. वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार येथे पाच वर्षांचा याज्ञिक अभ्यासक्रमाचे ज्ञान दिले जाते. वेदाध्ययनात मंत्रांचे शुद्ध उच्चारण आणि स्वरांचे अचूक ज्ञान यांना असलेले महत्त्व विशेष असेच. त्याचप्रमाणे याज्ञिक परंपरेतील विधी, कर्मपद्धती आणि त्यांचे शास्त्रीय अधिष्ठानही विद्यार्थ्यांनी समजून घेणेही आवश्यक असते. या अध्ययनासाठी संस्थेने स्वतंत्र यज्ञशाळेचीही व्यवस्था केली आहे. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात संस्कृत विषयाची लेखी आणि मौखिक परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘कोविद’ ही पदवी प्राप्त होते. या अभ्यासक्रमातून वैदिक अध्ययनाला शास्त्रशुद्ध संस्कृत शिक्षणाची जोड मिळते.
वेदविद्येचे अध्यापन हे विशेष कौशल्य आणि दीर्घकालीन साधना मागणारे कार्य! वेदमूर्ती विज्जल आचार्य गेली २० वर्षे या पाठशाळेत ार्गदर्शन करीत आहेत. गुरूमुखातून मंत्र ऐकणे, त्याचे अचूक अनुकरण करणे, स्वरांची शुद्धता राखणे आणि सातत्यपूर्ण अभ्यासातून ते स्मरणात दृढ करणे, ही वैदिक अध्ययनाची मूलभूत प्रक्रिया. यात अध्यापक हा ज्ञानपरंपरेचा वाहक असतो. अशा अध्यापनासाठी संयम, निष्ठा आणि विषयाचे सखोल ज्ञान आवश्यकच असते. २० वर्षांची अध्यापनसेवा ही या कार्यामागील सातत्याची साक्ष.
आजच्या काळात शिक्षणाचे क्षेत्र अनेक नव्या ज्ञानशाखांनी विस्तारले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व निश्चितच मोठे. परंतु, या प्रगतीच्या ओघात आपल्या पारंपरिक ज्ञानशाखांचे अध्ययन मागे पडावे, असे मानण्याचे कारण नाही. उलट, आधुनिक शिक्षणाबरोबर भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासालाच, व्यापक परिमाण देऊ शकते. याच विचारातून पाठशाळेतील विद्यार्थ्यांना देवरुख परिसरातील शाळांमध्ये नियमित शिक्षणही दिले जाते. आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांनी दहावी, तर दोन विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पूर्ण केली आहे. वैदिक अध्ययन आणि शालेय शिक्षण यांचा हा समन्वय विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणाच्या संधी खुल्या करतो.
पाठशाळेतील दिनचर्याही शिक्षणाच्या या व्यापक संकल्पनेशी जोडलेली आहे. पहाटे ६ वाजता दिवसाची सुरुवात स्नान आणि संध्यावंदनाने होते. सकाळी ८ ते दुपारी १२ अध्ययन, त्यानंतर वैश्वदेव आणि भोजन, दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा अध्ययनाचे सत्र, सायंकाळी संध्यावंदन आणि रात्री उपासना असा दिवसाचा क्रम असतो. रात्री १० वाजता दिवे मालवले जातात. या दिनचर्येतून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त, नियमितता आणि नित्यकर्मांविषयीची जाणीव रुजवली जाते. ज्ञानाचे अध्ययन करताना आचाराची बैठक दृढ असणे आवश्यक आहे, या भारतीय शिक्षणपरंपरेच्या विचाराचेच हे प्रकट्य आहे.
संस्थेचा परिसरही या संस्कारांना अनुरूप आहे. अध्यापक निवास, विद्यार्थी निवास, भोजनगृह आणि कार्यालय यांबरोबरच श्री द्विभुज गणेश मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आणि गोशाळाही या परिसरात आहेत. परिसरात ५४ प्रकारच्या वृक्षांचे ‘नक्षत्र उद्यान’ही विकसित करण्यात आले आहे. भारतीय परंपरेत निसर्ग, वृक्ष आणि जीवसृष्टी यांच्याकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी आहे. त्या दृष्टीचा परिचय विद्यार्थ्यांना या परिसरातून होतो. स्वतंत्र यज्ञशाळेमुळे याज्ञिक शिक्षणाला प्रत्यक्ष प्रशिक्षणाची जोड मिळते. अशा प्रकारे अध्ययन, उपासना, सेवा आणि निसर्गसंपदेचा परिचय यांचे एकत्रित वातावरण येथे निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसरातील लाल जांभ्या दगडाचे बांधकाम मनाला शांतता देते.
वेदविद्येचे संवर्धन समाजाच्या सहभागाशिवाय शय नाही. याची जाणीव ठेवून पाठशाळा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानमालेचे आयोजन करते. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणार्या वर्धापन दिनानिमित्त भाऊ तोरसेकर, धनश्री लेले, अच्युत गोडबोले आणि शरद पोंक्षे यांसारख्या मान्यवरांची व्याख्याने आजवर आयोजित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचा या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीश बापट यांनीही संस्थेला भेट देऊन कार्याचे कौतुक केले आहे. सन २०२२ मध्ये ‘कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक’ यांच्या रत्नागिरी उपकेंद्राने, संस्कृत बीजरक्षणाच्या कार्यातील योगदानाबद्दल संस्थेला सन्मानपत्र दिले. अलीकडेच ‘वैष्णवी फाऊंडेशन, डोंबिवली’ यांच्याकडून ‘श्रुतकीर्ती पुरस्कार’ देऊनही संस्थेचा गौरव करण्यात आला.
या कार्यातील एक महत्त्वाचा प्रश्न आर्थिक व्यवस्थेचा आहे. संस्थेचे कार्य विविध दानशूर व्यक्तींकडून मिळणार्या देणग्या आणि ठेवींवरील व्याज यावरच चालते. संस्थेला कोणतेही अनुदान प्राप्त नाही. विद्यार्थ्यांचे निवास, भोजन, अध्यापन आणि इतर सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी, नियमित आर्थिक पाठबळाची आवश्यकता अधिक असते. संस्थेला आयकर कायद्याच्या करसवलतीचीही सुविधाही आहे. आपल्या सांस्कृतिक ज्ञानसंपत्तीचे जतन करणार्या संस्थांना आर्थिक आणि नैतिक पाठबळ देणे, हे समाजाचे कर्तव्यच आहे. अनेक दानशूर निरलस भावनेने ते निभावतात.
वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्यांना घडवणारे गुरू आणि या कार्याला आधार देणारा समाज यांची साखळी अखंड राहिली, तरच ज्ञानपरंपरेचे सातत्य टिकेल. देवरुखची ‘श्री गणेश वेदपाठशाळा’ गेली २८ वर्षे याच दिशेने प्रयत्नशील आहे. अशा संस्थांचे कार्य जितके महत्त्वाचे, तितकीच त्यांची समाजाला ओळख करून देण्याची गरजही मोठी. जिज्ञासूंनी ‘वेदभवन’ला भेट देऊन येथील अध्ययनपद्धती आणि कार्य समजून घ्यावे, संस्थेला सहकार्य करावे आणि या ज्ञानपरंपरेच्या जतनात सहभागी व्हावे. कारण, पूर्वजांचा ज्ञानवारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.
लेखक- अमित साने (लेखक संस्थेचे विश्वस्त आहेत.)