खिलाडूवृत्ती, साहसाची ओढ आणि निसर्गप्रेम यांचा सुरेख संगम साधत तरुणांना घडविणार्या सागर करंजकर यांच्याविषयी...
काही माणसांच्या स्वभावातच एकप्रकारची अस्वस्थता असते. ती अस्वस्थता कशाची, तर सतत काहीतरी नवे पाहण्याची, अनोळखी वाटा धुंडाळण्याची आणि स्वतःच्याच क्षमतांना नवी आव्हाने देण्याची! अशा माणसांच्या मनाला सतत काहीतरी खुणावते. कधी दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, कधी आभाळाला भिडणारी शिखरे, तर कधी घनदाट रानातून वळणावळणाने जाणारी पायवाट! निसर्गाच्या या सार्या पसार्यात त्यांना एक अनामिक ओढ जाणवते, शरीराला कष्ट देण्यात त्यांना आनंद मिळतो, संकटांना सामोरे जाताना मनातील जिद्द अधिकच जागी होते आणि एखादे ध्येय गाठल्यानंतर मिळणारे समाधान त्यांच्या जगण्याला नवी उमेद देते. अशांसाठी प्रवासात गवसणारे अनुभव मोलाचे असतात. निसर्गाच्या सान्निध्यात नव्या क्षितिजांच्या शोधात भटकंती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे, सागर शंकर करंजकर!
सागर यांचा जन्म १९९६ साली ठाण्यात झाला. ठाण्यातच त्यांचे बालपण गेले. सागर यांचे घर मध्यमवर्गीय कुटुंब! सागर यांचे वडील शंकर यांचा व्यवसाय, तर आई निर्मला गृहिणी, तसेच सागर यांना एक लहान आकाश नावाचा एक भाऊही आहे. ठाण्यातील प्रसिद्ध सरस्वती सेकंडरी स्कूल या शाळेत त्यांचे पूर्ण शिक्षण झाले. सागर यांना खेळाचा वारसा लाभला, तो त्यांच्या पालकांकडूनच. सागर यांचे आई-वडीलही कबड्डीचे खेळाडू होते. त्यामुळे कबड्डीची ओढ सागर यांच्या रक्तात जन्मजात होतीच. शाळेच्या प्रांगणात त्या ओढीला आकार मिळाला.
ठाण्याच्या सरस्वती शाळेतील वातावरण हे सुरुवातीपासूनच खेळाडूंसाठी पोषक असेच. अशा या पोषक वातावरणातच सागर यांच्या कबड्डीवर कौशल्याचे संस्कार झाले. त्यामुळे शालेय जीवनातच जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्याची संधी सागर यांना लाभली. लाभलेल्या या संधीचे सागर यांनी सोनेच केले. याच काळात त्यांनी अनेक पदके जिंकली.
पुढे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात कला शाखेत अकरावीसाठी प्रवेश घेतला. तेव्हाही कबड्डी खेळणे सुरूच होते. रुईया महाविद्यालयातील दोन वर्षांच्या काळातच सागर यांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारत ‘सुवर्ण’ही जिंकले. त्यांचे खेळातील कौशल्य पाहून ‘माझगाव डॉकयार्ड’कडून खेळण्याची संधीही त्यांना लाभली. तिथेच अर्थार्जनाची संधी असल्याने सागर यांनी बारावीनंतर ‘आयटीआय’ही केला. यामुळे त्यांना माझगाव डॉकयार्डमध्ये कंत्राटी नोकरीची संधी मिळाली.
मात्र, सागर यांचे मन एका अनामिक सुखाच्याच शोधात होते. ते सुख त्यांना गवसले निसर्गाच्या सान्निध्यात! सागर यांचे कबड्डीप्रमाणेच अन्य एक वेड म्हणजे, ‘ट्रेकिंग’! शाळेतही त्यांनी अनेकदा अनेक डोंगर चढले होतेच. सागर यांनी आजवर जवळपास सह्याद्रीतील २००पेक्षा अधिक किल्ले चढले आहेत. सागर यांना निसर्गाच्या सान्निध्यात शांत सुखाची अनुभूती होते. डोंगर, नद्या, ओढे अशी निसर्गाची विविध रूपे त्यांच्या मनाला मोहित करतात. त्यामुळे जराशी उसंत लाभली की, सागर लगेच निसर्गाची वाट जवळ करतात. ‘ट्रेकिंग’बरोबर ‘रॉक क्लायबिंग’ही सागर करत असून, त्याचे प्रशिक्षणही ते अनेकांना देतात. शिवाय, विविध ‘ट्रेकिंग’चे आयोजन करणे अथवा त्याचे व्यवस्थापनही सागर करतात. सह्याद्रीतील त्यांच्या विपुल अनुभवाचा अनेकांना लाभ झाला आहे.
सागर यांना निसर्गाप्रमाणेच ‘सायकलिंग’चीही आवड. आजवर त्यांनी दोनवेळा ठाणे ते मुंबई, ठाणे ते महाबळेश्वर असे ‘सायकलिंग’ केले आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांनी एकट्याने कन्याकुमारी ते मुंबई असा सलग २७ दिवसांचा साधारण २ हजार ३०० किलोमीटरचा प्रवासही केला आहे. यातूनच त्यांची ‘सायकलिंग’ची आवड अधोरेखित होते. आता भारतभ्रमंतीची ओढ त्यांच्या मनाला लागली आहे.
‘ज्ञान हे दिल्यानेच वाढते,’ हे तत्त्व सागर कसोशीने पाळतात. त्यामुळेच ते त्यांच्याकडील कबड्डी, ‘क्लायबिंग’, ‘ट्रेकिंग’ अशा कौशल्यांचे प्रशिक्षण आज अनेक तरुणांना देत आहेत. सध्या जवळपास ५० विद्यार्थ्यांना सागर विविध प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत.
सागर यांचे बंधूही क्रीडा क्षेत्रातच अग्रेसर असून, सागर त्यांच्याकडून भारतात होणार्या ‘हाफ आर्यनमॅन’ स्पर्धेची तयारी करून घेत आहेत. सागर यांनी प्रशिक्षण दिलेल्या एका विद्यार्थ्याने अलीकडेच गोव्यात झालेली ‘हाफ आयर्नमॅन’ स्पर्धा पूर्ण केली होती. हे सगळे करतानाच, वडिलांचा असलेला ‘फॅब्रिकेशन’चा व्यवसायही सागर सक्षमपणे सांभाळत आहेत. रानातील वाटा तुडवत सह्याद्रीच्या विराटरूपाचे दर्शन ‘याचि देही याचि डोळा’ घेणार्या सागर ‘आसेतुहिमाचल’ भारतभ्रमंतीचे स्वप्न येत्या काही काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सागर करंजकर यांना त्यांच्या ध्येयसिद्धीसाठीदै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
-कौस्तुभ वीरकर