सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महादीप रोखणे म्हणजे न्यायपालिकेचा अवमान!

तामिळनाडू सरकारच्या भूमिकेचा आलोक कुमार यांच्याकडून निषेध

    25-Nov-2026   
 
 
Thirupparankundram Deepam Controversy
 
मुंबई (Thirupparankundram Deepam Controversy) : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी तामिळनाडूतील टीव्हीके सरकारने तिरुपरंकुंद्रम येथे कार्तिगई दीपम महोत्सवाच्या निमित्ताने भगवान मुरुगन यांच्या पवित्र डोंगरावर महादीप प्रज्वलित करण्यास मज्जाव केल्याचा निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही शतकानुशतके चालत आलेली ही महान धार्मिक परंपरा रोखणे म्हणजे तामिळनाडू सरकारचा हिंदूविरोधी दुराग्रह आणि भारतीय संविधान व न्यायपालिकेचा घोर अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
हा प्रकार भगवान मुरुगन यांच्या कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धा आणि विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे. भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या आणि न्यायपालिकेचा अवमान करणाऱ्या या मानसिकतेला हिंदू समाज योग्य वेळी लोकशाही मार्गाने उत्तर देईल, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयही आपल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करून कठोर शिक्षा सुनिश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
आलोक कुमार म्हणाले की, तामिळनाडू ही भगवान मुरुगन यांची पवित्र भूमी आहे. त्यांना तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृतीचे शिल्पकारही मानले जाते. अशा आराध्य देवतेच्या पवित्र डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रज्वलित होणारा महादीप रोखण्याचा प्रयत्न करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
 
ते म्हणाले की, तिरुपरंकुंद्रमचा डोंगर हा भगवान मुरुगन यांचा पवित्र डोंगर आहे. त्याचा संबंध हिंदूंच्या हत्याऱ्यांशी आणि जिहादी प्रवृत्तीच्या घटकांशी जोडून त्याची धार्मिक ओळख बदलण्याचे धाडस कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाऊ शकत नाही. भगवान मुरुगन यांच्या पवित्र भूमीवर महादीप प्रज्वलित होऊ नये, यासाठी तामिळनाडू सरकार ज्या प्रकारे अडेलतट्टूपणाची भूमिका घेत आहे, त्यावरून सरकारने भगवान मुरुगन यांच्या भक्तांशीही वैर पत्करल्याचे स्पष्ट होते. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.
 
तामिळनाडूच्या टीव्हीके सरकारने या प्रकरणात केवळ हिंदूंच्या श्रद्धा आणि विश्वासाचा अपमान केलेला नाही, तर सर्वोच्च न्यायव्यवस्था आणि भगवान मुरुगन यांच्याशीही थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अवहेलना करणे म्हणजे न्यायमंदिर, न्यायपालिकेचे सर्वोच्च स्थान आणि देशाच्या संविधानाला आव्हान देण्यासारखे आहे. कोणत्याही निवडून आलेल्या सरकारला राजकीय दुराग्रहापोटी न्यायालयाचे आदेश धुडकावण्याचा अधिकार नाही.
 
या घटनेतून न्यायपालिका आणि हिंदूंच्या श्रद्धा या दोन्हींचा अपमान झाला आहे, असेही आलोक कुमार यांनी स्पष्ट केले.
हिंदूविरोधी राजकारण आणि अशा मानसिकतेचा देशाच्या राजकारणातून आता अस्त होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. तामिळनाडूमधूनही अशा राजकारणाची लवकरच हकालपट्टी होईल, असा ठाम विश्वास आलोक कुमार यांनी व्यक्त केला.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर