‘सहकार भारती’, मुंबई विभाग आणि ‘घे भरारी’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दीपावली महोत्सव व प्रदर्शन २०२६चे आयोजन चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मैदान, टिळकनगर येथे करण्यात आले होते. दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या महोत्सवाचा मागोवा घेणारा हा लेख...
‘सहकार भारती’, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नुकतेच शिर्डी येथे ‘नारीशक्ती सहकारिता संमेलन २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग नोंदविला, तर मुंबईतून २५० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. याच संमेलनातून प्रेरणा घेऊन मुंबईतील ‘घे भरारी’ संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा भालेराव यांनी ‘सहकार भारती’, मुंबई विभागाकडे महिला बचत गटांसाठी भव्य दीपावली प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांना दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
यापूर्वी ‘घे भरारी’ संस्थेमार्फत रस्त्यालगत स्टॉल उभारून प्रदर्शनाचे आयोजन केले जात होते. मात्र, यंदा मैदानात महोत्सव आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविणे, हे मोठे आव्हान होते. पुष्पलता मुळे, स्नेहा भालेराव आणि अॅड. शुभांगी सारंग यांनी अथक प्रयत्न करून या आयोजनासाठी आवश्यक परवानग्या मिळविल्या. महानगरपालिकेचे स्थानिक प्रशासन, उपमहापौर संजय घाडी, डॉ. अविनाश ढाकणे आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला आवश्यक ती प्रशासकीय मान्यता मिळाली. सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून नियोजनबद्ध पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन ‘सहकार भारती’, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष तथा अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सामाजिक न्याय विभाग प्रतिनिधी योगिता साळवी, ‘सरोज स्वीट्स प्रा. लि.’च्या उद्योजिका मनीषा मराठे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अॅड. नितीन निकम, गिरीश कांबळे, स्नेहा भालेराव, अॅड. शुभांगी सारंग आणि राजेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी दत्ताराम चाळके यांनी महिलांनी बनवलेल्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले गेले. योगिता साळवी यांनी आपल्या मनोगतातून महिला उद्योजिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मनीषा मराठे यांनी महिलांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख केला. घर, संसार आणि दैनंदिन जबाबदार्या सांभाळतानाच महिला आपल्या उद्योजकीय स्वप्नांसाठी कशा जिद्दीने प्रयत्न करतात, याविषयी त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
या पाच दिवसीय महोत्सवात ‘उद्यम’ व ’माविन’ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ, पैठणी खेळ यांसारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच स्थानिक पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही महिलांना लाभले. या उपक्रमांमुळे महोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी केली. त्यामुळे महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण आणि विक्री करण्याची उत्तम संधी मिळाली. या महोत्सवाचे एक विशेष फलित म्हणजे येथील वातावरणातून प्रेरणा घेऊन एका नव्या उद्योगाची सुरुवात झाली. ‘सहकार भारती’चे कार्यकर्ते सत्यनारायण गौर यांच्या कन्येने आणि जावयाने महोत्सवातील उद्योजकतेचा उत्साह व सकारात्मक वातावरण यांपासून प्रेरणा घेत आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली. 'Venera Living - Home Decor' या नावाने त्यांनी गृहसजावटीच्या क्षेत्रात आपला उद्योजकीय प्रवास सुरू केला. एखाद्या उपक्रमातून केवळ विक्रीच नव्हे, तर नव्या उद्योजकीय स्वप्नांना जन्म मिळतो, याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.
‘दीपावली महोत्सवा’चा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारोप समारंभाला ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय महामंत्री संजय पाचपोर, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली. व्यस्त भोसले यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री क्रीडा मैदानावर महोत्सव आयोजित करण्यास परवानगी दिल्याचा उल्लेख केला. तसेच ‘सहकार भारती’च्या या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांच्या कार्याचा सन्मान केला. समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना संजय पाचपोर यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. ‘ओला’ आणि ‘उबर’ यांसारख्या खासगी कंपन्यांच्या क्षेत्रात ‘भारत टॅक्सी’ या सहकारी उपक्रमाने प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेली स्पर्धा आणि त्यामुळे ग्राहकांना मिळालेला लाभ, याचे उदाहरण त्यांनी दिले. तसेच ‘जिओ’, ‘एअरटेल’ आणि ‘बीएसएनएल’ यांच्या दूरसंचार क्षेत्रातील वाटचालीचा संदर्भ देत सहकार क्षेत्राला अधिकाधिक प्रोत्साहन आणि सहकार्य मिळण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली. महिला बचत गटांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या कौशल्याच्या बळावर अर्थार्जन करावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शनही त्यांनी केले. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे, उषा गायकवाड यांचा क्रोश व विणकाम कलेचा स्टॉल. ‘घर घर तिरंगा’ या उपक्रमातील त्यांच्या कौशल्याची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेली आहे. त्यांच्या कलाकौशल्याचा आणि महोत्सवातील विशेष सहभागाचा गौरव म्हणून त्यांना आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या अन्य पाच महिलांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवात महिलांच्या मनोरंजनासाठी लोकप्रिय पैठणी खेळाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला संजना घाडी यांनी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. विलास आपटे यांनीही महोत्सवाला भेट देत, या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी पुढील वर्षी यापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात, मोठ्या संख्येने स्टॉल उभारून ‘सहकाराची जत्रा’ भरवावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळावी, नव्या महिला उद्योजिका घडाव्यात आणि त्यांच्या उद्योगांना भरारी मिळावी, हीच या उपक्रमामागील खरी भावना आहे. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ, त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ आणि त्यांच्या स्वप्नांना सहकाराची साथ देणारा हा महोत्सव निश्चितच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. ‘एकमेकींच्या साथीने, सहकाराच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे!’ हा संदेश देत दीपावली महोत्सव २०२६ने महिला उद्योजकतेसाठी नवी आशा आणि नवी दिशा निर्माण केली आहे.
-संतोष सुर्वे
(लेखक सहकार भारती, मुंबई विभाग संघटन प्रमुख आहेत.)