गेल्या वर्षी झालेल्या ‘वन्दे मातरम्’च्या सार्धशती वर्षात ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीवर आधारित दोन अंकी संगीत नाटक ‘संगीत आनंदमठ’ मराठी रंगभूमीवर सादर झाले. आज, दि. २५ नोव्हेंबर रोजी यशवंत सभागृह, माटुंगा येथे सायंकाळी ६.३० वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असून, प्रेक्षकांना प्रवेश मोफत आहे. त्यानिमित्ताने ‘आनंदमठ’ आणि ‘वन्दे मातरम्’ची गौरवगाथा मांडणारा हा लेख...
‘वन्दे मातरम्’! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र... कोवळ्या क्रांतिकारकांचे शस्त्र. दधीचिचे सामर्थ्य असणारे अस्त्र! ‘माते तुला वंदन असो’ असे म्हणणारे ‘वन्दे मातरम्’ हे दोन शब्द आणि त्यापुढचे २६ ओळींचे ओजस्वी गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला अभूतपूर्व चेतना देणारे ठरले. शस्त्रधारी क्रांतिकारी असोत वा निःशस्त्र सामान्य नागरिक, सर्वांच्या मनात आणि ओठावर हा महामंत्र आला आणि इंग्रज सत्तेविरुद्धच्या संघर्षाला जणू एक ‘रणगीत’ मिळाले.
बंगालचे ख्यातनाम साहित्यिक ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम्’ हे गीत बंगालच्या सीमा ओलांडून भारतभर पसरले आणि ते क्रांतीच्या लढ्याचा महामंत्र बनले. या महामंत्रात असलेली प्रचंड शक्ती लगेचच इंग्रज शासनाच्या लक्षात आली आणि त्यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर बंदी आणली. त्यामुळे केवळ ‘वन्दे मातरम्’चा उच्चार हेही इंग्रज सरकारविरोधी कृत्य झाले. अवघ्या १५ वर्षांच्या सुशीलकुमार या क्रांतिकारकाला ‘वन्दे मातरम्’ म्हटल्याबद्दल फटयांची शिक्षा झाली. प्रत्येक फटक्याला ‘वन्दे मातरम्’ म्हणत असलेला सुशीलकुमार रक्तबंबाळ होऊन पडला, तरी पुटपुटत होता ‘वन्दे मातरम्’... ‘वन्दे मातरम्’ मंत्र जपत फासावर गेलेला पहिला क्रांतिकारी खुदिराम बोस होता अवघ्या १९ वर्षांचा! इतरही अनेक तरुण क्रांतिकारी ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र जपत हसतहसत फासावर गेले.
१९०५च्या ‘वंगभंग’ आंदोलनात प्रथम या गीताला भारतीयांच्या मानबिंदूचे स्थान मिळाले. त्यानंतर अगदी १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनातसुद्धा ‘वन्दे मातरम्’चा जयघोष ब्रिटिशांच्या मनात धडकी उत्पन्न करत असे. गतवर्षी या गीताच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली, तरी आजही ते गीत तितकेच प्रेरक आणि तेजस्वितेचे जागरण करणारे वाटते.
एखाद्या मंत्राची शक्ती त्याच्या आवर्तनाने वाढत जावी, तसे कोटी कोटी मुखातून दीडशे वर्षे झालेल्या आवर्तनांमुळे हे गीत आजच्या तरुणपिढीलादेखील प्रेरणा देण्याला समर्थ बनले आहे. नुसते प्रेरक नव्हे; तर भाषेचे, लयीचे, संगीताचे, मातृभूमीच्या समृद्ध रूपाचे, भारतीयांच्या एकात्म भावनेचे, आपल्या देशाच्या मातृरूपातील दर्शनाचे आणि त्या भूमीवरच्या प्रेमाचे संस्कार देणारे हे गीत आता केवळ राष्ट्रीय गीत नाही; तर ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीचे म्हणून राजमान्य झाले आहे.
कार्तिक शुद्ध नवमी, ८ नोव्हेंबर १८७५ या दिवशी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना हे दिव्य स्फुरण झाले. बंगालचे ख्यातनाम साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे उत्तम कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. १८८२ साली त्यांनी बंगालमधील संन्याशाच्या क्रांतिकारी उठावावर ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत ‘वन्दे मातरम्’ या कवितेचा प्रथम अविष्कार झाला. १८८५च्या आसपास बंगाली रंगभूमीवर ‘आनंदमठ’ नाट्य स्वरूपात सादर झाले आणि सत्यानंद, भवानंद या संतानांच्या मुखातून ते मंचावर गायले गेले.त्यानंतर जवळपास १४० वर्षांनंतर, गेल्या वर्षी झालेल्या ‘वन्दे मातरम्’च्या सार्धशतीत म्हणजे, दीडशे वर्षपूर्ती वर्षात हे नाटक दोन अंकी संगीत नाटकाच्या रूपात मराठी रंगभूमीवर सादर झाले. ‘वन्दे मातरम्’चे ज्येष्ठ अभ्यासक मिलिंद सबनीस यांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचे आणि ही कादंबरी नाट्यरूपात मराठी रंगभूमीवर यावी, या त्यांच्या तीव्र इच्छेचे, प्रयत्नांचे फळ म्हणजे ‘संगीत आनंदमठ’. महाराष्ट्राची संगीत नाटकांची समृद्ध परंपरा आणि स्वातंत्र्ययुद्धात असलेले मराठी माणसाचे योगदान, या दोन्ही परंपरा या नाटकाच्या रूपाने एकत्र आल्या आहेत.
या नाटकाने पदार्पणातच राज्य नाट्य स्पर्धेची सर्वोत्कृष्ट नाटक; तसेच लेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, नेपथ्य या सर्व विभागांत प्रथम क्रमांक, शिवाय गायन व अभिनयाची रौप्यपदके आणि गायन प्रमाणपत्र अशी एकूण आठ बक्षिसे मिळवली आणि आता राज्यात, तसेच परराज्यात याचे प्रयोग धडायात सुरू आहेत. देशातील महत्त्वाच्या नाट्यमहोत्सवांमध्ये आणि विद्यापीठ महोत्सवांमध्येदेखील या चैतन्यमय नाटकाचे प्रयोग झाले आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाचे सादरीकरण पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंदिरात भव्य नेपथ्य आणि १००हून अधिक कलाकार अशा महानाट्य स्वरूपात झाले. त्यानंतर पुणे ‘आकाशवाणी’निर्मित या नाटकाचे ‘नभोनाट्य’ रूपांतर सर्व ‘आकाशवाणी’ केंद्रांवरून प्रक्षेपित झाले. नाटकाचे प्रेरक कथानक, उत्तम दिग्दर्शन, नेत्रदीपक नेपथ्य, प्रभावी गीते व संगीत यासोबत खरा प्रभाव पडतो, तो या नाटकाला तोलून धरणार्या तरुणाईचा. अभिनय, वादन, प्रकाशयोजना आणि अन्य सर्वच व्यवस्था पाहणारा तरुण-तरुणींचा ऊर्जेने भारलेला चमू, हे नाटकाचे खरे बलस्थान. या तरुणाईचा जोश प्रेक्षकांना इंग्रजी सत्ताधार्यांचे अत्याचार, त्याविरुद्ध लढणारे संन्याशी, शत्रूचा प्राण घेणारे आणि बलिदान देणारे निडर देशभक्त संतान यांच्या संघर्षाचा जिवंत अनुभव देतो.
‘भारतभूचा महामंत्र हा गाऊनी मातेला स्मरतो’ अशी भारताच्या महामंत्राच्या गायनाची ग्वाही देत सुरू झालेली ही सुरेल नांदी ‘आनंदमठी या नऊ रसांनी पूजन मातेचे करतो’ या ‘आनंदमठ’च्या तरुण गायक कलाकारांनी दिलेल्या आश्वासनाने संपते आणि प्रेक्षक खरोखरच वीर, करुण, वत्सल, रौद्र, अद्भुत, शृंगार, शांत, भयानक अशा सर्व रसांत न्हाऊन निघतात, असे आतापर्यंत झालेल्या २५हून अधिक प्रयोगांच्या अनुभवावरून म्हणता येते.
‘वन्दे मातरम्’ म्हणत संघर्ष करणार्या लाखो युवकांनी या भूमीच्या कणाकणांत देशभक्ती रुजवली आहे. हाच मंत्र प्रभावीपणे आपल्या मनावर पुन्हा एकदा ठसवणारे, संन्यस्त योद्ध्यांच्या रणगर्जना, प्रत्यक्ष जिवंत युद्धप्रसंग, वीरश्रीपूर्ण आणि भावपूर्ण गीते यांतून आपल्याला आत्मजागृतीची अनुभूती देणारे ‘संगीत आनंदमठ’ हे नाटक म्हणूनच अवश्य अनुभवायला हवे.
-विनीता तेलंग
९८९०९२८४११