तामिळनाडूमध्ये तिरुप्परंकुंद्रम दीपम् वादावरुन तणाव कायम! जानेवारीत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी; सलग दुसऱ्या दिवशी भाविकांना डोंगरावर प्रवेशबंदी!

    25-Nov-2026
 
Thiruparankundram Deepam Controversy
 
चेन्नई (Thiruparankundram Deepam Controversy) : तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुप्परंकुंद्रम डोंगरावरील कार्तिगाई दीपम् प्रज्वलनाचा वाद चिघळला आहे. डोंगरावरील प्राचीन दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या मागणीवरून मंदिर प्रशासन, राज्य सरकार आणि हिंदू भाविकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाच्या दीपप्रज्वलनास परवानगी देणाऱ्या आदेशाविरोधातील मुख्य याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जानेवारी २०२७ मध्ये अंतिम सुनावणी घेणार आहे.
 
२० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबरला डोंगरावरील दीपस्तंभावर एकदाच दिवा लावण्याची अंतरिम परवानगी दिली होती. यासाठी मंदिर प्रशासनाने अधिकृत केलेल्या मर्यादित पथकाला प्रवेश देण्याचे निर्देश होते. मात्र, निर्धारित दिवशी दीपप्रज्वलन झाले नाही. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने संबंधित पथकाला अधिकृत परवानगी दिली नसल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, असे तामिळनाडू सरकारने न्यायालयात सांगितले. (Thiruparankundram Deepam Controversy)
 
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून अवमान कारवाई सुरू करण्यास नकार दिला. मात्र, संबंधित पक्षांना स्वतंत्र अवमान याचिका दाखल करण्याची मुभा दिली आहे. दरम्यान, डोंगरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला. परिसरात ५,६१८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सीसीटीव्ही आणि चेहरा ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. (Thiruparankundram Deepam Controversy)
 
वाद काय आहे ?
 
मदुराईच्या तिरुप्परंकुंद्रम डोंगरावर सुब्रमण्य स्वामी मंदिर आणि सुलतान सिकंदर बदुशा औलिया दर्गा ही दोन धार्मिक स्थळे आहेत. दर्ग्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या एका दगडी स्तंभाला हिंदू भाविक 'दीपथून' म्हणजे दीपस्तंभ मानतात. कार्तिगाई दीपम् उत्सवाचा दिवा या स्तंभावर लावण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, मंदिर प्रशासन आणि तामिळनाडू सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक दशकांपासून हा दिवा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उचिपिल्लयार मंदिराजवळील दीप मंडपात लावला जातो. दीपथूनवर दिवा लावण्याची प्रस्थापित परंपरा असल्याचा पुरावा नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. (Thiruparankundram Deepam Controversy)





संबंधित मजकूर